‘स्वरांजली’च्या निमित्ताने ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018   
Total Views |

 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वरांजली हा घोषाच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम नुकताच पुण्यात झाला. यावेळी समाजातील संगीत क्षेत्रातील मान्यवरांना तसेच लष्करी अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्यासमोर संघाच्या घोषाचे प्रदर्शन करण्यात आले. वास्तविक संघ फक्त पाहुण्यांसाठी म्हणून असे प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम फारसे करताना दिसत नाही. नाही म्हणायला ज्यांनी संघाच्या घोषाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले त्या कै. हरि विनायक उपाख्य बापुराव दात्ये यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त या कार्यक्रमाला होते. मात्र तरीही यापूर्वी अशा प्रकारचे कार्यक्रम संघात अभावानेच पाहायला मिळत असत. संघावर यापूर्वी अनेकवेळा बंदिस्त संघटना म्हणून आरोप झाले. वेळोवेळी संघाने त्याला नकार देत संघ बंदिस्त नाही हे सांगण्याचा प्रयत्नही केला, त्यासाठी प्रकट कार्यक्रमही केले. पण अशाप्रकारे विशिष्ट श्रेणीनुसार समाजाभिमुख कार्यक्रमांची सुरुवात संघात अलिकडच्या काळातच झाली आहे.
 
 
संघाच्या स्थापनेला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९२ वर्षे होऊन गेली. सुरुवातीच्या काळात संघाने अंतर्मुख होऊन संघटनेसाठी संघटना बांधण्याचा निश्चय केला आणि समाजातील चढउतारांचा फारसा विचार न करता प्रचार आणि प्रसिद्धीपासून दूर राहात संघाने प्रत्यक्ष जमिनीवर काम केले. अर्थात वेळप्रसंगी देशावर, समाजावर आलेल्या संकटात संघ स्वयंसेवक धावून गेल्याची उदाहरणे आहेत मात्र अशी घटना दशकातून एखादी घडत असल्यामुळे इतर वेळी संघाने पूर्णपणे संघटना बांधणीवरच लक्ष केंद्रित केल्याचेच दिसते.
 
 
 
संघाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला तर ढोबळमानाने चार टप्पे पडतात. संघ स्थापना (१९२५) ते १९५०, १९५० ते आणीबाणी (१९७५), १९७५ ते २००० आणि २००० पासून पुढे. यातल्या पहिल्या टप्प्यात संघाने केवळ संघटना बांधणीवर भर दिला आणि देशभर आपला विस्तार वाढवला. दुसऱ्या टप्प्यात समाजातील अन्यान्य क्षेत्रात संघटना उभ्या करण्यात आपली शक्ती खर्च केली. तिसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने आंदोलनात्मक काम संघाला करावे लागल्याचे दिसते. चौथ्या टप्प्यात मात्र संघाची स्वीकारार्हता समाजात वाढल्यामुळे संघाचा विस्तार वाढत गेला. या प्रत्येक टप्प्यात त्या त्या काळाच्या काही आठवणी संघ स्वयंसेवकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. देशाची फाळणी असो, महात्मा गांधींच्या हत्येचा लागलेला आरोप आणि त्यानंतर संघावर लादलेली बंदी असो, आणीबाणीच्या काळात पुन्हा एकदा संघावर बंदी लादणे असो, किंवा रामजन्मभूमी आंदोलन असो संघ स्वयंसेवकांच्या स्मरणात तो काळ याच घटनांच्या आधारे लक्षात आहे. या प्रत्येक टप्प्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या काळातील संघाचे नेतृत्त्व. आणि त्यामुळेच साहजिकच संघाच्या वाटचालीतील तपशील त्यावरून ठरले गेले.
 
 
संघाच्या आजवरच्या या वाटचालीत ज्याप्रमाणे संघाचे विरोधक तयार होत गेले त्याचप्रमाणे संघाचे समर्थकही मोठ्या प्रमाणावर तयार होत गेले. ज्या ज्या वेळी संघावर बंदी घालण्यात आली, त्या त्या वेळी संघाने उसळी मारून पुन्हा एकदा कामाला सुरुवात केल्याचे दिसते. २००० पासून पुढे मात्र संघाच्या स्वीकारार्हतेमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसते. या स्वीकारार्हतेचे केवळ सामाजिकच नाही तर राजकीय परिणामही झाले. याच काळात संघाचा व्याप वाढत गेल्यामुळे संघात नवनवीन आयाम जोडले गेल्याचेही दिसते. समाजाच्या वाढत्या पाठिंब्याची संघानेही दखल घेतली आणि त्याचीच परिणती म्हणून संघ अधिक समाजाभिमुख झाला असे म्हणता येईल. त्याचेच पर्यवसान म्हणजे संघाच्या कार्यक्रमांमध्ये आलेले हे वैविध्य.
 
