होय! राजगुरू आमचेच...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |





राजगुरूंना ‘स्वयंसेवक’ किंवा ‘कार्यकर्ता’ असे संबोधन संघाने लावलेले नाही. मात्र, राजगुरू डॉक्टर हेडगेवारांना भेटल्याचे समोर येताच स्वातंत्र्य चळवळीच्या नावावर संघाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍यांचे केविलवाणे दर्शन या निमित्ताने घडले.


हुतात्मा राजगुरू संघाचे होते की नव्हते, यावर एक अनाठायी वाद सुरू आहे. ज्या व्यक्ती आणि संघटनांनी या देशासाठी सर्वस्व दिले, त्यांच्याकडे पाहताना संघाने कधीही आपपरभाव केलेला नाही. ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर तें तें,’ हीच सावरकरांप्रमाणे संघाचीही भूमिका राहिली आहे. संघाच्या बाबतीत हेच वास्तव आहे. मग हा वाद कसला? याचा विचार केला तर या देशातल्या काही तथाकथित विचारवंतांच्या लबाड्यांकडे सूक्ष्मपणे पाहावे लागेल. जी मंडळी संघाला या वादात अनाठायी ओढू पाहात आहेत, त्यांचे निरीक्षण केले तर त्यांचे हेतू लगेच लक्षात येऊ शकतील. रा. स्व. संघाचा स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग हा जसा एक अनाठायी निर्माण केलेला विषय आहे, तसाच राजगुरूंचे संघाशी असलेले संबंध हादेखील ओढून ताणून निर्माण केलेला विषय.

वैचारिक आणि राजकीय क्षेत्रात रा. स्व. संघप्रणित संस्था व व्यक्तींना मागे ढकलण्याचे काम पद्धतशीरपणे केले जाते. यामागची लबाडी अशी की, संघाविषयी गैरसमज पसरविण्याच्या कामाला यामुळे यश येते. स्वयंसेवकांनाच स्वातंत्र्यलढ्यातील सहभागावर आरोपी करून आरोपीच्या कठड्यात उभे करता येते. वस्तुत: स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग न दिलेले अनेक महापुरूष आहेत. त्यांनी स्वत: लढ्यात भाग घेतला नाही, कारण त्यांनी स्वत:चे असे काही ध्येय निश्चित केले होते. समाजसुधारणांच्या क्षेत्रातील अशी बरीच नावे घेता येतील. याचा अर्थ या मंडळींचा स्वातंत्र्यलढ्याला विरोध होता, असे मुळीच नाही. उलट जिथे जिथे आवश्यक आहे, तिथे तिथे या मंडळींनी स्वातंत्र्यलढ्याला पूरकच भूमिका घेतली.

संघसंस्थापक डॉ. हेडगेवारांचे संपूर्ण आयुष्य देशभक्तीपर घटनांनी आणि क्रांती कार्याने भारलेले आहे. त्याचे दस्तावेज आहेत. घटनाक्रम आहेत व पुरावेही आहेत. डॉक्टरांनी केलेल्या क्रांतीकार्याची व सत्याग्रहाची अनेक प्रकारची माहिती उपलब्ध आहे. अनेक क्रांतिकारकांना साहाय्य केल्याचे डॉक्टरांच्या चरित्रात दिसून येते. असहकार खटल्याच्या वेळी नागपूर कारागृहात असताना ज्या प्रसंगाने डॉक्टर हेडगेवारांच्या विचारविश्वाला पूर्णपणे कलाटणी मिळाली, तो इनामुल्लाचा प्रसंग बोलका आहे. या देशातील चळवळींमध्ये मुस्लिमांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार्‍या पुढार्‍यांच्या पदरी नंतर जो भ्रमनिरास आला, तो डॉक्टरांच्या पदरी आला नाही. कारण, डॉक्टरांनी हिंदू संघटनेचे मूलतत्त्व अंगिकारले. आज या देशात, या देशाची, इथल्या मातीची राष्ट्रतत्त्वे घेऊन अनेक आयाम उभे राहिले ते संघाच्याच संस्कारातून. मात्र, जे बिगर संघी पर्याय आले, संघाने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहिले नाही. अनुल्लेखाने मारले नाही किंवा त्यांच्याकडे द्वेषानेही पाहिले नाही. आजही संघाचे सरसंघचालक अशा अनेक संस्थांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांचे कौतुकच करतात.

