पोटनिवडणूक प्रचार रणधुमाळी आज संपणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

६ एप्रिलला मतदान तर ७ एप्रिलला मतमोजणी

 
 
 
 
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क)च्या पोटनिवडणुकांसाठी शुक्रवारी दि. ६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून बुधवार दि. ४ एप्रिल सायंकाळी ५ वाजता प्रचाराची रणधुमाळी संपणार आहे. पोटनिवडणुकीत मनसे, सेना आणि भाजप उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होत आहे.
 
प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी दि. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीत भाजपच्या विजया हरिश लोणारी, मनसेकडून ऍड. वैशाली मनोज भोसले, शिवसेनेच्या स्नेहल संजय चव्हाण या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. याशिवाय, राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवार व माजी नगरसेवक रंजना ज्ञानेश्वर पवार यांनीदेखील अपक्ष उमेदवारी करत आव्हान दिले आहे.
 
दरम्यान, अपक्ष उमेदवार अवंतिका घोडके यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार असल्याने बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे, अखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग आला असून उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. मोठ्या प्रमाणावर प्रचारपत्रकांचेही वाटप करत मतदारांना आपली भूमिका समजावून सांगितली जात आहे. मनसेसह भाजपने मतदानाच्या दिवशी बूथवर प्रतिनिधींच्या नियुक्त्या केल्या असून मतदान स्लिपचे वाटप बुधवारी-गुरुवारी केले जाणार आहे. पोटनिवडणुकीसाठी एकूण ४७ हजार २२८ मतदार असून त्यात २४ हजार १४० पुरुष तर २३ हजार ८८ स्त्री मतदार आहेत. मतदानासाठी प्रभागात ६१ बुथ उभारले जाणार आहेत.
 
मतदान कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण
 
मतदानासाठी प्रशासनाने मंगळवारी २५० कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेतले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक अधिकारी रोहिदास बहिरम यांनी मार्गदर्शन केले. दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा एकदा प्रशिक्षण घेतले जाणार असून त्यानंतर मतदान साहित्याचे वाटप केले जाणार आहे. मतदानाकरिता प्रशासनाने ७० इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स उपलब्ध केल्या आहेत. त्यातील ९ मशीन्स राखीव ठेवल्या जाणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@