विकासाची पायाभरणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |


”मानवी विकासाच्या शास्त्रशुद्ध ज्ञानाबद्दल तू लिहिते आहेस हे चांगलं आहे, नाहीतर आजकाल सगळीकडे ‘अभिमन्यू तयार करण्याचे कारखाने’ चालू आहेत वेगवेगळ्या नावाखाली.” माझ्या लेखांबद्दल प्रतिक्रिया देताना माझ्या एका मित्राने वापरलेल्या ‘अभिमन्यू तयार करण्याचे कारखाने’ या संकल्पनेपाशी मी जरा रेंगाळले. मुलांच्या मेंदूचा विकास वयाच्या पाच ते सहा वर्षांपर्यंत खूप वेगाने होतो ही बाब खरी आहे, परंतु त्यासाठी पोषक म्हणून बाजारात येणारी बरीचशी उत्पादने हा प्रामुख्याने केवळ जाहिरातबाजीचा प्रकार असतो. मेंदूच्या विकासाचा हा ’सुवर्णकाळ’ निसटून जाऊ नये, म्हणून मुलांना भारंभार गोष्टी उपलब्ध करून देण्याच्या नादात आपण त्यांच्याबरोबरच्या नात्याचा पाया भक्कम करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक करतो आहोत ना याचा विचार व्हायला हवा.

वयाच्या पहिल्या-दुसर्‍या वर्षात मूल खूप वेगाने विकसित होत असते. बौद्धिक विकासाचे प्राथमिक टप्पे मूल साधारणत: वयाच्या चौथ्या महिन्यापर्यंत पूर्ण करते, उदाहरणार्थ, आवडते खेळणे पाहिल्यावर प्रत्येक वेळी हसून हात पुढे करणे. त्यानंतर हळूहळू कारण-परिणाम समीकरणाचा अंदाज मुलांना येऊ लागतो. खेळण्यावरचे बटण दाबले की रंगीत दिवा लागतो व संगीत चालू होते ही पूर्वी योगायोगाने होणारी क्रिया मूल आता जाणीवपूर्वक करू लागते. विकासाचा हा महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल, कारण तर्कबुद्धीची सुरूवात इथे होते. साधारण आठव्या महिन्यापासून मूल तर्काच्या आधारे कृती करणे जास्त चांगल्या प्रकारे शिकू लागते. जिन पियाजे या मानसतज्ज्ञाने या टप्प्याचे वर्णन ‘पहिली सुयोग्य बुद्धिमत्ता’ असे केले आहे. उद्दिष्ट ठरवून नियोजनपूर्वक ते साध्य करणे, यासाठी आवश्यक बुद्धिमत्तेची इथे सुरूवात होते. अत्यंत गरजेचे असे हे जीवनकौशल्य माणूस इतक्या लहानपणापासून शिकायला सुरूवात करतो.

वर्षभराची मुले पियाजेच्या भाषेत ‘छोटे शास्त्रज्ञ’ असतात. एकच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करायला ती आता शिकत असतात. स्वत:लाच नवीन आव्हाने देऊन, ती हाताळण्याची नवीन साधने, पद्धती शोधत असतात. दीड वर्षानंतर मुलांचा दृष्टिकोन व कल्पनाविस्तार विकसित होऊ लागलेला असतो. आजूबाजूच्या परिस्थितीपासून ती स्वत:ला वेगळे ओळखू शकतात. वस्तूंच्या व व्यक्तींच्या प्रतिमा आता त्यांच्या स्मृतिपटलावर उमटू लागतात. ‘आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांनी आत्ता अनुभवता न येणारी गोष्टदेखील अस्तित्वात असू शकते’ याची अटकळ मूल बांधू शकते. कारण व परिणामांचे समीकरण उमगायला लागल्यानंतर मुले कितीही लहान असली तरी, पालकांनी त्यांच्यासमोर काही गोष्टींची मांडणी तर्काने जरूर करावी.

जर्मन-अमेरिकन मानसतज्ज्ञ एरिक्सनच्या मते, मूल तान्हे असताना त्याचे भावनिक शिक्षण प्रामुख्याने आशावादावर आधारित असते. कुणावर विश्वास ठेवायचा, हे या काळात ते शिकत असते. आपल्याला आधार देणारे लोक आपल्यासाठी हवे तेव्हा उपस्थित असतील, असा आशावाद या काळात मुलांमध्ये विकसित होत असतो. त्यामुळे तान्ह्या मुलाच्या रडण्याला पालकांनी ताबडतोब प्रतिसाद देणे आवश्यक असते. पालकांचा प्रेमळ स्पर्श बहुतांश मुलांची अस्वस्थता तातडीने कमी करायला मदत करतो. मूल सात ते आठ महिन्याचे झाल्यानंतर त्याच्या गरजांच्या पूर्ततेसाठी काही मिनिटे थांबू शकण्याची क्षमता त्याच्यात विकसित होते. अर्थात, यामध्ये मुलांच्या तान्हेपणीच्या गरजांना पालकांच्या तातडीने मिळालेल्या प्रतिसादातून तयार झालेल्या विश्वासाचा सहभाग मोठा असतो. ‘आपली गरज आपले पालक नेहमी भागवतात’ या विश्वासाने सात ते आठ महिन्यांचे मूल पालक येईपर्यंत काही क्षण थांबू शकते आणि इच्छापूर्तीबाबत संयम (डिलेड ग्रॅटिफिकेशन) बाळगण्याच्या महत्त्वपूर्ण कौशल्याच्या शिक्षणाला सुरुवात होते. जॉन बॉल्बीने मांडलेली व मेरी आइन्सवर्थने विकसित केलेली ‘अटॅचमेंट थिअरी’ विकासाच्या अभ्यासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. मनमोकळ्या, जवळकीच्या व भावनिकदृष्ट्या स्थिर अशा नात्याच्या बांधणीला हा सिद्धांत महत्त्व देतो. जॉन बॉल्बीच्या मते, जवळकीची नाती निर्माण करणे ही माणसाची जीवन समृद्धीसाठीची गरज आहे. ज्या मुलांचे त्यांच्या पालकांशी असणारे नाते उबदार व सुरक्षित असते, त्यांना आपल्या पालकांबद्दल पूर्ण विश्वास तर असतोच; शिवाय आयुष्यात पुढेही मित्रमंडळी जोडताना व नातेसंबंध फुलवताना ही मुले जास्त आत्मनिर्भर असतात.


- गुंजन कुलकर्णी
@@AUTHORINFO_V1@@