अरुणाचलच्या मुलांना महाराष्ट्राच्या मातीतल्या मल्लखांबाची मोहिनी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

समर्थ व्यायाम मंदिरात उदय देशपांडेंच्या मार्गदर्शनात ७२ मुलांना प्रशिक्षण

 



 
मुंबई : महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल कसरतींचा खेळ म्हणजेच मल्लखांब. आता याच मल्लखांबाना भारताच्या उत्तरेला चीनला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशसारख्या दुर्गम-डोंगरदर्‍यांनी, निसर्गसौदर्याने नटलेल्या राज्यालाही मोहिनी घातली आहे. या अतिदुर्गम आणि वनवासीबहुल राज्यामध्ये संख्या आणि दर्जा दोन्हीतही वर्धिष्णू असलेल्या विवेकानंद केंद्र विद्यालयांमध्ये मल्लखांबांनी चांगलेच मूळ धरले आहे. १९८४ पासून त्यावेळचे विवेकानंद केंद्राचे महासचिव बालकृष्ण यांच्या प्रेरणेने इथल्या शाळांमध्ये मल्लखांब प्रशिक्षण सुरु झाले. तेव्हापासून इथल्या विवेकानंद केंद्र विद्यालयात मल्लखांब प्रशिक्षण देण्यात येते. नुकतेच अरुणाचलची राजधानी इटानगरमध्ये झालेल्या नॉर्थ ईस्ट स्पोर्टस् फेस्टिव्हलमध्येही अरुणाचलच्या मुलांनी मल्लखांबाची सुंदर प्रात्यक्षिके दाखवत सर्वांची वाहवा मिळवली होती.
 
गेल्यावर्षी शेर येथील विवेकानंद केंद्र विद्यालयाचे प्रधानाचार्य आर. कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या शाळेतील २० मुलांना मुंबईला आणले होते व दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात दहा दिवस त्यांचे मल्लखांबाचे प्राथमिक प्रशिक्षण झाले. त्या मुलांचे अनुभव ऐकून व त्यांची छायाचित्रे पाहून इतरही बर्‍याच मुलांनी यंदा मल्लखांब प्रशिक्षणासाठी मुंबईला येण्याचा हट्ट केला. त्याचा परिपाक म्हणून यंदा कृष्णमूर्ती यांनी शेर येथील विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या ४० मुलांना आणि १५ मुलींना व दोलुंगमुख येथील विवेकानंद केंद्र विद्यालयच्या १८ मुलांना मुंबईला आणले. त्यांच्याबरोबर ६ शिक्षकही मुंबईत आले आहेत. दि. १ एप्रिलपासून रोज सकाळी ६.३० ते ८.३० व सायंकाळी ५ ते ७ या वेळात त्यांचे पुरलेल्या लाकडी व टांगलेल्या दोरीच्या मल्लखांबावर प्रशिक्षण सुरु झाले आहे. हे प्रशिक्षण दि. १२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. समर्थ व्यायाममंदिराचे प्रमुख प्रशिक्षक व मानद कार्यवाह, शिव छत्रपती व दादोजी कोंडदेव पुरस्काराचे मानकरी उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण सुरु आहे. सोबतच डॉ. नीता ताटके, सचिन मळेकर, वीरेंद्र चमणकर, राष्ट्रीय विजेते मल्लखांबपटू सागर राणे, केवल पाटील, अदिती करंबेळकर, हिमानी परब, आशिका सुर्वे, सायली नारकर, अनुष्का गोली, साक्षी साबळे, सिद्धी ताम्हणकर, हेमांगी सावंत, आस सकमारन, असे अनेक खेळाडू या प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत.
 
समर्थ व्यायाम मंदिराचे प्रमुख उदय देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली की, सध्या या मुलांना मल्लखांबाचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जात आहे. जे प्रशिक्षण द्यायला सामान्यतः ६ महिने लागतात, ते प्रशिक्षण आम्ही १२ दिवसांत पूर्ण करत आहोत.
 
पुढे ते म्हणाले की, मुळात काटक व चिवट शरीरयष्टी आणि अंगभूत धैर्य असल्याने साडे आठ फुटी मल्लखांबावर तोल सांभाळून उभे रहाणे, तिथून खाली गादीवर उडी मारणे, दोरीच्या मल्लखांबावर पद्मासन, पश्र्चिमोत्तानासन, शवासन, एक पाद शिरासन, विपाद शिरासन अशी अवघड आसने ही मुले लीलया साध्य करून दाखवत आहेत.
  
 
 
मल्लखांबाबद्दल उदय देशपांडे यांनी सांगितले की, मल्लखांबामुळे शरीराची कुवत, ताकद संतुलन, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. बुधवार, दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या वतीने या मुलांची मल्लखांब प्रात्यक्षिके शिवाजी पार्कच्या समर्थ व्यायाममंदिरासमोरील पटांगणात होणार आहेत. मुंबईकर क्रीडा रसिकांनी त्या मुलांना कौतुकाची दाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
 
मोठ्या स्पर्धांतही सहभाग नोंदवायचा आहे
 
अरुणाचलच्या विवेकानंद केंद्र विद्यालयात आम्ही मल्लखांब प्रशिक्षण देतो. सध्या मुंबईत उदय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुणाचलातल्या मुलांना एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच मल्लखांब प्रशिक्षण दिले जात आहे. पण हे फक्त प्रशिक्षणापुरते राहायला नको, तर आम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्येही सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण मल्लखांब फेडरेशनची सदस्यता आम्हाला नसल्याने अनेक मोठ्या स्पर्धांत आम्हाला भाग घेता येत नाही, त्यामुळे आम्हाला मल्लखांब फेडरेशनची सदस्यता मिळावी, असे मला वाटते.
 
- आर. कृष्णमूर्ती, प्रधानाचार्य, विवेकानंद केंद्र विद्यालय, शेर
 
मुंबईतले वातावरण आवडले
 
माझ्या आई-वडिलांनी मला इथे प्रशिक्षणासाठी पाठवले. मुंबईत आल्यावर इथले वातावरण पाहून खूप चांगले वाटले. इथे सगळेच आम्हाला नेहमीच मदत करतात, मिळून मिसळून राहतात. याआधी आम्ही प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाला आमच्या शाळांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके करत असू. सोबतच तिथल्या इतर विद्यार्थ्यांनाही आम्ही याची माहिती दिली. यामध्ये आणखी पुढे कामकरण्याची, स्पर्धात भाग घेण्याची इच्छा आहे.
 
- न्गारंग अन्या, प्रशिक्षण घेणारी विद्यार्थीनी
 
इथे आल्याचा आनंद वाटतो
 
आतापर्यंत आम्हाला दोरीवरील आणि खां​​बावरील मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षणासाठी मुंबईत आल्याचा आनंद वाटतो. याआधी दोन वर्षांपूर्वी शाळेत मल्लखांबाची माहिती मिळाली आणि तिथे शिकलोही. इथे येण्याच्या आधी वडिलांना मल्लखांबाबद्दल महिती होती, पण आईला नव्हती. मग वडिलांनी व मी आईला माहिती दिली, त्यानंतर त्यांनी इथे पाठवले. आम्हाला मल्लखांबामध्ये अजूनही प्रशिक्षण घेण्याची आणि स्पर्धेत भाग घेण्याचीही इच्छा आहे.
 
- लिखा तामा, प्रशिक्षण घेणारा विद्यार्थी​​​​​​​​​​​​​​​​​​​
 
@@AUTHORINFO_V1@@