समर्थ रामदास - टीका आणि टीकाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2018
Total Views |
 

 
समर्थ रामदासांनी नि:स्पृह महंत तयार करुन, त्यांना दूरवर पाठवून दिले होते. सत्ता म्लेंच्छांची असली, तरी या महंतांना आपली धार्मिक कृत्ये सांभाळून, समाज प्रबोधनाचे काम करावे लागे. लोकांना हिंदवी स्वराज्यासाठी अनुकूल करुन घेऊन, त्यांना शिवाजी महाराजांकडे कसे वळवता येईल हे या महंतांना बघावं लागे. स्वामीनिष्ठ पिढी तयार करण्याचे अवघड कामया महंतांनी निःस्पृहपणे रामदासांच्या आज्ञेने केले. ठराविक काळानंतर या महंतांना चाफळला जाऊन केलेल्या कार्याचा आढावा समर्थांना द्यावा लागत असे. अत्यंत कठीण परिस्थितीत अलौकिक कार्य करणार्‍या रामदास स्वामींचा वसा त्यांच्यानंतर तत्कालीन समस्यांशी एकरुप होऊन समर्थपणे चालवणारा कोणीही समर्थ शिष्य नंतरच्या काळात झाला नाही. समर्थांची कार्यपद्धती एकमेवाद्वितीय राहिली. तसे त्यांच्या पश्र्चात झाले नाही. समर्थांच्या निर्वाणानंतर त्यांच्या शिष्यांनी पूजाअर्चा, धार्मिक परंपरा कटाक्षाने पाळल्या आहेत. तरीही संघटनाचातुर्य, राष्ट्रधर्म, क्षात्रधर्माचे उद्दीपन या रामदासांच्या क्रांतिकारक विचारांची परंपरा खंडित झाली. समर्थशिष्यांनी धर्माच्या आणि राजकारणाच्या पडत्या काळात चाफळ, सज्जनगड परळी, शिवथर घळी, टाकळी मठ इत्यादी परिसर मुघलांच्या आक्रमणापासून वाचवले. तथापि, नंतरच्या काळात या संघटना व्यक्तिमाहात्म्यावर उभारल्या गेल्या. लोकसंग्रहाचा, संघटनेचा, समाज प्रबोधनाचा राष्ट्रीय कार्याचा बाणा त्यांच्यात राहिला नाही. प्रसिद्ध साहित्य-समीक्षक प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ’‘असल्या रामदासी मठांचे अधिकारी मिरासदार बनले. मठाच्या जमिनी सांभाळण्यात आणि कोर्टकचेर्‍या करण्यात त्यांनी हयात घालवली. त्यामुळे संप्रदायातील एकनिष्ठा, कणखरपणा, पृथगात्मकता, उरली नाही.’’(संदर्भ- प्राचीन मराठी साहित्याचे स्वरुप)
 
केवळ समर्थ रामदास स्वामींचा विचार केला तर ते शिवकालीन राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा आकांक्षांशी पूर्णपणे समरस झाले होते. असे असले तरी समर्थ रामदासांच्या राजकारण आणि धर्मकारण समरसतेविषयी टीकाकारांत मतभिन्नता आहे. काही टीकाकारांच्या मते, शिवाजी महाराजांच्या ‘स्वराज्य’ विषयक राजकारणाशी रामदासांचा काहीही संबंध नव्हता, तर काही समालोचक रामदासांना ‘ब्राह्मणांचे कैवारी’ ठरवून त्यांना सामाजिक व सांस्कृतिक उन्नतीपासून तोडू पाहतात. काहींनी तर समर्थ रामदास म्हणजे देवळे बांधत सुटलेले व लोकांना पूजाअर्चा, आरत्या शिकवणारे धर्मपुरोहित म्हणून त्यांची संभावना केली. हे करण्यामागचा सर्व खटाटोप रामदासांना शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यापासून वेगळे दाखवण्यासाठीचा आहे. टीकाकारांनी खोडसाळपणे केलेली ही विधाने धादांत खोटी व अतार्किक आहेत, हे नव्याने सांगायची जरुर नाही. थोडक्यात, समर्थांना शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यापासून आणि समाजाच्या सांस्कृतिक उन्नतीच्या कार्यापासून वेगळे दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या टीकाकरांनी चालवला आहे. पण, सत्य फार काळ दडून राहत नाही. अनेक अभ्यासकांनी विद्वानांनी त्यांच्या साहित्यातून या विधानांचा समाचार घेतला आहे.
 
