’वंदे मातरम्’चा अपमान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018   
Total Views |

स्वातंत्र्याच्या ठिणगीचे वणव्यात रूपांतर करणार्‍या ’वंदे मातरम्’ला एका ओळीत संपविण्याचा आदेश देण्याचा शहाणपणा नुकताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. पुढच्या महिन्यात होणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराला आता रंगत आली असून भाजपसह काँग्रेसनेही ठिकठिकाणी प्रचार सभांचा सपाटा लावला आहे. गेल्या चार वर्षांत बहुतांश राज्यात सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसवर कर्नाटकचा गड सांभाळण्याचे दडपण आहे, तर लिंगायत धर्माचा मुद्दा पुढे करून हिंदू धर्माला तोडू पाहणार्‍या काँग्रेससमोर भाजपने चांगलेच आव्हान उभे केले आहे. राहुल गांधी हेदेखील शुक्रवारी अशाच एका प्रचार सभेसाठी कर्नाटकात आले होते. त्याचवेळी गांधी घराण्याचे आणि त्या घराण्याच्या गुलामांच्या शब्दांत संपूर्ण देशाचे शहजादे असलेल्या राहुल गांधींनी ’वंदे मातरम्’ला एका ओळीत संपविण्याचे अवमानकारक विधान केले. राहुल गांधींनी आपल्या वक्तव्यातून फक्‍त ’वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचाच नव्हे, तर त्या लाखो क्रांतिकारकांचाही अवमान केला, ज्यांनी ’वंदे मातरम्’म्हणत हसत हसत मृत्युला कवटाळले. अर्थात ज्यांना ’वंदे मातरम्’ म्हणजे काय, ’वंदे मातरम्’चा अर्थ काय, ’वंदे मातरम’चा इतिहास काय हेच माहिती नसेल, ती व्यक्तीच असली संतापजनक शब्दावळ काढू शकते. राहुल गांधी आणि गांधी घराणे सुरुवातीपासूनच देशाला स्वतःची खाजगी जहागिरी समजत आले. आपल्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा अहं असल्याने, ’आपण काहीही करू शकतो’चा तोरा त्यांच्या प्रत्येकच कृतीत दिसतो. त्यामुळे राहुल गांधींनी त्याच तोर्‍यात आपली पिढ्यान्पिढ्याची मानसिकता दाखवत राष्ट्रीय गीतात बदल करण्याचा, ते एका ओळीतच संपविण्याचा आदेश दिला असावा. आता राहुल गांधी आपल्या या कृतीची माफी मागतील का, एवढेच पाहायचे. पण ज्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार, मंत्रीच ’वंदे मातरम्’ म्हणणे आवश्यक नसल्याचे सांगतात, त्या पक्षाच्या अध्यक्षांकडून अशी अपेक्षा तरी कशी करता येईल? ते नक्कीच याचेही समर्थनच करतील. दुसरीकडे राहुल गांधींनी एक सभा संपवून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी हातातले घड्याळ दाखवत ’सिंगल लाईन-सिंगल लाईन’ असे म्हणत ’वंदे मातरम्’ लवकरात लवकर संपविण्याचे आदेश दिल्याचे चित्रफितीत दिसले. कदाचित असेही असेल की, भाजपच्या धसक्याने बिथरलेल्या राहुल गांधींना कुठे लक्ष द्यावे, कुठे सभा घ्यावी, कुठे किती वेळ द्यावा हेही उमजत नसेल. त्यातूनच राहुल गांधींना ’वंदे मातरम्’ला वार्‍यावर सोडण्याची बुद्धी झाली असेल. आता मतदारांनीही काँग्रेसला वार्‍यावर सोडावे, म्हणजे काँग्रेसच्या डोक्यात प्रकाश पडेल.

00000000000


मृत्यूचे फाटक...

