विधानपरिषदेसाठी भाजप-सेनेत युती होणार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |


 

काँग्रेस-राष्ट्रवादीपुढील अडचणी वाढल्या, निरंजन डावखरेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा


मुंबई, (निमेश वहाळकर) :  जून-जुलै महिन्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या २१ जागांच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आपापसांतील मतभेद विसरून एकत्र येत युती करणार असल्याची चर्चा आहे. विशेषतः मुंबई पदवीधर व कोकण पदवीधर या मतदारसंघांसाठी ही युती होणार असून कोकण पदवीधरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे भाजपप्रवेश करण्याची शक्यता आहे. यामुळे, या २१ जागांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीपुढील अडचणींत आणखी भर पडली आहे.

भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दै. 'मुंबई तरूण भारत'शी केलेल्या अनौपचारिक वार्तालापात याविषयी माहिती दिली. विधानपरिषदेच्या २१ जागांमध्ये ११ विधानसभेतून निवडल्या जाणाऱ्या तर ६ स्थानिक स्वराज्य संस्था, २ पदवीधर व २ शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. विधानसभेतून निवडल्या जाणाऱ्या ११ जागांपैकी भाजपला सध्याच्या संख्याबळानुसार ५ जागा सहजपणे जिंकता येणार आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादीला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी बरेच झगडावे लागणार आहे. तसेच शिवसेनेच्याही २ जागा सहजपणे निवडून येणार आहेत. भाजपने सहावा उमेदवार उतरवल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाकीनऊ येणार असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेस नेते व विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते शरद रणपिसे तसेच, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आदी अनेकांचे भवितव्य यामुळे पणाला लागणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६ जागांपैकी नाशिक, अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आदी ३ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार सहजपणे जिंकून येऊ शकतात. तसेच, बीड-लातूर-उस्मानाबाद येथेही भाजपचीच सरशी होण्याची चिन्हे असून येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीप देशमुख हे येथील भाजपच्या वाढत्या ताकदीमुळे यावेळी लढण्यासच इच्छुक नसल्याची काँग्रेसअंतर्गत चर्चा आहे. अशावेळी शिवसेनेसाठी महत्वाच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप शिवसेनेसोबत युती करून येथील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार व सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांना अडचणीत आणेल, अशी चिन्हे आहेत. मुंबई पदवीधर व कोकण पदवीधर या दोन जागांची निवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. मुंबईची जागा शिवसेनेसाठी महत्वाची असून येथून सध्या राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच, कोकण पदवीधर हा भाजपचा एकेकाळचा बालेकिल्ला असल्याने ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे मुंबई पदवीधरसाठी भाजप सेनेला तर कोकण पदवीधरसाठी सेना भाजपला समर्थन देईल, असे या भाजप नेत्याने सांगितले.

या सर्व बाबी पाहता भाजप व शिवसेनेची युती कायम राहण्याचेच संकेत मिळत असून आगामी २०१९ च्या दृष्टीनेही भाजप-सेनेतील ही सलगी सूचक मानली जात आहे.

 
“निरंजन डावखरे भाजपमध्ये ?”
 
 
राष्ट्रवादीकडून निवडून येण्याची खात्री नसल्याने कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून भाजपकडूनही त्यांना हिरवा कंदील मिळत असल्याची चर्चा आहे. याबाबत स्वतः डावखरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सावध पवित्रा घेत ही चर्चा मलाही नवीन असून आपल्याला याबाबत काहीही कल्पना नसल्याचे सांगितले. तसेच, राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याबाबत पक्षाचे वरिष्ठच निर्णय घेतील असे सांगतानाच, त्याचबरोबरीने ही निवडणूक आपण लढण्यास इच्छुक असल्याचेही निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. भाजपकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, निरंजन डावखरे यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजपकडून डावखरे यांना येथून उमेदवारी मिळाल्यास व शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्यास राष्ट्रवादीच्या ही जागा टिकवण्याच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात येणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@