पडद्यामागचे युनिट ७३१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |




स्थापना


दुसरे महायुद्ध संपूर्ण जगाला मनुष्यजातीच्या मनातल्या भीषण विकृती अगदी उघडपणे दाखवून गेले. शत्रूच्या नायनाटासाठी मनुष्य हा प्राणी अमानुषतेच्या कोणत्या थरावर जाऊ शकतो, याची प्रचिती सबंध जगाला या कालखंडात आली. नुसती माहिती वाचतांना हादरून जावं, असे क्रूर अत्याचार निष्पाप जीवांवर झाले होते, इतके, की औरंग्याची क्रूरता बालीश वाटावी! जर्मन सरकारने चालवलेल्या ऑश्विट्झ सारख्या असंख्य छळछावण्या आणि त्यांचा प्रमुख म्हणून नेमलेला जोसेफ मेंगेल जगद्कुख्यात आहेतच, पण त्यापेक्षाही कैक पटीने भीषण असलेली छावणी म्हणजे जपानच्या 'युनिट ७३१' ने सर्जन जनरल शिरो ईशीच्या अधिपत्याखाली बांधलेली पिंगफँगची छळछावणी. "हा शिरो ईशी म्हणजे शंभर मेंगेलच्या बरोबर होता." असं विधान युनिट ७३१ वर संशोधन करणारे रॅबाय एब्राहम कूपर यांनी केलं आहे.

दोन वर्षं अभ्यास सफर करून परतल्यावर १९३२ मध्ये शिरो ईशीला सैन्यातल्या कर्नल चिकाहिको कोईझुमीच्या पाठिंब्याने 'आर्मी एपिडेमिक प्रिव्हेन्शन रिसर्च लॅबोरेटरी' चा प्रमुख म्हणून नेमले गेले. १९२८-३० ची अभ्यासयात्रा आटपून शिरो ईशीने १९३० पासून जपानी युद्धतंत्रात 'जर्म वॉरफेअर' किंवा 'जंतुप्रसारक शस्त्रांचा' वापर मोठ्या प्रमाणात करावा हे प्रतिपादित केले. म्हणून १९३२ मध्ये, त्याच्या एपिडेमिक प्रिव्हेन्शन लॅबोरेटरी अंतर्गतच त्याने 'टोगो युनिट' नावाचा गुप्तसंशोधन समूह स्थापन केला. १९२५ च्या जिनिव्हा अधिवेशनात जंतूप्रसारकशस्त्रांवर बंदी असूनही एंपरर हिरोहिटोची या टोगो युनीटला परवानगी होती! १९३१-३३ मध्ये जपानने चीनमध्यल्या मांचुकुओ (मांचुरिया) राज्यावर ताबा मिळवलेला होता. त्यामुळे, हे युनिट प्रथमतः त्या मांचुकुओ राज्यातल्या झोंग्मा किल्ल्यात (जो तेंव्हा युद्धकारागृह म्हणून उपयोगात होता) कार्यरत झाले. अनेक चायनीज आणि रशियन युद्धकैदी किंवा ज्यांना POW म्हटले जायचे, अशांवर अमानुष चाचण्या सुरू केल्या गेल्या, त्यांच्यावर विविध जंतूंचे प्रयोग केले गेले, ज्यामुळे जपानी सैन्याला जंतूप्रसारक युद्धनितीसाठी विविध शस्त्रे तयार करता यावी. परंतु, १९३५ ला त्या कारागृहातले काही बंदी निसटले आणि त्यांनी तिथल्या ईशीच्या प्रयोगशाळेत बाँबस्फोट केला. यात बरेच नुकसान झाले असावे , कारण यामुळे शिरो ईशीला तातडीने ते युनिट तिथून हलवावं लागलं. १९३६-१९३७ च्या सुमारास हिरोहिटोच्या संमतीने ती प्रयोगशाळा मांचुकुओ राज्यातल्याच पिंगफँग जिल्ह्यात हलवली गेली. त्याठिकाणी आपण चालवलेल्या नरकाला काहीतरी गोंडस नाव हवं म्हणून जपानी सरकारने पिंगफँगमधे ठाणं मांडून बसलेल्या त्या सैन्यविभागाला 'एपिडेमिक प्रिव्हेन्शन अँड वॉटर प्युरिफिकेशन डिपार्टमेंट ऑफ क्वांटुंग आर्मी' हे नाव दिलं. आणि याच डिपार्टमेंटने महायुद्ध भर रंगात आलं असतांना इ.स. १९४१ ला आपलं संकेतनाम धारण केलं...युनिट ७३१!
स्वरूप


झोंग्मा पासून सुरू होऊन, नंतर पिंगफँगला छावणी टाकलेलं जनरल ईशीचं युनिट ७३१ हे प्रचंड अमानुषरित्या कार्यरत होतं, हे आपण मागच्या भागात पाहिलंच आहे. पण, हे युनिट भीषण असलं, तरीही शिस्तबद्ध होतं. या छावणीत युनिटचे ८ विभाग पडले होते, 'डिव्हिजन ऑफ लेबर'साठी! ते ८ विभाग असे -

१)जिवाणू संशोधन


२)युद्धतंत्र व शस्त्र संशोधन आणि प्रात्यक्षिक


३)जंतूप्रसारक शस्त्रांसाठी काडतुसं निर्मिती. (काही ठिकाणी हा विभाग 'जलनिर्जंतुकीकरण विभाग' म्हणून पण वाचनात येतो. कुणी सांगावं, दोन्ही असतील.)


