सेल्फीचा धसका...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |



 
 

संसदेत प्रश्न विचारला जावा व गृहराज्यमंत्र्यांना त्यावर उत्तर द्यायला लागावे इतके सेल्फीचे वेड वाढले आहे. रशियातही सरकारने सेल्फी कसे काढू नये, अशा आशयाची पत्रके प्रकाशित केली आहेत. त्यामुळे माहिती-तंत्रज्ञानाचा महापूर आल्यानंतर एकंदरीतच बदलत जाणार्‍या जीवनशैलीकडे म्हणून या विषयाकडे पाहिले पाहिजे.

अरे सुनबाईला काय झाले पाहा. तिने तोंडाचा चंबू केलाय आणि हातपाय वाकडे केलेत.’’ यावर मुलगा म्हणतो, ‘‘आई, चिंता करू नकोस, ती सेल्फी काढातेय.’’ हा व्हॉट्‌सऍपवर खूप फिरलेला संदेश. यातला विनोदाचा भाग सोडला तरी सेल्फीचे वेड आता इतक्या स्तरावर पोहोचले आहे की, त्यावर संसदेत प्रश्न विचारले जात आहेत. सध्या चालू असलेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना या प्रश्नाचे उत्तरही द्यावे लागले. याचे मुख्य कारण म्हणजे, सेल्फी काढताना मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे आकडे. या प्रश्नाचे उत्तर देताना हंसराज अहीर म्हणाले की, ‘‘नागरिकांचे रक्षण ही राज्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे ‘सेल्फी काढण्यास मनाई’ अशा आशयाची क्षेत्रे जाहीर करावी.’’ कारण, समुद्र किनारे, डोंगर माथ्यावर, साहसी क्रीडा प्रकार खेळणारे हौशी आणि अन्य उत्साही मंडळींनी असे उद्योग करताना आपले प्राण गमावले आहेत. २०१६ साली मुंबईतील बॅण्ड स्टॅण्डला असेच एका मुलीने सेल्फी काढताना आपले प्राण गमावले होते. मागून येणार्‍या मोठ्या लाटेचा झोत तिला तिच्या कॅमेर्‍यात टिपायचा होता. मात्र, या तडाख्यात तिच वाहून गेली व प्राणाला मुकली. नुकतेच ताजमहालजवळ सेल्फी काढताना पडून मृत्यू झालेल्या जपानी पर्यटकाचे प्रकरणही खूप गाजले.

पर्यटनस्थळांवर जाऊन सेल्फी काढण्याचे खूळही मोठे आहे. यामुळे अनेक पंचतारांकित हॉटेल्स, लहान मुलांच्या खेळण्याच्या जागा या ठिकाणी असे ‘सेल्फी पॉंईट’च निर्माण केले जातात. सेल्फी काढण्याची आणि ती मुक्त माध्यमांमध्ये मिरवण्याची सवय समजून घेतली पाहिजे .नीट निरीक्षण केले तर लक्षात येईल की, यात मोठ्या प्रमाणावर पौगंडावस्थेतील मुले असतात. आपले व्यक्तिमत्त्व, लैंगिकता याबाबत समज येण्याचे हे वय. या वयात स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे अतोनात प्रयत्न केले जातात. यातील काही फसतात, तर काही सत्यातही उतरतात. यातूनच युवा वर्ग सेल्फीकडे ओढला जातो. आपल्यापेक्षा मोठ्या, प्रथितयश माणसाबरोबर किंवा सेलिब्रिटीबरोबर फोटो काढण्यातून आपली त्या व्यक्तीबरोबरची जवळीक दाखविण्याचा प्रयत्नही केला जातो.

