नव्या अभ्यासक्रमात अध्ययन निश्चितीचा समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |

क्युआर रोडमुळे डिजिटल अभ्यासक्रमाकडे वाटचाल
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा विश्वास

 
 
 
मुंबई : बालभारतीच्या पुस्तकांमधून प्रत्येक पाठाला क्युआर कोड देण्यात आला आहे. त्यामुळे ही वाटचाल डिजिटल अभ्यासक्रमाकडे जाणारी आहे. तसेच नव्या अभ्यासक्रमामध्ये अध्ययन निश्चितीचाही समावेश करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. शिवाजी मंदिरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी बदलण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचीदेखील माहिती दिली.
 
इंग्रजी ही काळाची गरज असली तरी मातृभाषेतले प्राथमिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पाडते. तसेच कृतीयुक्त आणि उपयोजनात्मक अभ्यासाचा फायदा नक्कीच दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी होईल, असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच बालभारतीचा अभ्यासक्रम शिकत असलेले विद्यार्थीदेखील सीबीएससी आणि आयसीएससीच्या विद्यार्थ्यांना टक्कर देऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
 
 
 
 
विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्याचे प्रयत्न
पूर्वी दहावीच्या गुणपत्रिकांवर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण असा शेरा असायचा. मात्र, आता उत्तीर्ण आणि कौशल्य सेतू असे त्यात नमूद केले असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे महत्त्वाचे असून राज्यातील सर्व समाजातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे तावडे म्हणाले. तसेच सातवी ते दहावीचा अभ्यासक्रम बदलाची प्रक्रिया पूर्ण झाली असून निरनिराळ्या प्रकारच्या शिक्षणावर भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
 
पारंपारिक शिक्षण पद्धतीत बदल
यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या हाती नवी अभ्‍यासक्रम असलेली पुस्तके येणार आहेत. याआधी इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात बदलण्यात आला होता. पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तावडे म्हणाले. इयत्ता सातवी, आठवी, नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी अभ्यासक्रमाचे नवीन आराखडे, त्यांची उद्दिष्टे आणि अभ्यासक्रम बदल अशी विविध माहिती बालभारतीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मराठी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या प्रमुख विषयांसह द्वितीय आणि तृतीय भाषा विषयांच्या अभ्यासक्रमाचे आराखडेही बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
 
@@AUTHORINFO_V1@@