या संस्था संघाच्याच असल्या पाहिजेत, असा काही त्यांचा आग्रह नसतो. राजगुरूंच्या बाबतीतही तेच आहे. सँडर्सला गोळ्या घातल्यानंतर राजगुरू कराची सोडून नागपूरला आले. डॉक्टर हेडगेवारांना भेटले. त्यांनी राजगुरू यांच्या राहण्याची व्यवस्था तत्कालीन प्रचारक भैय्याजी दाणी यांच्या शेतावर केली, असा उल्लेख आहे. आता नरेंद्र सहगल यांनी ‘भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता’ या पुस्तकात हेच लिहिले आहे. नरेंद्र सहगल म्हणजे महाराष्ट्रात काल्पनिक इतिहास लिहिणारे सोंडे निर्माण झाले आहेत, तसे नव्हेत. अत्यंत अभ्यासपूर्ण व संदर्भयुक्त लिखाणासाठी ते ओळखले जातात. यात राजगुरू संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी संघाचे काम केले होते. त्यांनी संघाच्या शाखा लावल्या होत्या, असा उल्लेख कुठेही केलेला नाही. तरीसुद्धा हा वाद निर्माण केला गेला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, स्वातंत्र्यलढ्याचा ठेका एका ठराविक राजकीय पक्षाने आणि त्या पक्षाची मालकी असलेल्या एका कुटुंबाकडेच आहे, असे अनेकांना वाटते. या कुटुंबाच्या गुलामांनाही असेच वाटते. पत्रकारिता, वैचारिक क्षेत्र या ठिकाणी असलेल्या डाव्यांनी इमानेइतबारे ही चाकरी निभावलेली आहे. काल ज्यांनी या विषयावर वादंग घडवून आणण्याचा प्रयत्न केला, ते सगळेच असल्याच वंशावळीचे लोक असल्याचे लक्षात येईल. या देशाचा नेमका इतिहास कोणता? इथपासून या मंडळींची सुरुवात होते. मग मार्क्सने शिकविल्याप्रमाणे ‘शोषित विरुद्ध शोषक’ या चौकटीत जे जे बसविले जाईल, ते ते कोंबून ठोकून बसविले जाते.

रा. स्व. संघासारख्या संघटनांना या मंडळींना या चौकटीत कधीच बसविता आले नाही, कारण ती सदैव वर्धिष्णू राहिली. समाजातल्या निरनिराळ्या प्रवाहांना सोबत घेत संघ वर्धिष्णू होतच राहिला. सगळ्यांना सोबत घेण्याच्या प्रक्रियेतून हे घडले. संघाचा हा डीएनए संघाला पाण्यात पाहणारे विरोधक समजून घ्यायला तयार नसतात. राजगुरूंच्या बाबतीत सहगलांच्या पुस्तकावरून जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो एका ठराविक मानसिकतेचाच परिणाम आहे. संघाने राजगुरू स्वयंसेवक असल्याचा दावा कुठेही केलेला नाही. मात्र, राजगुरूंच्या वंशजांना ज्या प्रकारे प्रश्न विचारला गेला, तो हे बालंट संघाच्या माथी मारण्याचा उद्देश ठेवूनच! त्यावर त्यांच्या वंशजांचे जे उत्तर अपेक्षित होते तेच आले. ते म्हणाले, ‘‘राजगुरू स्वयंसेवक नव्हतेच.’’ आता मुळात संघ असा दावाच करीत नसताना ही लबाडी करण्यामागे संघाचा द्वेष यापेक्षा वेगळा काही हेतू असूच शकत नाही. स्वातंत्र्यलढ्यात संघाचा सहभाग नव्हता, हा डाव्यांनी पुरागोमी भट्टीत तयार केलेला कोळसा पुन्हा पुन्हा उगाळण्याचा हा उद्योग आहे. काँग्रेस संपत आली, पण काँग्रेसचे हे गुलाम काही केल्या सत्य स्वीकारायला तयार नाहीत. आपल्या घटनाक्रमांचे जाहीर दस्तावेजीकरण करीत राहाणे, हा जसा संघाचा स्वभाव नाही, तसाच त्याचे बाजारू प्रदर्शन करीत राहण्याचा आणि प्रतिमांच्या जगात जगण्याचाही नाही. संघाचे काम सघन आहे आणि अशा कपटी आणि लबाड सापळ्यांमध्ये न अडकता संघ वाढतच राहील.

@@AUTHORINFO_V1@@