सुविधा नाही तर कर पण नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2018
Total Views |

वाढीव मालमत्ता करप्रकरणी नागरिकांमध्ये संताप

 
 
 
 
डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील निवासी भागात केडीएमसीच्या वतीने अपुर्‍या नागरी सुविधा पुरवल्या जात आहेत. मात्र या भागातील नागरिकांना वाढीव मालमत्ता कर लावण्याचा घाट केडीएमसीच्या वतीने घालण्यात आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाच ते सहापट दराने कराची बिले पाठविल्याने रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण आहे. सुविधा द्या, मगच कर भरण्याचा विचार करू, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
 
सुदर्शननगर निवासी संघाने रहिवाशांनी कर भरू नये, असे आवाहनही फलकाद्वारे करण्यात आले आहे. मागील वर्षी २० हजार २६० इतके कराचे बिल आले होते तर, यंदा हे बिल १ लाख १३ हजार ५६ इतके आल्याने सोसायटी सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही करवसुलीची बिले ३० मार्चपासून सोसायट्यांना मिळू लागली आहेत. सुविधांची बोंबाबोंब उडाल्याने डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनने आधीच ‘सेवा नाही तर कर नाही’, असे आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर तीन वर्षांपर्यंत करात वाढ करणार नाही, असे सांगितले होते परंतु, यंदा पाठविलेली बिले मागील वर्षाच्या बिलांच्या रकमेच्या साधारण पाच ते सहापट असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच या भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यांच्याकडूनच बिले वसूल केली जातात, मग केडीएमसी ‘वॉटर सप्लाय बेनिफिट कर’ कसा घेते, असा सवालही त्यांनी केला आहे. काही जणांना ती मिळालेली नाहीत. बिले इतक्या उशिरा दिली जात असताना ती त्वरित न भरल्यास दोन टक्के व्याज आकारले जाईल, अशी ताकीदही महापालिकेकडून दिली जात आहे.
 
”एमआयडीसी निवासी भागात बहुतेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यावरील खड्डे व धुळीने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. फवारणी हा प्रकार येथे बंद झाला आहे. परिणामी, डास आणि किड्यांची बेसुमार वाढ झाली आहे. गटारांची साफसफाई, कचरा उचलणे आदी सेवा नियमित होत नाहीत. आता आमचा भ्रमनिरास झाला आहे. अशीच परिस्थिती यापुढे कायम राहिली तर आम्ही कर न भरण्याचा विचार करू. त्यासाठी आम्ही महापालिकेला १५ दिवसांचा वेळ देत आहोत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल,”असा इशारा ‘डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन’ने निवेदनात दिला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@