शिक्षणाचे भारतीयकरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |
 
 
 
नाशिकचे महेश दाबक हे भारतीय शिक्षा मंडळचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष आहेत. शिक्षण क्षेत्रामधील त्यांची भरीव कामगिरी, सतत नाविन्यपूर्ण कल्पनांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठीची त्यांची अविरत धडपड नाशिककरांना नवीन नाही. महेश दाबक यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षा मंडळाचे काम पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये सतत वृद्धिंगत होईल अशी आशा आहे.
 
इंग्रज भारतातून गेले मात्र आजही इंग्रजी शिक्षणाचा पगडा भारतीयांवर आहे. उलट काही क्षेत्रांत तो आणखी वाढत असल्याचे दिसते. भारतात उत्तम शिक्षणप्रणाली होती. चांगले शिक्षण देणारे लोक होते, गुरुकुल पद्धती होती तसेच विविध कौशल्ये पारंपरिक व्यवस्थेतून आत्मसात केली जात. ग्रामीण जीवन समृद्ध आणि स्वयंपूर्ण होते. मात्र, नव्या शिक्षणव्यवस्थेमुळे जुनी चांगली व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शिक्षणाचे भारतीयीकरण करण्याची गरज निर्माण झाली. रा.स्व.संघ परिवारातील मंडळींनी हे कार्य हाती घेतले आणि तत्कालीन शिक्षक आमदार मुकुंदराव कुलकर्णी यांच्या पुढाकाराने १९६९ मध्ये रामनवमीच्या दिवशी या संघटनेची स्थापना झाली. त्यापूर्वी शिक्षक संघटना होती. मात्र, शिक्षणाच्या भारतीयीकरणाचा विचार पुढे आणण्यासाठी पूर्णतः शैक्षणिक अशी संघटना असावी, या हेतूने त्यातून हे मंडळ वेगळे काढण्यात आले, असे राष्ट्रीय महामंत्री वामनराव गोगटे (पुणे) यांनी सांगितले. शिक्षणात भारतीयत्व, मातृभाषेत शिक्षण, समान शिक्षण व्यवस्था व ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ही संघटना कार्यरत आहे. सध्या नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक कला अकादमीचे सेक्रेटरी सच्चिदानंद जोशी हे मंडळाचे अध्यक्ष आहेत. जोशी हे पत्रकारिता विषयात पीएच. डी. आहेत. मुकुल कानिटकर हे संघटनमंत्री आहेत, तर वामनराव गोगटे महामंत्री आहेत.
 
नाशिकमध्ये रामनवमीस म्हणजे २५ मार्च रोजी प्रांत कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. सुधांशू, पारनेरकर वाडी, संचेती टॉवरच्या मागे, सर्कल सिनेमासमोर नाशिक येथे झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय महामंत्री वामनराव गोगटे, नागपूरचे डॉ. गोविंदराव हडप मंडळाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव महेश दाबक, नाशिक शहर अध्यक्ष प्रा. डॉ. अस्मिता वैद्य, सचिव डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज उपस्थित होते. या कार्यालयाचे पूर्णवेळ कामकाज करण्यासाठी श्रीकृष्ण सर्याम नागपूर येथून आले असून श्रावण सूर्यवंशीदेखील कार्यात सहभागी राहणार आहेत. यावेळी संघ परिवारातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
 
संघटना स्थापन झाली त्यावेळी मुकुंदराव कुलकर्णी यांच्याबरोबर श्रीराम मंत्री, दीनानाथ बात्रा आदी होते. संघटनेला ४८ वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने पूर्ण मंडल ते सुवर्ण महोत्सव या कालावधीत अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. संघटनेचे काम विविध गटांतून सुरू आहे. ‘शैक्षणिक प्रकोष्ठ’ म्हणजे ज्यात अभ्यासक्रम वगैरेंचा समावेश होतो असा गट, माहिती प्रकल्प, शालेय प्रकल्प, युवा गट आणि गुरुकुल अशा विविध गटांचा समावेश आहे. संघटनेचे वीस हजारांहून अधिक सभासद असून भारतातील विविध भागांत सर्व प्रांत आणि जिल्ह्यात त्यांनी जाळे विणले आहे. संघटनेचे आजीव सभासद होण्यासाठी ५०० रु. तर वार्षिक सदस्य होण्यासाठी १०० रु. शुल्क आहे.
 