या कुत्सित टीकाकारांची ही परंपरा अनेक वर्षांपासून ते आजतागायत पाहायला मिळते. परंतु, केवळ विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही उठावे आणि स्वत:ची लायकी नसताना रामदास स्वामींबद्दल वाटेल ते बरळावे हे निश्चितच निषेधार्ह आहे. ही अतार्किक टीका आम्ही सहन करीत असतो, कारण त्यांना योग्य ते उत्तर वेळीच दिले जात नाही. वारकरी पंथ जसा पूर्ण एकजुटीने संत तुकारामांच्या पाठीशी उभा आहे, तसा समर्थ संप्रदाय एकजुटीने रामदासांच्या मागे उभा राहत नाही. तुम्हाला आठवत असेल, काही वर्षांपूर्वी आनंद यादव यांनी संत तुकाराममहाराजांच्या जीवनावर आधारित एक कादंबरी लिहिली होती. त्यातील एक पात्र तुकारामांच्या स्वभावधर्माशी मेळ खाणारे नव्हते. त्यातील भाषा वारकर्‍यांना आवडली नाही. त्यावेळी सर्व वारकर्‍यांनी मोर्चे काढून त्या कांदबरीचा जाहीर निषेध केला. अखेरीस प्रकाशकांना ती कादंबरी मागे घ्यावी लागली. आनंद यादव यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गमवावे लागले. वारकरी पंथाच्या एकजुटीचा हा आदर्श समर्थ संप्रदायाने आणि रामदासांवर प्रेमकरणार्‍या सर्वांनी अंमलात आणावा, तरच टीकाकारांच्या या बाष्कळ बडबडीला आळा बसेल.
 
आज महाराष्ट्रात अनेक दासबोध मंडळे आहेत. त्यांची निश्र्चित संख्या आणि माहिती कोठेही उपलब्ध नाही. या मंडळांची सूची बनवण्याची व त्यांना एकत्र आणण्याची आज गरज आहे. ही दासबोध मंडळे निदान रामदासांवरील खोटे आरोप करणार्‍यांचा निषेध करु शकतात. रामदासांवरील होणार्‍या टीकांचे स्वरुप जातीयवादी आणि दासबोध आदी ग्रंथातील विचारांवरील आहे. आज चातुर्वर्ण्य व्यवस्था कालबाह्य झाली आहे. पण, साडेतीनशे वर्षांपूर्वी रामदासकालीन लोकांनीही ती मानायला नको होती, असा आग्रह धरणे हे कालविपर्यासाचे लक्षण आहे. काही टीकाकार दासबोध पूर्ण न वाचताच टीका करतात. रामदासांनी मूर्खांची लक्षणे सांगताना या प्रवृत्तीचे उल्लेख केले आहेत. ‘समूळ ग्रंथ पाहिल्याविण| उगाच ठेवी जो दूषण|’, (दा. २.१०.८) किंवा ‘अक्षरे गाळून वाची| कां ते घाली पदरची|’ (दा. २.१०.७०) यांना मूर्खांच्या गटात बसवले आहे. रामदासांच्या काळीही त्यांच्यावर टीका होत असावी. पण, या टीकाकारांना रामदासांनी,
 
‘नरे मत्सरे पामरे पापरुपे|
अती कर्कशी जल्पती वागजल्पे|
तया वाजटा मर्कटा कोण पुसे|
सदा सर्वदा भूंकती श्वान जैसे।।‘
असा सणसणीत टोला लगावायलाही कमी केले नाही!
 
  
रामदासांचे महान कार्य व कर्तृत्व ठळकपणे समाजापुढे मांडून त्यांचे आदराचे स्थान त्यांना मिळवून देणे, हे रामदासांवर प्रेमकरणार्‍या सर्वांचे कर्तव्य आहे.
 
 
 
 
- सुरेश जाखडी 
 
@@AUTHORINFO_V1@@