४)जिवाणू निर्मिती आणि साठा


५)प्रशिक्षण विभाग


६)वस्तू पुरवठा


७)सर्वसामान्य व्यवहार


८)वैद्यकीय चिकित्सा विभाग

युनिट ७३१ हे जैविकयुद्धतंत्रासाठी तयार झाले होते, त्यामुळे अगदी झोंग्मा कारागृहापासून टोगो युनिटच्या प्रयोगशाळेत जंतुसंसर्गप्रयोग हे प्रामुख्याने व्हायचे, परंतु महायुद्धात मित्रराष्ट्रांचा जसजसा पराभव होत गेला, तसतसं ईशीच्या क्रूरतेला उधाण आलं. पिंगफँगच्या ८ विभागी नरकात ब्युबॉनिक प्लेग, अँथ्राक्स ,टायफॉइड, कॉलरा अशा रोगांची लागण कैद्यांच्या शरीरात करत. काही वेळाने त्या कैद्यांना चिकित्सा विभागात आणून भूल न देता जिवंत शरीर विच्छेदित केलं जायचं, रोगाची वाढ बघण्यासाठी! युनिट ७३१ मध्ये सहाय्यक म्हणून काम करत असलेल्या एकाने १९९५ साली दिलेल्या 'द न्यूयॉर्क टाईम्स'च्या मुलाखतीत या क्रूरतेचा पुनरुच्चार केला आहे.

या छळछावणीत एक रोगी आणि एक ठणठणीत व्यक्ती एकाच खोलीत बंद केले जायचे, तो रोग किती वेळात पसरतो आणि ते किती अंतराने मरतात हे पहायला. अनेक कैद्यांना अतिदाबविभागात कोंडलं जायचं, त्यांचे डोळे खाचांतून बाहेर येण्याआधी शरीर किती सहन करू शकतं हे तपासण्यासाठी! मरणाच्या थंडीत अर्धनग्नावस्थेत बाहेर उभं करणं, प्रेग्नंट स्त्रियांमध्ये रोगाची लागवण करणं असले प्रकार सर्रास व्हायचे, एवढंच नाही तर ३ दिवस वय असलेल्या बाळावरही अमानुष प्रयोग केले गेले आहेत तिथे!

हे सगळं विविध जिवाणू विषाणू यांची लागवण, वाढ, उपयोग कसा होतो हे पाहून त्यानुसार शस्त्रनिर्मिती आणि युद्धनिती तयार होण्यासाठी केलं जात होतं. छळछावणीबाहेर एक प्रात्यक्षिक भूमी होती, तिथे अनेकांना नेऊन बांधून ठेवायचे आणि नवीन तयार झालेले शस्त्र त्यांवर प्रयोग करण्यात यायचे. या भीषण प्रयोगांत चिनी, रशियन, मंगोलियन, अमेरिकन अशी एकूण ३,०००च्या वर माणसं मारली गेली. या सगळ्या 'टेस्ट सब्जेक्ट्स'चं स्वत्व पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं म्हणून त्यांना तिकडचे शास्त्रज्ञ आणि अधिकारी लाकडी ओंडका किंवा 'वुडन लॉग' म्हणत. पुढे पुढे 'फील्ड टेस्टींग'पण होत गेलं, म्हणजेच तयार झालेले प्लेग-बाँब हे सातत्याने पश्चिम चिन मधल्या निंग्बो आणि उत्तर-मध्य चिनमधल्या चँग्दे इथे टाकले जायचे, यात जवळजवळ ३,००,००० पर्यंत लोक मारले गेले!(आकड्यात मतभेद असले तरी जिवीतहानी प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली होती) सत्तेची हाव माणसाला कोणत्या थरापर्यंत खेचू शकते बघा!

ही सगळी शस्त्रे अमेरिकेवर वापरण्याची जपानी सैन्याची इच्छा होती. हवेने प्लेग आणि अँथ्राक्स सारखे रोग आणि पाणबुड्यांच्या सहाय्याने समुद्रांत कॉलरासारखे रोग पसरवण्याचा सैन्याधिकाऱ्यांचा इरादा होता. ही जंतूप्रसारकयुद्धनिती जपान्यांकडून वापरलीही गेली, परंतु ती चिनपुरती मर्यादित असावी, कारण इतर ठिकाणी जास्त वापर झाल्याचा उल्लेख नाही.

दुसरे महायुद्ध संपेपर्यंत युनिट ७३१ शिरो ईशीच्या अधिपत्याखाली कार्यरत होते, पुढे अनेक वर्ष पिंगफँगच्या छळछावण्यांचा पत्ताच कोणाला नव्हता! यावर मोठ्या प्रमाणावर संशोधन हे अगदी अलीकडे, म्हणजे १९८०-१९९० या दशकाच्या पूर्वार्धात सुरू झालं. यामागची कारणं काय होती आणि युनिट ७३१ च्या अधिकाऱ्यांचं काय झालं हे पुढच्या भागात पाहूयात.


- शुभंकर अत्रे
@@AUTHORINFO_V1@@