त्यात नुकताच प्रख्यात विचारवंत धर्मपाल यांच्या समग्र साहित्याचा विविध भारतीय भाषांत अनुवाद करण्याचा मोठा उपक्रम मंडळाने पूर्ण केला. सध्या मंडळाने ‘आजच्या संदर्भात भगवद्गीता’ हा उपक्रम हाती घेतला आहे. आयआयटी कानपूरचा सुवर्णमहोत्सवी दीक्षान्त समारंभ नुकताच पार पडला. या दीक्षान्त समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या इतिहासात प्रथमच पदवी स्वीकारताना इंग्रजांच्या गुलामगिरीचे प्रतीक असलेला गाऊन घालण्यास विरोध करताना, शुद्ध भारतीय वेश परिधान करून पदव्या स्वीकारल्या. आजवर दीक्षान्त समारंभात काळा गाऊन आणि काळी हॅट घालण्याची परंपरा पूर्वापार चालत आली होती. त्याला विरोध करण्याची कुणाच्या बाची हिंमत नव्हती! त्याला कारणेही तशीच होती. देशाचे राजकारणच अशा वातावरणाला अनुकूल नव्हते. त्यामुळे दीक्षान्त समारंभात विद्यार्थी भारतीय वेशभूषेत दिसतील, ही कल्पनादेखील करायला कुणी धजत नसत. दीक्षान्त समारंभाला उपस्थित मंडळी, विद्यार्थ्यांना पांढरा कुर्ता, पायजमा आणि गुलाबी उपरण्यात, तर विद्यार्थिनींना सलवार-सूट आणि केशरी रंगाची ओढणी या भारतीय वेशात बघून आश्‍चर्यचकित झाली. हा चमत्कार कसा घडला, अशी चर्चा त्यांच्यातच नव्हे, तर पत्रकारांमध्येही होताना दिसली. पण, आज ना उद्या शिक्षणाचे भारतीयीकरण होणारच होते, असा विश्‍वास येथील राष्ट्रवादी मंडळींना होता. त्याची सुरुवात कानपूर आयआयटीमधून झाली एवढेच. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काही दिवसांपूर्वी शिक्षणाच्या भारतीयीकरणाबद्दल विशेषतः दीक्षान्त समारंभातील इंग्रजी प्राबल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल की, देशाच्या शैक्षणिक क्षेत्रातील लोकांची मानसिकता हळूहळू का असेना बदलू लागली आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि येथे अनेक संस्कृती एकत्र नांदतात. प्रत्येक राज्याची जशी स्वतंत्र वेशभूषा आणि ओळख आहे, तशीच प्रत्येक राज्याची भाषासुद्धा स्वतंत्र आहे. शिक्षणाचे भारतीयीकरण करणे म्हणजे काय, तर स्थानिक संस्कृतींचा गौरव करणे, परंपरांचे पालन करणे आणि वैविध्याचा प्रचार-प्रसार करणे होय. दीक्षान्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीच नव्हे, तर शिक्षकांनीदेखील भारतीय परंपरेला साजेशी वेशभूषा केली होती.
 
विशेष म्हणजे हा सारा ड्रेसकोड विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासनाच्या सर्वसंमतीने मंजूर झाला होता. केवळ आदेश देऊन जे झाले नसते ते एकमेकांच्या सहमतीने सहजपणे साध्य झाले. यालाच म्हणतात भारतीय विचारपद्धती! एकदा सर्वानुमते निर्णय झाला की, त्याचे पालन करायचे, ही झाली भारतीय शिस्त. भारतीयता म्हणजे वेगळे काय असते? भारतातील तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रगण्य संस्थेने दीक्षान्त समारंभातून तो आदर्श घालून दिला आहे. विविधतेतून एकता ही भारताची विशेषतः आहेच. प्रत्येक राज्यातील आणि महाविद्यालयातील दीक्षान्त समारंभात निरनिराळा ड्रोसकोड निवडला जाण्याचीच शक्यता असल्याने प्रत्येक दीक्षान्त समारंभात जो एकजिनसीपणा दिसतो, तोदेखील दूर होईल. त्याचप्रमाणे काळ्या कोटामागील वर्षानुवर्षांची इंग्रजांची कावेबाज मानसिकता दूर होऊन पांढर्‍या स्वच्छ अथवा रंगीबेरंगी पोशाखातील पारदर्शी मानसिकता वृद्धिंगत होईल.
 
मंडळाने अनेक पुस्तके मराठी, हिंदी, इंग्रजीत तसेच अन्य प्रादेशिक भाषेत प्रकाशित केली असून नुकतेच पॉंडिचेरी येथील माताजी यांनी मानसशास्त्रावरील पुस्तक अनुवादित करून प्रकाशित केले आहे. एकट्या मराठीत मंडळाने ३० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीत या विषयावर चर्चा करणारी नियतकालिके नियमित प्रकाशित केली जातात. त्यात ’मराठीतून भारतीय शिक्षण’ हे मासिक आणि ’शिक्षण समीक्षा’ हे द्वैमासिक अशी दोन नियतकालिके प्रकाशित केली जात आहेत. इंग्रजीतून ’इन क्वेस्ट ऑफ भारतीय शिक्षण’ आणि हिंदीतून ’भारतीय शिक्षण सत्य, तथ्य और कथ्य’ ही मासिके प्रकाशित होतात. अशा तर्‍हेने प्रकाशन विभागाप्रमाणेच सातत्याने या विषयावरील विविध कार्यक्रम होत असतात. उज्जैन येथे महर्षी सांदिपनी वेद विद्या प्रतिष्ठान येथे २८ ते ३० मार्च दरम्यान विराट गुरुकुल संमेलन होत आहे. असे अनेक कार्यक्रम सातत्याने होत असतात. अशा तर्‍हेने कार्यरत असलेल्या भारतीय शिक्षण मंडळाचे कार्य अधिक वेगाने होऊन लवकरच शिक्षणाचे भारतीयीकरण होऊन आपलेपणा निर्माण होऊन भारत जगद्गुरू होण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 
 
 
- पद्माकर देशपांडे  
 
@@AUTHORINFO_V1@@