संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि माध्यमे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Apr-2018
Total Views |


१ मे, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि माध्यमे यांचा विचार करायचा झाल्यास, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन नेमके काय होते हे थोडक्यात जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

१ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली. त्या द्विभाषिक राज्याच्या निर्मितीच्या आधीच काँग्रेसला विरोध करणार्‍या ११ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली होती. या पक्षांमध्ये प्रजा समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, मजदूर किसान पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन, रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पक्ष, बोल्शेविक पक्ष हे डावे विचारसरणीचे पक्ष याखेरीज समाजवादी, दलित पक्षांसह हिंदू महासभा, जनसंघ, संयुक्त महाराष्ट्रवादी काँग्रेस जनपरिषद यांचासुद्धा समावेश होता. एस. एम. जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस होते, तर कॉम्रेड डांगे हे या समितीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरु यांचा किंवा कॉँग्रेसचा संयुक्त महाराष्ट्राला विरोध असल्यामुळे काँग्रेसधार्जिणे किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी चालवलेली बातमीपत्र, वार्तापत्रांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला विरोध केला आणि त्यामुळे भाषावार प्रांतरचनेचा विचार करण्यासाठी जो फाझल अली आयोग केंद्र सरकारने नेमला होता त्याचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर हे स्पष्ट झाले होते की, संयुक्त महाराष्ट्र अथवा मराठी भाषिकांचे राज्य निर्माण होणार नाही. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची मागणी फेटाळली गेली होती, पण त्याविरोधात बोलण्याकरिता कोणतीच दैनिके तयार नव्हती. मुंबईतील सर्व इंग्रजी वृत्तपत्रांचे मालक हे बिगर मराठी होते. बहुतांशी मारवाडी, गुजराती, पारशी यांकडे इंग्रजी वृत्तपत्रांची मालकी होती. त्यामुळेच सर्वच इंग्रजी वृत्तपत्रांनी, गुजराती वृत्तपत्रांनी खर्‍या खोट्या, भडक, संयुक्त महाराष्ट्रविरोधी बातम्या छापल्या आणि मराठी जनतेच्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला विरोध केला.

त्याकाळातील मुंबईतील मराठी दैनिकांचा विचार केल्यास ’लोकमान्य’, ’लोकसत्ता’, ’नवशक्ती’, ’नवाकाळ’ या सर्व दैनिकांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनास पाठिंबा देण्यास हरकत नव्हती, पण ’नवाकाळ’चा अपवाद वगळता कोणत्याच मराठी दैनिकाने संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे समर्थन केलेले दिसत नाही. त्यामुळे ’नवाकाळ’ हे वृत्तपत्र एकाकी पडले कारण ’लोकसत्ता’चे व्यवस्थापन दक्षिण भारतीय होते, ’नवशक्ती’चे मालक दाक्षिणात्य होते. त्यामुळे जरी ही वृत्तपत्रे मराठी असली, तरी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा प्रचार या वृत्तपत्रांनी केला नाहीच. उलट संयुक्त महाराष्ट्र आंदोलनकर्ते कसे हिंसक आहेत किंवा गांधीविचारांचे विरोधक आहेत हे या वृत्तपत्रातून छापून येत होते.

मुंबईखेरीज मराठी भाषिकांचे पगडा असलेले आणि मराठी दैनिके असलेले शहर म्हणजे पुणे. पुण्यात त्यावेळी आघाडीची दैनिक होती, त्यातील ’सकाळ’ हे त्या काळी बर्‍यापैकी नावारुपास आले होते. मात्र, ‘सकाळ’चे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर यांचा भाषावार प्रांतरचनेलाच विरोध असल्याने मराठी भाषिकांच्या राज्यालाही त्यांनी प्रखर विरोध केला. मात्र, पुण्यातील ’प्रभात’ या दैनिकाने संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार प्रचार केला. ’नवाकाळ’ आणि ’प्रभात’ यांचा अपवाद वगळता खूप जास्त वृत्तपत्रांचा संयुक्त महाराष्ट्र आंदोलनास समर्थन नव्हते. आचार्य अत्रेंच्या ’नवयुग’ साप्ताहिकाला त्याकाळी बर्‍यापैकी वाचकवर्ग होता. या साप्ताहिकातून अत्रेंनी सातत्याने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची मागणी मांडली. मात्र, ’नवयुग’ हे साप्ताहिक होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासंबंधी दैनिक असावे अशी मागणी सातत्याने पुढे येत होती. ३० ऑक्टोबर १९५६रोजी महाद्विभाषिकविरोधी अशी परिषद मुंबईतील शिवाजी पार्क येथे झाली. परिषदेच्या दुसर्‍या दिवशी मोठी जाहीर सभा झाली या जाहीर सभेला अभूतपूर्व जनसमर्थन लाभले तरी त्या जाहीर सभेबद्दल मुंबईतील मराठी वृत्तपत्रांनी सभेचा काहीच वृत्तांत दिला नाही. यामुळे जाहीरसभेचे अध्यक्ष असलेले कोल्हापूरच्या माधवराव बागल यांनी मराठी वृत्तपत्रे ही महाराष्ट्रद्रोही आणि भांडवलशाहींचे गुलाम आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यावेळीही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाकरिता दैनिक निघालेच पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरातून मोठ्याप्रमाणात येऊ लागली. “सर्व मदत करणार असतील तर येणार्‍या विजयादशमीपासूनच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला समर्पित दैनिक मी काढतो,” असे आचार्य अत्रेंनी सभेत जाहीर केले.