 
 
संघाच्या स्थापनेपासून सर्व सरसंघचालक समाजातील मान्यवरांना भेटत आलेले आहेत. अगदी डॉ. हेडगेवारांनी देखील त्या काळात ज्या गावात त्यांचा प्रवास असेल त्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेतल्याचे आणि त्यांना संघाच्या कामाची माहिती दिल्याचे उल्लेख आहेत. तीच बाब गोळवलकर, देवरस, राजेंद्रसिंह, सुदर्शन आणि भागवत यांच्याही बाबतीत आहे. मात्र मधल्या काळात राजकीय घडामोडींच्या प्रभावामुळे संघाकडे यायला लोक घाबरत असत. २००० नंतर मात्र हे चित्र बदलेले दिसते. समाजातील मान्यवर संघाकडे स्वतःहून येत आहेत असे चित्र सर्रास दिसायला लागले. संघाकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या. देशात काही चांगला बदल करायचा असेल तर तो संघच करून शकतो अशी मांडणी पूर्वाश्रमीचे संघविरोधक करायला लागले. एका अर्थाने संघ समाजाच्या सर्व क्षेत्रात पोहोचल्याचे ते द्योतक आहे असे म्हणावे लागेल. आणि म्हणूनच मग अगदी रतन टाटांपासून ते तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींपर्यंत सर्वांनीच सरसंघचालकांची भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते.
 
 
संघानेही आपल्या वाढलेल्या कामाचा अधिक विस्तार करण्यासाठी अधिक समाजाभिमुख उपक्रम हाती घेतलेले दिसतात. २००० मध्ये संघाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभर राष्ट्र जागरण अभियान असेल किंवा, २००६ मध्ये संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींची जन्मशताब्दी समाजातील सर्व जाती-पंथ-संप्रदायांपर्यंत पोहोचून मोठ्या प्रमाणात साजरी करणे असो, किंवा त्यानंतर रामसेतू वाचवण्यासाठी केलेले आंदोलन असो, किंवा निरनिराळ्या निमित्ताने देशभर आयोजित केलेल्या यात्रा असतील, किंवा अगदी २०१४ मध्ये अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी जनजागरण असेल संघ थेट समाजात जाऊन काम करताना दिसू लागला आहे. कदाचित त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे समाजातील निरनिराळ्या श्रेणीनुसार त्यांना उपयुक्त असे, त्यांच्या आवडीचे, त्यांना रस निर्माण होऊन ते कामात जोडले जातील असे कार्यक्रम करण्यास सुरुवात झाली. पुण्यात झालेला स्वरांजली हा कार्यक्रम त्याचेच एक प्रतीक आहे असे म्हणण्यास म्हणूनच वाव आहे.
 
 
 
इतके दिवस कलेच्या प्रांतातील मंडळी संघाकडे जाताना फारशी दिसत नसत. किंबहुना अभिनय, नाट्य, चित्रकला, चित्रपट या क्षेत्रातील मंडळींवर समाजवादी विचारसरणीचा पगडा अधिक दिसत असे. गायन, वादन, नृत्य या ही क्षेत्रातील मंडळी फारशी अन्य कोणत्या मंचावर दिसली नाहीत. मात्र अशा मंडळींनाही त्यांच्या रुचीचा कार्यक्रम करुन आपल्याशी जोडण्यासाठी संघाने या कार्यक्रमाचे नियोजन केल्याचे दिसते. संघाच्या निमंत्रणाला मान देऊन काही हजार कलाकार कार्यक्रमाला आले होते हे विशेष. संघाच्या नित्य कार्यक्रमात केवळ गीत म्हणण्यापुरते संगीत मर्यादित होते. किंवा घोषाचा उपयोग केवळ पथसंचलनासाठी केला जात असे. मात्र संगीतातील जाणकारांसमोर प्रात्यक्षिक करण्याची ही नवी पद्धत आहे. यापूर्वी असा एक कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी नागपूरलाही झाला होता. केवळ संगीत क्षेत्रातील कलाकारच नाही तर गेली कित्येक दशके ज्या क्षेत्राकडे संघाने ढुंकूनही बघितले नव्हते अशा चित्रपट क्षेत्रातही संघाने आपला चंचूप्रवेश आता केला आहे. वकील, डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, श्रमिक अशा प्रत्येक श्रेणीनुसार संघ आता कार्यक्रमांचे नियोजन करत आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे आणि त्यामुळेच संघ कार्यकर्त्यांचा उत्साहही वाढताना दिसत आहे.
 
 
संघाच्या मांडणीत कायम युगानुकूल परिवर्तनाविषयी बोलले जाते. पण संघाने ती संकल्पना केवळ मांडणीपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष स्वतःमध्ये तसे परिवर्तन घडवून आणल्याचे दिसते हे विशेष. कोणत्याही संघटनेमध्ये गाभा तसाच ठेवून बाह्य रूपात आवश्यक ते बदल केल्याचे दृश्य फार दुर्मिळ आहे. आवश्यक तिथे कठोर आणि आवश्यक तिथे लवचिक धोरण अलवंबण्याच्या संघाच्या या दृष्टिकोनामुळेच कदाचित संघ आजवरची वाटचाल करू शकला असावा. एकंदरच समाजामध्ये संघाच्या वाढत्या स्वीकारार्हतेची संघानेही तितकीच गंभीर दखल घेतल्याचे दिसते. स्वरांजली हा कार्यक्रम संघाच्या याच अधिक समाजाभिमुख होण्याच्या टप्प्याचे द्योतक आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@