Tech भारत : गुगल मॅपचे गमक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018   
Total Views |



जग झपाट्याने टेक्नोसॅव्ही बनत चालले आहे. काही अॅप्स तर आपल्या रोजच्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनून गेले आहेत. त्यात सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप म्हणजे गुगल. एकूणच सर्व गुगल उत्पादनांनी मिळून जगण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडविला आहे. दैनंदिन जीवन अधिक सुकर बनविण्यासाठी गुगल सारख्या बलाढ्य कंपन्या महत्वाची भूमिका निभावत आहेत.
 
 
एखाद्या अनोळखी शहरात गेल्यानंतर तेथील लोकेशन्स शोधण्यासाठी आजच्या एक दशकापूर्वी जी दमछाक होत असे, ती आज जाणवत नाही. याचे कारण काय असेल ? तर ते आहे ‘गुगल मॅप’. या एका अॅप्लिकेशनने दैनंदिन जीवनात भासणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यास मदत केली आहे. अगदी ग्रामीण भाग ते शहरी विभाग, ठिकाण कुठलेही असो, गुगल मॅपला ठाऊक नाही, असे खूप कमी स्थानके या पृथ्वीतलावर उरलेले आहेत.
 
 
गुगल मॅप शोध

वेब मॅपिंगसाठी गुगलद्वारे विकसित केले गेलेले हे एक अॅप्लिकेशन आहे. यात सॅटेलाईट इमेजरी म्हणजेच सॅटेलाईटद्वारे पृथ्वीची जशी आहे तशी प्रतिमा दाखविली जात असते. यात रस्ते, गावं, शहरे, त्याचबरोबर रस्त्यांवरील प्रत्यक्ष वाहतूक, ३६० अंशातील पॅरानोमा व्हू इत्यादी फीचर्स उपलब्ध आहेत.
 
 
लार्स रासमॉसेन आणि जेन्स एलिकस्ट्राक रासमॉसेन या दोन सॉफ्टवेअर डेव्हेलपर्सनी गुगल मॅप विकसित केले. २००४ साली हे अॅप्लिकेशन केवळ डेकस्टॉप वापरासाठी बनविले गेले होते. गुगलने त्याला विकत घेतले आणि नंतर २००५ सालापासून त्यास वेबसाठी विकसित केले गेले. यात प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थापन, आणि पृथक्करणची जोड देऊन फेब्रुवारी २००५ पासून हे सर्वांसाठी खुले केले गेले.
 
 
यात ‘बर्ड-आय’ अथवा ‘टॉप-डाऊन’ व्हू दिलेला असतो. ज्यात उपग्रहाच्या सहाय्याने एरीअल फोटोग्राफी केलेली असते. जवळपास ८०० ते १५०० फुट वरून केलेले हे चित्रीकरण ३ वर्षापेक्षा अधिक जुने नसते. गुगल मॅपमध्ये आज 3D व्हूचा पर्याय देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष चित्रीकरण असल्यामुळे सॅटेलाईट दर्शन देखील करता येते.
 
 
अँड्रॉईड आणि आय-फोन साठी २००८ साली गुगल मॅप विकसित केले गेले. २०१३ पर्यंत हे स्मार्टफोनमधील सर्वाधिक प्रसिद्ध अॅप्लिकेशन म्हणून नावारूपाला आले. यात स्मार्टफोनला नेव्हिगेशन सुविधा दिल्यामुळे सामन्यांसाठी याचा वापर करणे अधिक सुविधाजनक बनले त्यामुळे अनेक समस्यांवर तोडगा निघाला. आज ओला, उबर, मेरू इत्यादी सारख्या अनेक स्टार्टअप्स केवळ गुगल मॅपच्या जोरावर कोट्यावधीचा व्यापार करू शकत आहेत.
 
 
फीचर्स

गुगल मॅपमध्ये अनेक असे फीचर्स आहेत ज्यामुळे त्याचा प्रभावी वापर करता येणे शक्य आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात.

१. आवडीचे/महत्वाचे ठिकाण करा सेव्ह

२. जवळपासची उत्तम रेस्टॉरंट शोधा

३. तुमच्या घरचा आणि ऑफिसचा पत्ता करा स्टोअर.

४. दोन ठिकाणातील अंतर मिळावा एका क्लिकवर

५. अचूक रस्ता शोधा

६. आपले लोकेशन करा शेअरेबल

७. अनेक ठिकाणच्या लिस्ट करा शेअर

८. लांब प्रवासात जाताना पिट-स्टॉप (मधली स्थानके) यांची बनवा यादी.

९. वाहतूक व्यवस्थापन

१०. ऑफलाईन मॅप


गुगल मॅप हे आजच्या आयुष्यातील केवळ एक महत्वाचे अॅप्लिकेशन राहिले नसून, दैनंदिन आवश्यकतेतील एक भाग बनले आहे. खऱ्या अर्थाने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी याचा उपयोग होत असतो. त्याबद्दल संक्षिप्त माहिती देण्याचा हा एक प्रयत्न होता.
 
 
- हर्षल कंसारा
@@AUTHORINFO_V1@@