सेनापती बापट यांनी त्याच सभेत त्यांना पत्राचे नाव ‘मराठा’ ठेवा असे सांगितले. त्या द्विभाषिकविरोधी परिषदेच्या अधिवेशनात दैनिक ’मराठा’ या वृत्तपत्राचा संकल्प झाला आणि त्यानंतर दीड महिन्याच्या अवधीतच दैनिक ’मराठा’ वृत्तपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.कोणत्याही जागेची, छापखान्याची, यंत्राची, भांडवलाची कोणतीही तयारी नव्हती. पण, या संकल्पनेतून लोकांच्या गरजेपोटी ’मराठा’चा जन्म झाला व त्याचा फायदा हा संयुक्त महाराष्ट्राला झाला असे आपण म्हणू शकतो. खरं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीचं पत्र म्हणून हे दैनिक चालवले जाणार, असे अत्र्यांनी सांगितले व त्यांनी सांगितले की जे घटक पक्ष आहेत, त्यांनी प्रत्येकी पाच हजार भागधारक म्हणून ती रक्कम द्यावी, पण त्याची दखल गंभीरपणे घेतली गेली नाही, परंतु काँम्रेड डांगे यांनी वैयक्तिक तीन हजार रुपये त्यांना नेऊन दिले. तरी ’मराठा’ला लोकांचा प्रतिसाद छान मिळाला, जनसमर्थन मिळाले. जशी संयुक्त महाराष्ट्र चळवळ वाढत गेली आणि तसा ’मराठा’चा वाचकवर्ग वाढत गेला. अग्रलेखपासून त्यांनी पहिल्याच अंकात छापले होते की, मराठी स्त्री-पुरुषांना रोजच्या त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देईल. पहिल्या अंकात कॉम्रेड डांगे, सेनापती बापट यांचे भाषण छापले होते. याखेरीज बरेच स्तंभ होते ‘ढाल-तलवार’, ‘पाचामुखी’, ‘कोपरखळ्या’ अशी सदरे त्यात छापली होती. पण, यात अग्रलेख हे सर्वात महत्त्वाचे होते आणि यात पहिला अग्रलेख ‘मराठी जनतेचा आवाज’ हा होता. या अग्रलेखाच्या मथळ्यातून कळते की, यातून मराठी माणसे त्यांचे सुखं-दुःख, राग, चीड, संताप हे सगळं यानंतर व्यक्त होणार. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, साहित्यासंबंधी लेख ठेऊन, महाराष्ट्राविषयी आदर वाढवून, महाराष्ट्राच्या संस्कृतीला पोषक लिखाण मोठ्या प्रमाणावर केलं. याचवेळी संयुक्त महाराष्ट्राची समितीही जोर पकडत होती. मराठाचा खप आपोआप वाढत गेला. महाराष्ट्रातून इतर ठिकाणाहून त्याची मागणी वाढत गेली आणि मग सातत्याने असणारी आर्थिक चणचण दूर झाली. ‘मराठा’बरोबरच ’नवयुग’चा खपदेखील वाढला आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना होईपर्यंत सातत्याने ‘मराठा’ दैनिकातून आचार्य अत्रे यांनी लढा दिला असे आपण म्हणू शकतो. संयुक्त महाराष्ट्राचे जे कोणी लढवय्ये होते, त्यांचे लेख, वृत्तांत, पत्रे छापून येत होते. ज्याला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन आहे असे आंदोलन हे असेच चालते, असं आपण म्हणू शकतो आणि ‘मराठा’च्या आशयातून जनसहभाग प्रतिबिंबित होत होता आणि त्यामुळे याचा फायदा संयुक्त महाराष्ट्र लढ्याला झाला आणि संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होईपर्यंत तो लढा सुरु होता. हे खूप महत्त्वाचे आहे की, एका आंदोलनातून दैनिक जन्म घेतं व त्या आंदोलनाला यश मिळेपर्यंत सुरु असतं. हे खूप मोठं यश एका माध्यमाचं म्हणता येईल आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मराठाबरोबर आपल्याला ‘नवाकाळ’, ‘प्रभात’, ‘नवयुग’ या सर्वांची भूमिका लक्षात घ्यावी लागते आणि या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत या माध्यमांचा लढा हे एक उत्तम उदाहरण आहे ज्याची नोंद इतिहासाने करून घेतली असं आपण म्हणू शकतो.


- प्रा. गजेंद्र देवडा
@@AUTHORINFO_V1@@