उत्तर प्रदेशात गुरुवारी झालेल्या रेल्वे आणि बस अपघातानंतर सर्वत्र मानवरहित रेल्वे क्रॉसिंग आणि त्यामुळे होणार्‍या दुर्घटनांची चर्चा रंगली. उत्तर प्रदेशात झालेल्या या अपघातात १३ विद्यार्थ्यांना आणि बसचालकाला प्राण गमवावे लागले. अपघाताच्या प्राथमिक माहितीत बसचालकाने गाडी चालवताना कानात इअरफोन घातल्याचे आणि त्यामुळे रेल्वेचा आवाज ऐकू न आल्याचे स्पष्ट झाले. इअरफोन ऐकून गीत-गाणी वा तत्सम काही ऐकण्याच्या क्षणिक आनंदापायी बसचालकाने स्वतःचा जीव तर गमावलाच, पण ज्या मुलांनी अजून जग पूर्णपणे बघितले नव्हते, त्यांनाही या जगाचा निरोप घ्यायला लावले. हे जितके दुःखदायक तेवढेच धोकादायक. दुसरीकडे हे रेल्वे क्रॉसिंग मानवरहित असल्याचेही समोर आले. देशात एकूण 30 हजार 318 रेल्वे क्रॉसिंग आहेत, ज्यात 25 टक्के म्हणजे 7 हजार 701 रेल्वे क्रॉसिंग मानवरहित आहेत. उत्तर प्रदेशात झालेल्या अपघाताला मानवरहित रेल्वे क्रॉसिंग जबाबदार असल्याचे म्हटले गेले. त्यामुळेच आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तातडीने बैठक घेत 2020 पर्यंत एकही मानवरहित रेल्वे क्रॉसिंग राहणार नसल्याची घोषणा केली. केलेल्या घोषणेप्रमाणे काम करण्याचे, ते पूर्णत्वास नेण्याचे सामर्थ्य आणि इच्छाशक्ती सध्याच्या सरकारमध्ये निश्‍चितच आहे, त्यामुळेच रेल्वे खाते आगामी दोन वर्षांत ही घोषणा पूर्ण करेल, याची शाश्‍वती वाटते. त्याला कारणही तसेच आहे. 2015 सालच्या एका आकडेवारीनुसार देशात 13 हजार 500 मानवरहित रेल्वे क्रॉसिंगची संख्या होती. गेल्या तीन वर्षांत रेल्वेखात्याने घेतलेल्या निर्णयामुळे आणि केलेल्या कामामुळे आता त्यात मोठी घट झाली असून त्यापैकी 5 हजार 799 रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे खात्याचे कर्मचारी हजर आहेत. त्यामुळे मानवरहित रेल्वे क्रॉसिंगमुळे होणार्‍या अपघातात आणि त्यात जीव गमावणार्‍या लोकांच्या संख्येतही घट झाली. रेल्वे क्रॉसिंगवर होणार्‍या अपघातांना बर्‍याचदा मानवी चुकाही कारणीभूत असल्याचे समजते. आपल्याला अनेकवेळा रेल्वे येण्याची सूचना मिळूनही, क्रॉसिंगचे फाटक पडूनही त्याच्या खालून जाणारे लोक दिसतात. काही महाभाग तर त्या फाटकाखालून दुचाकी गाडीही ओढत नेतात. अशा घटना फक्त ग्रामीण भागातच घडतात असेही नाही. शहरांमध्येही, सुशिक्षित लोकांकडूनही अशी कृत्ये केली जातात. म्हणजेच रेल्वे क्रॉसिंग आणि फाटकासंबंधी जागरुकतेची मोठी गरज आजही असल्याचे यावरून समजते. त्यामुळे फक्त रेल्वे क्रॉसिंगवर कर्मचारी ठेवल्याने ही समस्या सुटेल का, हाही एक मोठा प्रश्‍न असल्याचे आणि तो जागृतीच्या माध्यमातूनच सोडविण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात येते.
- महेश पुराणिक
@@AUTHORINFO_V1@@