राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाजपच्या प्रचारात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |

कार्यकर्त्यांचा भाजपमध्रे प्रवेश

 
 
 
 
उल्हासनगर : दि. ६ एप्रिल रोजी होणार्‍या प्रभाग क्रमांक १७(ब)च्या पोटनिवडणुकीत एकीकडे शिवसेना-रिपाइं आठवले गटाने राष्ट्रवादीला समर्थन दिले असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक सतरामदास जेसनानी हे भाजपच्या प्रचारात उतरल्याने या निवडणुकीला धक्कादायक वळणाची कलाटणी मिळाली आहे.
 
बोगस जातप्रमाणपत्राबाबत राष्ट्रवादीच्या पूजा कौर लबाना यांचे नगरसेविकेचे पद रद्द झाले आहे. त्यामुळे प्रभाग १७ मध्ये दि. ६ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी उमेदवार सुमन सचदेव यांना पाठिंबा दिल्याने या निवडणुकीला चुरशीचे वळण मिळाले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी महिला प्रवर्गातून पूजा कौर या राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. मात्र त्यांचे ओबीसी जातप्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार पराभूत काँग्रेस उमेदवार जया साधवानी यांनी जातपडताळणी समितीकडे केल्याने आणि त्यात तथ्य आढळल्याने पूजा कौर यांचे पद रद्द झाले आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या जया साधवानी, भाजपच्या साक्षी पमनानी, राष्ट्रवादीच्या सुमन सचदेव व अपक्ष सुरेखा सोनवणे या चार महिला उमेदवार रिंगणात आहेत. शिक्षिका साक्षी पमनानी रा टीम ओमी कलानी यांच्या कोट्यामधून भाजपच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. साईपक्षाने पमनानी यांना जाहीर पाठिंबा दिला असून ओमी कलानी, भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, भाजपमधील ज्येष्ठ माजी नगरसेवक बच्चाराम रुपचंदानी, प्रकाश माखिजा, नगरसेवक किशोर वनवारी, राजेश वधारिया यांच्यासोबत राजा गेमनानी, रोशन वलेचा अशी फळी प्रचारात एकवटली आहे.
 
शिवसेना व रिपाइं आठवले गटाने राष्ट्रवादीच्या सुमन सचदेव यांना पाठिंबा जाहीर केल्याने उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण, रिपाइं जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, राष्ट्रवादीचे सभापती भरत गंगोत्री आदींनी राष्ट्रवादीला निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. या प्रभागात शिवसेना गटनेते रमेश चव्हाण यांचे कमालीचे प्रस्थ असल्याने राष्ट्रवादीला त्यांचा फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र, राष्ट्रवादीतील काही कार्यकर्ते हे भाजपमध्ये आल्याने आणि सातत्याने निवडून येणारे ज्येष्ठ नगरसेवक सतरामदास जेसनानी हे ओमी कलानी यांच्यासोबत प्रचारात उतरले आहेत. त्यामुळे अनपेक्षित अशी धक्कादायक कलाटणी या निवडणुकीला लागली असून राष्ट्रवादी की भाजप की पुन्हा काँग्रेसच्या जया साधवानी? या सवालाने प्रभाग १७ चे वातावरण ढवळून निघाले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@