आता असे सेल्फी काढणारे आणि सोबत सेल्फी काढू देणारे अशा दोन्ही पंथांचे लोक मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहेत. यात सिनेमातल्या नट-नट्या आहेत, राजकारणी आहेत, उद्योजक आहेत. जनसंपर्काचा एक वेगळाच मार्ग म्हणूनही सेल्फीकडे पाहिले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, सेल्फी काढणारे लोक पूर्वी फोटो काढून ते जपून ठेवत, तसे जपून ठेवत नाहीत, तर ते आपल्या मुक्त माध्यमावरील प्रोफाईलवर शेअर नक्कीच करतात. आता या चव्हाट्यावर एकमेकांना आवड किंवा नावड व्यक्त करणारे लोकही तेवढ्याच प्रमाणात असतात. यातून भरपूर फुकटची प्रसिद्धी होते. सोशल मीडियाचा सर्वोत्कृष्ट वापर करणारा राजकारणी म्हणून नरेंद्र मोदींकडे पाहिले जाते. भारतीय राजकारणात सोशल मीडियाच्या वापराचे जनक म्हणूनही मोदींना मानावे लागेल. आपले निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीदेखील मोदी मुक्त माध्यमांचा वापर खुबीने करतात. आपल्या प्रारंभीच्या परदेश दौर्‍यात त्यांनी ज्या ज्या देशांना भेटी दिल्या, तिथल्या महत्त्वाच्या लोकांबरोबर सेल्फी काढले व आपल्या ट्विटर अकांऊटवरून प्रसिद्ध केले. त्यांच्या विस्तारणारऱ्या परदेश नीतीसाठी सेल्फीचा करून घेतलेला हा उपयोग अनोखाच मानावा लागेल. त्याच्या टीकाकारांनी त्यांच्यावर या कारणास्तव तोंडसुखही घेतले.

सेल्फीच्या या वेडाने काही मुख्यप्रवाहही बदलले आहेत. पारंपरिक मोबाईल फोनला यामुळे अधिकच्या लेन्स आल्या. सेल्फी काढण्यासाठी प्रकाश अपुरा पडू नये म्हणून अधिकचे फ्लॅश आले. खरं तर ‘सेल्फी’ हा शब्दप्रयोग देखील अशाच बोलीभाषेतून उगवलेला; मात्र सेल्फीचा प्रभाव इतका की, एरव्ही ब्रिटिश काटेकोरपणा पाळणार्‍या ऑक्सफर्ड डिक्शनरीलाही या शब्दाचा समावेश आपल्या नव्या आवृत्तीत करावा लागला. २०१३ साली ऑक्सफर्ड डिक्शनरीने अधिकृतपणे तशी घोषणा करून हा शब्द आत्मसात केला.

अपारंपरिक संवाद माध्यम म्हणून सेल्फीचा उपयोग करणारे अनेक लोक आहेत. मात्र, ज्याच्या सेल्फीत अन्य कुणालाही स्थान नाही, असे लोकही आहेत. निरनिराळ्या देशात आता यावर निरनिराळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत. कुठेही जाऊन केवळ स्वत:चाच सेल्फी काढून मुक्तमाध्यमांवर टाकण्याच्या सवयीला एका वेगळ्याच प्रकारे पाहिले जाते. अशाप्रकारे फक्त स्वत:चेच फोटो टाकणार्‍यांना अमेरिकन सायकिऍट्रिक असोसिएशन मानसिक आजार ठरवून मोकळी होते. अमेरिकन फिजिकल थेरपी असोसिएशनने ‘टेनिस एलबो’ प्रमाणे ‘सेल्फी एलबो’ नावाच्या दुखापतीचाही शोध लावला आहे. सातत्याने सेल्फी काढणाऱ्यांना तो होतो असा त्यांचा दावा आहे. ही जरा अतिशयोक्ती वाटत असली तरीही यावर अभ्यास करणारी मंडळीही कार्यरत आहेत.

 
एकेरी सेल्फी काढण्याच्या सवयींचा जगभरातल्या मानसशास्त्रीय संशोधन करणाऱ्या संस्था गांभीर्याने विचार करीत आहेत. त्यातून येणारा आत्मकेंद्रीत्वाचा भाव, केवळ स्वत:च्याच प्रतिमेत अडकण्याची भीती, स्वत:ची ओळख ठसविण्याचा अतिरेकी प्रयत्न, त्यातून बघणारे मानवी संबंध असे कितीतरी आयाम यात असल्याचे समोर येत आहेत. केवळ अशा संस्था नाहीत, तर सरकारदेखील यात उतरत आहेत. रशियन सरकारने त्यांच्या पर्यटनस्थळांवर प्रबोधन करावे म्हणून सेल्फी कसा काढू नये, या आशयाची पत्रकेही वाटली होती. माहिती-तंत्रज्ञानाचा महापूर आल्यानंतर एकंदरीतच बदलत जाणार्‍या जीवनशैलीकडे म्हणून या विषयाकडे पाहिले पाहिजे. भविष्य कुठल्या दिशेने जाऊ शकते, हे त्याचे प्रतिक आहे.
@@AUTHORINFO_V1@@