शिवसेनेतील गटबाजीचा पोटनिवडणुकीत फटका?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |
 
 
 
नाशिक : महानगर शिवसेनेतील खांदेपालटानंतर पहिल्यांदाच नाशिक भेटीवर आलेले संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांच्या दौऱ्यातही सेनेतील गटबाजी संपुष्टात आली नसल्याची चर्चा शिवसैनिकांत केली जात आहे. खुद्द चौधरी यांनी सेनाभवनात येताना नवनियुक्त महानगरप्रमुखांच्या उपस्थितीत प्रवेश करणे अपेक्षित असताना त्यांनी मात्र जुन्या पदाधिकाऱ्यांना घेऊन कार्यालय गाठल्यामुळे ६ एप्रिल रोजी होत असलेल्या प्रभाग क्रमांक १३ क च्या पोटनिवडणुकीत त्याचा फटका बसणार असल्याची चर्चा आहे.
  
संपर्कप्रमुख अजय चौधरी यांच्या उपस्थितीत सायंकाळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबरोबरच दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
 
शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वात बदल करण्यामागचे कारण स्पष्ट केले नसले तरी, अजय बोरस्ते रांच्यावर महानगरप्रमुख व मनपा विरोधी पक्षनेतेपद अशी दुहेरी जबाबदारी असल्यामुळे फेरबदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता एका महानगरप्रमुखाकडून पक्ष संघटना बांधणीस मर्यादा पडू शकते, हे हेरून मुंबईच्या धर्तीवर एकापेक्षा अधिक महानगरप्रमुख नेमण्याचा पॅटर्न नाशकात वापरण्यात आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर जिल्हा शिवसेनेतही फेरबदलाचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी इच्छुकांनी मध्यंतरी पक्षनेत्यांची भेट घेऊन फिल्डिंग लावली आहे.
 
उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते खा. संजय राऊत यांच्याकडे नाशिकचीही जबाबदारी आहे. राऊत यांचे निकटवर्तीय नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. बडगुजर हे तिसऱ्यांदा नाशिक महापालिकेत निवडून आले आहेत. सेनेतील जुन्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे सख्य आहे. अशा परिस्थितीत बडगुजर यांचे पारडे जड मानले जात आहे. याशिवाय नाशिक तालुक्याचे नेते जगन आगळे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. आगळे हे कट्टर सैनिक असून नाशिक, सिन्नर या तालुक्यावर त्यांचे प्रभुत्व आहे. नगरसेवक दिलीप दातीर हेदेखील स्पर्धेत आहेत. नाशिक शहरातील बहुचर्चित भंगार बाजार हटविण्यासाठी त्यांनी महापालिकेला भाग पाडले तसेच दोन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. विशेष म्हणजे जिल्हाप्रमुखपदाच्या शर्यतीत असलेले तिघेही इच्छुक एकाच गटातील असल्यामुळे त्यांच्यात सहमती घडवून आणणे पक्षनेतृत्वाला सहज शक्य आहे. या आठवड्याभरात यासंदर्भातील घोषणा होण्याची दाट शक्यता व्रक्त केली जात आहे.
 
जिल्हाप्रमुख बदलणार!
 
शिवसेनेच्या शहर नेतृत्वात खांदेपालट केल्यानंतर आता जिल्हा शिवसेनेच्या नेतृत्वातही बदल करण्याचे संकेत मिळू लागले असून, यासाठी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय जगन आगळे व नगरसेवक दिलीप दातीर यांच्याही नावांची चर्चा होऊ लागली आहे
 
@@AUTHORINFO_V1@@