प्रमोद कांबळेच्या स्टुडिओचे काय झाले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018   
Total Views |
गेल्या आठवड्यात तापमान वाढू लागले. उन्हाळा खर्‍या अर्थाने आता सुरू होतो आहे, हे दिसत होते. हवामानखात्याने, उष्णतेची लाट येणार असा अंदाज वर्तविला होता आणि काय गंमत! तो खरा ठरला. ठाण्यात तर चक्क 45 च्या आसपास पारा चढला होता. विदर्भातही 42 अंश सेल्सियसचा आकडा उन्हाने गाठला होता. उन्हे अशी तापत असताना राजकीय आणि सामाजिक वातावरणही तापले होते. अॅट्रॉसिटीच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दलित बांधव तापले होते, असे चित्र बघायला मिळाले. निर्णय कोर्टाचा होता. त्यात कुठल्याही समाजाचा, संघटनेचा अन्‌ सरकारचा काहीही संबंध नव्हता. तरीही ‘बांधवां’नी बांधवांच्याच गाड्या वगैरे जाळल्या. हा 2018 चा उन्हाळा आहे. पुढच्या म्हणजे 2019 च्या उन्हाळ्यात मतदानाचा अधिकार असलेले सगळेच एकतर मतदानाच्या रांगेत लोकशाही टिकविण्यासाठी पवित्र की काय असे कर्तव्य बजाविण्यासाठी उभे असतील. धर्म, जात, पंथविरहित मनाने विचार करून मतदानाचे कर्तव्य बजावलेच पाहिजे, असे एकमेकांविरुद्ध लढणारे सारेच नेते, आवाहन करत असतील. तारखा अलीकडे- पलीकडे होऊ शकतात, त्यामुळे या काळात देशात कुणाचे पुन्हा सरकार असेल, हेही नक्की झालेले असू शकते. निवडणूक जात, धर्म न आणता लढली गेली पाहिजे, असे सारेच म्हणत असताना, मतदारांच्या काळजाला मात्र अशा ढोंगी अस्मितांचीच साद घातली जात असते. आता त्याची तयारी सुरू झालेली आहे. ‘अॅट्रॉसिटी तो बहाना हैं, आरक्षण मिटाना हैं’ असा संदेश पोहोचविण्यात आला. त्याला अंडर करंट असे म्हणतात. वास्तवात तसे काहीच नसताना बघता बघता वातावरण पेटले. भडका उडाला आणि रस्त्यावर, दुकानांत पेटवापेटवी झाली. 9 जणांचा बळीही गेला...
 
 
विषय तो नाही. या दिवसांत अशा आगी लागतच असतात. उन्हं पेटायला लागली की मग पाणी कमी होते. ओलावा कमी होतो. सारेच कसे शुष्क होते आणि मग थोडीही धग लागली की आगी लागतातच. तशा आता लागत आहेत. मागच्याच महिन्यात मुंबईत हॉटेलची इमारत पेटली होती. त्यानंतरही कोलकाता आणि इतरही शहरांत अशा आगीच्या घटना घडल्या. उन्हाळा नैसर्गिक असो की राजकीय, वातावरण तापते आणि ओलावा कमी होतो. आगी लागतातच. त्या अर्थाने म्हणण्यापेक्षा सर्वार्थाने हे दिवस असे पेटवापेटवीचे अन्‌ आगीचे आहेत.
 
 
हॉटेल हा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याचा विमा असतो. बँकांचे कर्ज असते, त्यामुळे इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणांपासून सारेच असते, तरीही आगी लागतात. मात्र, विमा असल्याने हॉटेल्स पुन्हा उभे राहू शकते. उमेद खचू दिली नाही तर काहीही पुन्हा उभे राहू शकते. मात्र, काही आगी परवडणार्‍या नसतात. अशीच एक जिव्हारी लागलेली आग म्हणजे अहमदनगरचे चित्रकार, शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओला लागलेली आग. कलावंतांची निर्मिती त्याची वैयक्तिक असली, तरीही त्यावर सकल समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणा उभ्या झालेल्या असतात. संस्कृती ही कलेतूनच निर्माण होत असते. त्यामुळे प्रमोद कांबळे यांच्या कला स्टुडिओला लागलेली आग सखोल अर्थाने भीषण होती. एका नव्या चित्राची अन्‌ शिल्पाची निर्मिती करणे, ही त्या कलावंताची वर्षानुवर्षांची साधना असते. त्यातून ती निर्मिती झालेली असते. ती केवळ त्या कलावंताची वर्तमानातली साधना असते, वैयक्तिक असे काही असते, असे अजीबातच नाही. अनेक पिढ्या त्या शैलीसाठी, त्या कलेच्या प्रकारासाठी खपलेल्या असतात. त्यांचा कलेचा वारसा समोर चालवीत असताना त्यात आपली भर नवी कलावंतांची पिढी घालत असते. त्यामुळे अशा कलाकृतींची भौतिक किंमत काय लावली जात असेल तर ती लावली जाऊ शकते, मात्र त्याचे मूल्य खूप मोठे असते. माणसांच्या अनेक पिढ्यांना त्यांच्या भौतिक भुका आणि केविलवाणे स्वार्थ यांच्या पलीकडे जाऊन माणसांना माणूस म्हणून कसे जगायचे आणि विचार करायचा, हे कलावंतांची निर्मितीच शिकवीत असते. त्यामुळे कांबळे यांच्या जळालेल्या कलाकृतींमुळे समाजाचे, राष्ट्राचे काय नुकसान झाले, याचा अंदाजच बांधता येत नाही.
  
