संगीत कलेचा उपयोग कलावंतांनी राष्ट्रकार्यासाठी करावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |

'स्वरांजली' कार्यक्रमात सरसंघचालकांचे प्रतिपादन


 
 
 
पुणे : संगीत ही कला निसर्गानेच मानवाच्या हृदयात ठेवली आहे. या कलेचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी होऊ शकतो आणि त्यासाठी कलावंतांनी आपल्या सूचना मांडाव्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचा निश्चितच उपयोग करेल, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी केले.
 
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक बापूराव दात्ये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने 'स्वरांजली' हा कार्यक्रम पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, अधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते. यानिमित्त मार्गदर्शन करताना भागवत बोलत होते. प. महाराष्ट्र संघचालक नानासाहेब जाधव आणि सहसंघचालक प्रतापराव भोसले हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्व. दात्ये यांनी लिहिलेल्या 'गायनीकळा' या पुस्तकाचे यावेळी राधा दामोदर प्रतिष्ठान आणि हरी विनायक दात्ये जन्मशताब्दी समिती यांच्याकडून  भागवत यांच्या हस्ते पुनर्प्रकाशन करण्यात आले.
 

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज आणि लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक पं. सतीश व्यास, पं. उल्हास कशाळकर, रवींद्र साठे, धनंजय दैठणकर व मिलिंद तुळणकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, प्रवचनकार विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, ज्येष्ठ तालवादक तौफिक कुरेशी, बासरीवादक पं. केशव गिंडे, पं. सुहास व्यास, मंजिरी आलेगावकर, पं. हेमंत पेंडसे, गायिका सीमंतिनी ठकार, अनुराधा कुबेर, हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर, संतूर वादक दिलीप काळे, फय्याज हुसेन, बासरीवादक नागराज, दरबार ब्रास बँडचे इकबाल दरबार यांच्यासह ५० पेक्षा जास्त कलावंत यावेळी उपस्थित होते. निवृत्त लेफ्टनंट जनरल शेकटकर, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यासह लष्कराच्या तिन्ही दलांतील सेनाधिकारीही उपस्थित होते.

  
स्व. बापूराव दात्ये यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रांतामधून निवडक घोष पथकांना निमंत्रित करण्यात आलेले होते. या पथकांनी शिस्तबद्ध पद्धतीने घोषांचे संचालन आणि प्रात्यक्षिक केले. एकंदर ४ टप्प्यांत हे वादन झाले. यावेळी संघाच्या अनेक प्रसिद्ध रचनांचे सुरेल सादरीकरण करण्यात आले. बापूराव दात्ये यांनी स्वतः अनेक राग आणि रागिणीमध्ये तयार केलेल्या रचना देखील याठिकाणी सादर करण्यात आल्या व या मार्फतच बापूरावांना संघाकडून आदरांजली वाहण्यात आली. ही सर्व प्रात्यक्षिके व्यावसायिक वादकांकडून न होता गेली तीन महिने आपले नोकरी, व्यवसाय व शिक्षण सांभाळून एकत्रित ३६० तास सराव करत स्वयंसेवकांनीच सादर केली. 
 
यावेळी भागवत म्हणाले, "संघात कोणीही मोठा किंवा छोटा नाही. प्रत्येक जण स्वयंसेवकच असतो. स्वयंसेवकाने काय करावे, कसे करायला हवे याचे स्व. बापूराव दात्ये हे उदाहरण होते. संघजीवनाचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. बापूरावांनी जो उद्यम केला तो स्वयंसेवकांसाठी केला. संघाचा घोष उभा राहिला पाहिजे, संघ कार्याचा विस्तार व्हायला हवा या उद्देशाने बापूरावांनी हे काम केले."
 
 

एशियाडमध्ये सादर झालेली रचना

बापुराव दात्ये यांनी हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीतातल्या केदार, धानी, तिलंग, देश, मांड, देशकर, पिलू, हंसध्वनी, कल्याण, शंकरा, कलावती अशा हिंदुस्थानी आणि कर्नाटकी शास्त्रीय संगीतातल्या अनेक रागांवर आधारित रचना निर्माण केल्या. त्यांनी प्रांगणीय संगीतासाठी स्वतंत्र लिपी निर्माण केली. तसेच सूर्यनमस्कार लयबद्ध पद्धतीने घालण्यासाठी आरुणी ही रचना केली.

 
 
वृंद संगीत हे सामुहिक भावना निर्माण करण्यासाठी आहे, असे सांगून सरसंघचालक पुढे म्हणाले, "भारतात प्रत्येक कलेचे स्वतःचे असे प्रयोजन आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये संगीताचा उपयोग रोमांच (थ्रिल) निर्माण करण्यासाठी होतो. आपल्याकडे संगीताचा उपयोग शांती व भक्ति निर्माण करण्यासाठी होतो. आपल्याकडे संगीताला नादब्रह्म म्हणतात. जे शब्द संगीतातून बुद्धीपर्यंत जातात ते हृदयापर्यंत उतरतात आणि हृदयातून कृतीमध्ये उतरतात. इंग्रजांची शिस्तबद्धता प्रसिद्ध होती. त्यांना पराभूत करायचे तर त्यांच्यासारखे शिस्तबद्ध संघटन हवे व त्याचे योग्य प्रदर्शन असावे, अशी स्वयंसेवकांची इच्छा होती. त्यातून घोष विभागाचा विकास झाला."
 
राष्ट्रासाठी या कलेच्या उपयोगाचा हा पैलू कलावंतांनी समजून घ्यायला हवा, असे सांगून त्यांनी आवाहन केले, की कलावंतांनी या संदर्भातील सूचना मांडाव्यात. "तुम्ही दिलेल्या सूचना शास्त्राच्या कसोटीवर उतरलेल्या असतील, यात शंका नाही. या कलेचा उपयोग मनुष्याला चांगला मनुष्य करण्याकरिता व्हायला हवा. ते काम आम्ही करू," असे ते म्हणाले.
 
@@AUTHORINFO_V1@@