‘संस्कृत भारती’साठी समर्पित व्यक्तिमत्त्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |
 

 
संस्कृत भाषा ही आपली आद्यभाषा आहे, भाषांची जननी आहे, असा केवळ प्रचार-प्रसार न करता त्यासाठी अनेकविध उपक्रम राबविणारे व्यक्तिमत्व म्हणजे ‘संस्कृत भारती’चे डॉ. गजानन आंभोरे गुरुजी.
 
आपल्या गरजा भागल्यानंतरही एखाद्या कार्यासाठी वाहून घेणारी माणसे तशी मोजकीच. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारात मात्र अशी सेवाभावी वृत्तीची नि:स्पृह माणसे मोठ्या प्रमाणावर आढळतात. परिवाराच्या विविध शाखांमध्ये ते शांतपणे आपापले कामकरताना दिसतात. त्यांना ना मोठेपणा हवा असतो ना मान, ना पैसा अडका. अशाच समर्पित व्यक्तिमत्वांत ‘संस्कृत भारती’चे प्रांत मंत्री डॉ. गजानन वामनराव आंभोरे गुरुजी यांचा समावेश करावा लागेल. दि. ९ सप्टेंबर १९६५ रोजी जन्मलेल्या आंभोरे गुरुजींचे मूळगाव बुलढाणा जिल्ह्यातील, चिखली तालुक्यातील, एकलारे. तेथील तत्कालीन प्रांत संघचालक बांडगुळे यांच्यामुळे गावात, घरात संघकार्य सुरु झाले. गुरुजी संत गजानन महाराजांचे निस्सीम भक्त. घरात वारीची परंपरा. बारावीनंतर आळंदी येथील वै. मामासाहेब दांडेकर यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या जोग महाराज कीर्तन महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्याच वेळी एका हितचिंतकाच्या सल्ल्यानुसार संस्कृतमध्ये पदवी मिळवण्याचा निर्णय घेतला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृतमध्ये बी. ए. करण्यासाठी नाव नोंदविले. दोन्ही अभ्यासक्रम एकाच वेळी पूर्ण झाले. त्यानंतर बी.एड्‌साठी अर्ज केला.
 
नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या बी.एड्. कॉलेजात नंबर लागला. त्यामुळे नाशिकशी ओळख झाली. बी.एड्. झाल्यावर १९९५ मध्ये सटाण्यात जिजामाता विद्यालयात संस्कृत शिक्षक म्हणून गुरुजी रुजू झाले. त्यानंतर त्यांनी एम. ए. देखील केले. ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने आपल्याला यश मिळाले, अशी भावना मनात ठेवून त्यांनी संस्कृत प्रसाराचा ध्यास घेतला. सटाण्यात विनामूल्य संस्कृत संभाषण शिबिरे घेण्यास सुरुवात केली. २० वर्षांत शंभरपेक्षा जास्त शिबिरे झाली आहेत. पत्नी संगीता गजानन आंभोरे या देखील बुलढाण्यातीलच. त्यांचे शिक्षण बी.एस्सी. झालेले. त्यांना देखील संस्कृत शिबिराच्या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण झाली. त्यांनी संस्कृत बी.ए. करून, बी.एड्. केले व संस्कृत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. नाशिकमध्ये या कामाचा विस्तार व्हावा, म्हणून गुरुजींनी नाशिकला बदली करून घेतली. तेव्हापासून त्यांचे नाशिकला दर महिन्याला दहा दिवसाचे मोफत संस्कृत संभाषण शिबिरे घेण्याचे व्रत अविरतपणे सुरु आहे. कामाच्या व्यापामुळे त्यांना एखादा दिवस शिकवता आले नाही, तर पत्नी संगीताताई शिबीर घेतात. अनेकदा त्या पूर्ण शिबिराचा भार स्वत:च्या खांद्यावर उचलतात. त्यांनी आपल्या मुली राधिका आणि वेदिका यांनादेखील संस्कृत शिकवले असून त्यांचे संपूर्ण कुटुंबच संस्कृतमध्ये उत्तम संवाद साधते. सध्या बी. ए. संस्कृत आणि योग यांचा अभ्यास करत असलेली राधिकादेखील संस्कृत संभाषण शिबीर घेते, तर सातवीत असलेली वेदिका हरिद्वार येथील स्वामी रामदेव यांच्या आर्य कन्या शाळेत शिक्षण घेत आहे. ‘संस्कृत कुटुंब’ अशी ‘संस्कृत भारती’ची संकल्पना ते प्रत्यक्षात राबवत आहेत. ‘संस्कृत कुटुंब’ असे दोन दिवसांचे शिबीरदेखील ते घेतात. त्यात पती-पत्नी दोघेही सहभागी असावेत अशी मात्र अट असते. गुरुजींनी आज दोन-अडीच हजार व्यक्तींना संस्कृतची दीक्षा दिली आहे. पुढे त्यातून संस्कृतचे शिक्षण घेऊन, त्यातील १०-१२ जणांना नोकर्‍यादेखील लागल्या आहेत.
 
