जलयुक्त अभियान, गाळमुक्त अभियानाला जिल्ह्यात गती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
नाशिक : जिल्ह्याला जलसमृद्ध करण्याच्या दृष्टीने आगामी काळात जलयुक्त अभियान, गाळमुक्त अभियानाला गती देण्यात येणार असून एप्रिल आणि मे महिन्यात या कामांवर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचा मनोदय जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला.
 
अधिक माहिती देताना ते म्हणाले की, ’’शासनाने शेतकर्‍यांना दिलासा देण्याची भूमिका घेऊन गाळमुक्त तलाव-गाळयुक्त शिवार हे अभियान हाती घेतले असून त्याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा आणि तलावातील पाणीसाठा वाढविण्यासह शेतीही समृद्ध करावी, याकरिता जिल्हा प्रशासन जनजागृती मोहीम राबविणार आहे. याकरिता इंधन खर्चाचा निधीही शासनाकडून मंजूर करण्यात आला असून यामुळे गावातील युवकांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे.’’
 
तसेच यंदा ’सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धे’चा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ आहे. ‘सत्यमेव जयते वॉटरकप’ स्पर्धा ४५ दिवस चालणार आहे. स्पर्धेत गावकरी श्रमदानाने तसेच मशीनच्या साहाय्याने जलसंधारणाच्या रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करतात. याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत सहभागी गावांना सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
जिल्ह्यात किऑक्स बसविणार
 
शेतकर्‍यांना ऑनलाईन सातबारा देण्याबरोबरच त्यांना किऑक्सद्वारेही २४ तास सातबारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात किऑक्स बसविण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना मोबाईल रिचार्ज, एटीएम, पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. एकप्रकारे मिनी बँकेचीच सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
सिन्नर-शिर्डी मार्गाला देणार गती!
  
सिन्नर-शिर्डी या ५१ कि. मी. चौपदरी महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी ८८० कोटींची टेंडर नोटीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढली आहे. याकरिता भूसंपादनाचे दरही लवकरच जाहीर होणार आहेत. त्यामुळे या चौपदरीकरणाच्या कामालाही गती देण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@