अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मारेकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |




आपल्या वैचारिक विरोधकांना वाद -विवाद, चर्चेतून पराभूत करण्याचे बळ नसले की डावे त्यांच्या नरडीचा घोट घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत, हे या राज्यांतल्या कित्येक स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांतून उघड होते. त्याचाच कित्ता गिरवत, आपली हिंसेची परंपरा जपत जेएनयूतही डाव्या विचारांच्या टोळक्याने लव्ह जिहादवरील चित्रपटाचा वैचारिक विरोध न करता हातात दगड घेत हैदोस घातला.


कोणे एके काळी देशातील प्रतिष्ठित व नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये गणले जाणारे जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) आता गुंडापुंडांचा अड्डा बनल्याचे तिथे वारंवार घडणार्‍या घटनांतून सिद्ध होते. आता तेथून देशप्रेमाच्या नव्हे तर देशद्रोहाच्या घोषणा देणार्‍यांच्या टोळ्या, तोंडातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जप करत बाहेर पडतात. डाव्या विचारांच्या चळवळी आणि त्यांच्या बदमाश कार्यकर्त्यांनी जेएनयूतले वातावरण बिघडवले असल्याचे आणि विद्यापीठाला राजकीय आखाड्याचे स्वरुप दिल्याचे तिथल्या नेहमीच्या वादग्रस्त घटनांवरुन दिसते. ’भारत की बरबादी तक, जंग रहेगी! जंग रहेगी! कश्मीर की आझादी तक, जंग रहेगी! जंग रहेगी!’ आणि ’भारत तेरे टुकडे होंगे! टुकडे होंगे!’, इन्शाअल्लाह, इन्शाअल्लाहच्या वल्गनेनंतर आता जेएनयूचे नाव चर्चेत येण्याचे कारण म्हणजे ’लव्ह जिहाद - इन द नेम ऑफ लव्ह’ हा चित्रपट आणि त्याविरोधात डाव्या विचारांच्या गुंडांनी घातलेला धुडगूस हे होय.

गेल्या कित्येक वर्षांपासून केरळमध्ये (देशातही असले प्रकार सुरु आहेतच) हिंदू आणि ख्रिश्‍चन धर्मीय मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, त्यांचे धर्मपरिवर्तन करण्याचा उद्योग सुरु आहे. मुस्लीम कट्टरपंथी गट आणि धर्मांध मुस्लीम संघटनांकडून यासाठी पुरेपुर अर्थिक तरतूद केली जाते. एका माहितीनुसार तर हिंदू धर्मातील निरनिराळ्या जातीजातीप्रमाणे या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यास त्यानुसार मुस्लीम मुलांना लाखो रुपयांची बिदागीही दिली जाते. इथे दोन सज्ञान व्यक्तींमधील विवाहाला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, पण जेव्हा धर्मपरिवर्तनाच्या हेतूने, फूस लावून असा प्रकार केला जातो, हिंदू मुलींना लक्ष्य करुन, ’निकाह’ करुन, मुले जन्माला घातल्यानंतर त्यांना वार्‍यावर सोडले जाते आणि नव्या मुलींना पुन्हा आपल्या जाळ्यात ओढण्याचा खेळ खेळला जातो, तेव्हा हा मुद्दा फक्त दोन व्यक्तींमधला राहत नाही, तर तो संपूर्ण समाजाचा विषय होतो. याच लव्ह जिहादचा, प्रेमाच्या आडून केल्या जाणार्‍या धर्मपरिवर्तनाचा बुरखा फाडणारा सुदीप्तो सेन यांचा ’इन द नेम ऑफ लव्ह’ हा चित्रपट जेएनयूमधील विवेकानंद विचार मंच आणि ग्लोबल इंडियन फाऊंडेशनने दाखविण्याचे ठरवले, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढणार्‍या आणि प्रत्यक्षात हिंसेचे थैमान घालणार्‍या डाव्या विचारांच्या पिट्ट्यांनी हा चित्रपट चालू होण्याआधीच अभाविप, भाजप आणि रा. स्व. संघाच्या नावाने बोंबा मारायला सुरुवात केली. नंतर याच डाव्या विचारांच्या गुंडांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ले करत प्रोजेक्टर, विजेच्या वायरिंग तोडून टाकल्या. यात अभाविपचे कित्येक कार्यकर्ते जखमी झाले. शेवटी डाव्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे हा चित्रपटच बंद करावा लागला, परंतु चित्रपटाचा शो बंद पाडूनही समाधान न झालेल्या डाव्या विचारांच्या गुंडांनी जाता जाता मध्ये आलेल्या सुरक्षा रक्षकालाही मार मार मारले. त्याच्या अंगावरुन गाडीही घातली. ज्यात तो अर्धमेला झाला.