शिबिरात डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे विविध लोक सहभागी होतात. एक व्यक्ती असली तरी शिकवायचे, असे गुरुजींचे धोरण. कधी कधी ५०-५० जणदेखील येतात. शिकवण्याचे काम करीत असताना गुरुजींनी स्वतः अध्ययनाकडेदेखील तितकेच लक्ष दिले आहे. पुण्याचे डॉ. रवींद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मांडुक्य उपनिषद आणि अमृतानुभावातील आध्यात्मिक विचारांचा चिकित्सक अभ्यास या विषयांवर पी.एच.डी. संपादित केली आहे. एक अत्यंत महत्त्वाचे उपनिषद आणि मराठीतील कठीण समजला जाणारा ज्ञानदेवांचा ग्रंथ यांचे विवेचन करून, त्यांनी मोठेच कार्य केले आहे. पुस्तक रूपानेदेखील ’गौडपादकारिका आणि अमृतानुभावातील अद्वैत विचार’ या नावाने त्यांनी या प्रबंधाचे प्रकाशन केले असून, याबरोबरच ’संस्कृतसरिता’, ’संस्कृतगंगा’ ही पुस्तकेदेखील प्रकाशित केली आहेत. व्याख्याने, प्रवचने, कीर्तनेदेखील ते करतात. संघटनात्मक कामांत त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. त्यांनी २०१२ मध्ये नाशिकच्या ’मुक्तिधाम’ मध्ये संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संमेलन घेतले होते. तेव्हा कार्यकारिणीची बैठक गुरुजींच्या अशोकस्तंभावरील घरी झाली होती. देशातील नामवंत संस्कृततज्ज्ञ त्यांच्या घरी आले होते. ’’आता लोकांना संस्कृतची गोडी लावायची असेल, तर संस्कृत ही विज्ञानाची भाषा आहे, हे सांगायला हवे,’’ असे गुरुजी सांगतात.
 
कोणतेही आधुनिक ज्ञान संस्कृतमध्ये आणता येऊ शकते, तसेच पूर्वी देखील संस्कृतात व्यापक लेखन झाले आहे. संस्कृत आणि विज्ञान यांचा अन्योन्य संबंध उलगडून दाखवणारे प्रदर्शन विविध संस्कृत संमेलनांत आयोजित केले जाते. नुकतेच जिल्हा संस्कृत संमेलन भोसला मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात झाले तेव्हा हे असेच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. गुरुजींच्या कार्याबद्दल टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना ‘आदर्श संस्कृत शिक्षक’ म्हणून गौरवले आहे. तसेच पावणेदोनशे वर्षे जुन्या सार्वजनिक वाचनालयाने त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ दिला आहे. संगीता आंभोरे यांना महाराष्ट्र सेवा संघातर्फे २०१७च्या नोव्हेंबरात अलीकडेच ‘संस्कृत भाषा प्रचार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. आंभोरे कुटुंबाचे संस्कृत प्रसाराचे काम अतुलनीय असून त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा!
 
 
 
 
 
- पद्माकर देशपांडे 
 
@@AUTHORINFO_V1@@