यशवंत जाधव यांच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |

५ आणि ६ एप्रिलला चार समित्यांची निवडणूक
जेष्ठ नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर
बिनविरोध होणार निवडणूक
 
 

 
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी अर्ज भरला आहे. तर सुधार समितीचे अध्यक्ष म्हणून मनसेतून शिवसेनेत आलेले दिलीप लांडे, शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून मंगेश सातमकर आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी पालिकेचे चिटणीस प्रकाश जेकटे यांच्याकडे अर्ज भरला आहे. परंतु या निवडणुकांसाठी भाजप किंवा विरोधीपक्षातील एकही अर्ज आला नाही त्यामुळे या निवडणुका बिनविरोध होणार आहे.
 
पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ पाहता या चौघांचीही निवड निश्चित असून केवळ औपचारिकता बाकी आहे. यासाठी ५ एप्रिल रोजी १२ वाजता शिक्षण समिती आणि दुपारी २ वाजता स्थायी समितीची निवडणूक होणार आहे तर ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सुधार समिती तर ३ वाजता बेस्ट समितीची निवडणूक होणार आहे.
 
मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने पालिकेमधील अनेक पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच एका भाग म्हणून शिवसेनेचे जेष्ठ सदस्य असलेले नगरसेवक मंगेश सातमकर व आशिष चेंबूरकर यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. परंतु येत्या स्थायी समिती, सभागृहनेता पदावर आपली निवड होईल अशी त्यांची अपेक्षा होती ती फोल ठरल्याचे बोलले जात आहे.
 
 
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असतात. या समितीवर वर्णी लागावी अशी सर्वच नगरसेवकांची अपेक्षा असते. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली जाते. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सध्याचे अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सभागृह नेते यशवंत जाधव, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती परंतु यशवंत जाधव यांनी बाजी मारली. तर सुधार समितीचे अध्यक्ष म्हणून मनसेतून आलेले दिलीप लांडे, शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून मंगेश सातमकर आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांची निवड होणार आहे. आशिष चेंबूरकर हे याआधी तीन वेळा बेस्ट समिती अध्यक्षपदी तर मंगेश सातमकर हे शिक्षण समिती अध्यक्षपदी तीन वेळा राहिले आहेत.
 
दिलीप लांडे यांना सुधार समिती भेट
 
काही महिन्यापूर्वी मनसेच्या ५ नगरसेवकांसह हातात शिवसेनेचे शिवबंधन बांधणारे दिलीप लांडे यांना सुधार समितीच्या अध्यक्षपदाची भेट मिळाली आहे. शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला त्याबाबदल एका समितीचे अध्यक्षपद देण्याचे आश्वासन शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यानुसार त्यांना हि भेट मिळाली आहे.
 
ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर
 
चार महत्वाच्या समित्यांचे अर्ज शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गूढेकर आणि बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकिळ यांचा पुन्हा संधी न दिल्यामुळे हिरमोड झाला. अर्ज भरताना ते अनुपस्थित होते. तर मंगेश सातमकर यांना स्थायी समिती अध्यक्षपद, सभागृनेतेपद किंवा महापौरपद हवे होते परंतु त्यांना शिक्षण समिती दिल्याने ते नाराज आहेत तर स्थायी समिती किंवा महापौरपदसाठी इच्छुक असणारे आशिष चेंबूरकर यांना बेस्ट समिती अध्यक्षपद दिल्यामुळे नाराज आहे.
 
सभागृह नेतेपदी कोणाची वर्णी
 
सभागृहनेते यशवंत जाधव यांनी स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याने आता सभागृह नेते पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत शिवसेनेच्या गोटात चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये, माजी महापौर विशाखा राऊत व श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु महापौर, स्थायी समितीसाठी चर्चा असलेल्या नावे सोडून इतरांचीच वर्णी लागली होती. त्यामुळे सभागृहपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@