हे सारे घडले, ते डाव्यांच्या आतापर्यंतच्या परंपरेला साजेसेच, कारण स्वतःकडे वैचारिक वादविवादांचे जाणतेपण घेणारे डावे प्रत्यक्षात कसे आणि किती क्रूर-हिंसक होऊ शकतात, हे पश्‍चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळमधील घटनांवरुन लक्षात येते. आपल्या वैचारिक विरोधकांना वाद-विवाद, चर्चेतून पराभूत करण्याचे बळ नसले की डावे त्यांच्या नरडीचा घोट घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत, हे या राज्यांतल्या कित्येक स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांतून उघड होते. त्याचाच कित्ता गिरवत, आपली हिंसेची परंपरा जपत जेएनयूतही डाव्या विचारांच्या टोळक्याने लव्ह जिहादवरील चित्रपटाचा वैचारिक विरोध न करता हातात दगड घेत हैदोस घातला.
 
मार्क्स, माओ, लेनिन हे लोक इथल्याच नव्हे तर जगभरातल्या डाव्यांचे वैचारिक बाप. जेएनयुतली डावी पिलावळही त्यांच्याच कृत्यांना आदर्श मानून, पुढे जाणारी. त्यामुळे ज्यांच्या विचारांच्या मुळालाच रक्ताची चटक लागलेली आहे, त्यांच्याकडून यापेक्षा काही वेगळे होऊही शकत नाही, म्हणा. पण गेल्या तीन-चार वर्षांत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने छाती पिटणारेही हेच लोक होते ना? अगदी भारताच्या बरबादीचे, तुकडे तुकडे करण्याचे स्वप्न पाहणार्‍या घोषणाही याच लोकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दिल्या ना? मग आता या लोकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे गेले? विचारांचा विरोध विचारांनी करा म्हणणारी ही जमात अशी हातघाईवर का आली? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर प्रवचने झोडणार्‍या जमाते पुरोगाम्यांची अभिव्यक्तीची व्याख्या पक्ष, संघटना आणि व्यक्ती पाहून बदलते का? तर हो! ज्या ज्यावेळी जमाते पुरोगाम्यांची गोष्ट असते त्या त्या वेळी त्यांना अभिव्यक्तीची आझादी हवी असते. कोणीही कधीही त्यांच्या अभिव्यक्तीवर बंधने लादली नाहीत, तरी मोदी सरकार आणि भाजपच्या नावाने आकांडतांडव करणे, हिंदू धर्म आणि देवी देवतांवर गलिच्छ भाषेत टीका-टिप्पणी करणे, शिवराळ भाषेत हिंदूंचा जमेल तेवढा अपमान करणे, भारतमातेवर, गोमातेवर अश्‍लील शेरेबाजी करणे जमाते पुरोगाम्यांचा हक्क असतो. त्याला कोणी थोडासाही विरोध केला तरी, आमच्या भावनांचा सन्मान करा, असे म्हटले तरी जमाते पुरोगाम्यांच्या भाषेत तो थेट लोकशाहीचा खून असतो. पण आता लव्ह जिहादच्या संतापजनक आणि सत्य घटनांवर आधारित चित्रपट जेएनयूत दाखवणार म्हटले की ती अभिव्यक्ती, ते स्वातंत्र्य तुम्हा-आम्हाला नसते. हाच या लोकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यामागे दडलेला भेसूर चेहरा आहे. हेच या लोकांचे सत्य स्वरुप आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हेच खरे मारेकरी आहेत. आणि हा प्रकार काही कालपरवाचा नाही, वर्षानुवर्षे हेच चालू आहे.
 
’बुद्धा इन ट्रॅफिक जॅम’ या चित्रपटाच्या शो वेळीही त्यांचे हे रुप असेच चव्हाट्यावर आले होते. आजही त्यांचे हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मुखवटे पुन्हा एकदा गळून पडले. त्यामुळे आता गरज आहे ती सर्वसामान्य जनतेने त्यांच्या या मुखवट्यांवर शेवटचा खिळा ठोकण्याची, कथित उदारमतवादाच्या आड दडलेल्या पराकोटीच्या मतलबी, लोकशाहीचे नाव घेत प्रत्यक्षात हुकूमशाहीने वागणार्‍या धेंडांची सद्दी कायमची संपवण्याची, त्यांनी कितीही हिंसाचार केला तरी लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीला लागलेली ही वाळवी पराभूत करण्याची.

@@AUTHORINFO_V1@@