कलावंत मात्र आपल्याच धुनकीत असतात. कलेच्या शाश्वत अशा अवकाशात ते विलीनच झालेले असतात. निर्मिती केली की ती समाजाची असते, असाच एकुणात त्यांचा भाव असतो. म्हणून मग ते त्यांच्या सुरक्षेचा विचार करत नाहीत. कलाकृतींचा स्टुडिओ कधीही जळू शकतो, याचा कुणी विचारही करीत नाही. कलाकारांनी त्याचा विचार करायला हवा, असे बॉम्बे आर्ट सोसायटीचे चंद्रजीत यादव म्हणाले. अशा दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला जातो तेव्हा मात्र त्याचा विमा काढला जातो. वस्तुसंग्रहालयातून वस्तू दुसरीकडे नेत असताना त्यांचा विमा काढला जात असतो. अर्थात्‌, एखाद्या प्रख्यात कलाकृतीचा विमा काढला तरी नेमके काय होणार? तीच कलाकृती जशीच्या तशी पुन्हा तयार करता येत नाही. निर्मात्याचे तसेच असते. त्याची एक निर्मिती दुसरीसारखी नसते. एक माणूस कधीच दुसर्‍यासारखा नसतो.
 
एका चित्रकार, शिल्पकाराचा स्टुडिओ जळाला, तर त्यात इतके हळहळण्यासारखे ते काय, असा सवाल आजच्या काळात अगदी सहजच पडू शकतो. आमच्या कलासांस्कृतिक जाणिवा समृद्ध नाहीतच, हे हजारो वर्षे सिद्ध होते आहे. आम्ही तुकारामाची गाथा पाण्यात बुडविली. अनेक आक्रमकांनी जुनी शिल्पं, ग्रंथ, चित्र यांची तोडफोड केली. त्यामागे धारणा हीच की, कलाकृती या संस्कृती पुन्हा उभी करू शकतात. मातीची जाणीव पुन्हा निर्माण करू शकतात. आक्रमकांना केवळ राज्यच करायचे नसते, तर त्यांना आपला धर्म, आपली संस्कृती थोपवायची असते. अंतिम सत्य हे केवळ आम्हाला गवसले आहे, असे प्रत्येकच धर्माला वाटते आणि त्याच्या प्रसारासाठी ते आक्रमक होतात. येणारे आक्रमक हे राज्यकर्ते वाटत असले, तरीही ते धर्मकर्तेच होते. त्यामुळे त्यांनी मंदिरातील शिल्पं तोडलीत, देवतांच्या दगडी मूर्ती त्यांचे काय बिघडविणार होत्या? मात्र, त्यातून स्फुलिंग कधीही चेतविले जाऊ शकते, हे त्यांना माहिती होते... अशा प्रवासातही कलाकृती शिल्लक राहिल्या. कला विकसित होत राहिली. हा देश एक संस्कृती म्हणून घडत राहिला. हा देश आणि या देशाचा धर्म यांनी कधीही आक्रमणे केली नाहीत, कारण या देशाचा धर्म ही संस्कृती आहे. धार्मिक वाटणारे ग्रंथही उत्तम साहित्यकृती आहेत, देवतांच्या मूर्ती आणि देवालयेदेखील कलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. त्या कलाकृती आहेत म्हणूनच त्यांचे दर्शन कुठल्याही धर्माच्या रसिकाला होऊ शकते. पुन्हा एकदा सांगून टाकावेसे वाटते की, पाहणे आणि दर्शन घेणे यात फरक आहे.
आता देश उभा करणे, एक संस्कृती, एकजीनसी अशी कला यांच्यात बांधणे ही काही गंमत नाही. या देशाचे सत्ताधारी चुकू शकतात, मात्र त्यांनी देश म्हणून त्यांच्या डोक्यात जे काय आहे, ते घडविण्याचाच प्रयत्न केला आहे. जनतेनेही सत्ताधार्‍यांच्या विरोधातला आक्रोश हिंसकपणे व्यक्त करू नये, यासाठी एका महात्म्याने अिंहसेचा मंत्र दिला. कारण शासक परकीय असले, तरीही हा देश मात्र आपला आहे आणि आंदोलनांच्या हिंसक वळणांनी तो उद्ध्वस्त होऊ नये, ही शहाणूक त्यामागे होती. त्या काळात गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर हे दोन क्रांतिपुरुष या देशानं जगाला दिले. एकाने राजकीय क्रांती केली आणि दुसर्‍याने सामाजिक, सांस्कृतिक क्रांती केली. मात्र, दोघांनीही हा देश आपला आहे, या देशाची चल, अचल, वैचारिक, सांस्कृतिक संपत्ती आपली आहे, याचे भान ठेवत हिंसक आंदोलने कधीच केली नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली या देशाला अन्‌ सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे, हे ठरविले. आता त्यांचा वंशजच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन पेटवितो अन्‌ सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो... हे सगळे सुरू असताना प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओचे काय झाले, हा सवाल नव्या पिढीच्या आंबेडकरांनाही पडायला हवाच ना... कारण, सत्ता हवीच असली तरीही ती शाश्वत नसतेच...!
@@AUTHORINFO_V1@@