पदार्थात होणाऱ्या भौतिक बदलांचा अभ्यास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2018
Total Views |



बदल हा तर निसर्गाचा स्वभाव गुण. सतत बदलत राहणं, जुन्याच्या जागी नवं घेणं, नवी पालवी फुटणं. नवेपणा जाऊन जीर्णपणा येणं. उन्हा मागून पाऊस, पावसानंतर शिशिर, मग शरद असं फेर धरून चालणं हे निसर्गाचं नित्याचं काम. काही बदल होत राहतात. यातील काही कायम टिकतात. काही तात्कालिक व पुन्हा मागील पाढे पंचावन्न. नदीच्या पाण्यात घासल्या जाणाऱ्या दगडांचे क्षार मिसळून नष्ट झाले म्हणता म्हणता उन्हाळ्यात नदी कोरडी झाली की क्षारांनी पुन्हा आपलं डोकं वर काढाव. एखाद्या टपून बसलेल्या शत्रूने संधी येताच डोकं काढावं तसं.

“विक्रमा खरंच मला तर ह्या बदलांचं काही कळेनासंच झालंय बघ. पाण्यात मीठ मिसळाव. मग ते नष्ट झाल्याचं वाटून पाणी मात्र खारट झालेलं असतं. पुन्हा त्या पाण्याला उकळलं तर पाण्याचं बाष्प व्हावं व मीठ खाली राहावं. ही काय भानगड आहे ? ह्या बदलाला कारण झालं कोण ? स्पर्श किंवा तापमान बदललं कशामुळे ?”

“वेताळा, तेजाचा तापमानाशी समवाय संबंध आहे असं आपण मागच्या एका अमावस्येला बोललो होतो. तापमानात घट झाली म्हणजे तेज गुण बदलला. प्रशस्तपाद म्हणतात

| कारणत्वञ्चान्यत्र पारिमाण्डल्यादिभ्य: |
The quality of being the cause belongs to all (substances, qualities and actions) except the atomic measure.


दुसऱ्या कशाला तरी कारण होणे हे विशेषत्व सोडून बाकी सर्वांना लागू होते.”
“नाही, म्हणजे ते ठीक आहे. पण हे विशेष अंग सोडून बाकी अंगे ते पदार्थ बदलतात कधी ? आणि कोण त्यांना बदलतं ?”

“अगदी बरोबर ठिकाणी नेम धरतोयस वेताळा. वर सांगितल्याप्रमाणे पदार्थाची सर्व अंगे ही द्रव्यांमुळेच असतात. म्हणूनच हा बदलसुद्धा कोणत्या तरी द्रव्यानेच होतो. याचा अर्थ असा होतो की, पदार्थातील द्रव्ये ही त्यातील इतर द्रव्यांवर परिणाम घडवून आणतात. वर मी सांगितलंच आहे तेज गुण पाण्यावर कसा परिणाम करतो ते.”

“पण विक्रमा हा बदल घडवतं कोण?”

“वेताळा मागेसुद्धा मी हे सांगतलं होतं. प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय, 

| गुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे |

To the five, Quality and the rest, also belong the character of being devoid of qualities, and that of being without action.

फक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात, सामान्य संभवतात, विशेष असतात व समवाय संबंधही असतात. पण द्रव्यांशिवाय गुण, कर्म, सामान्य,विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही अस्तित्त्व उरत नाही.

याचा एवढाच अर्थ होतो की पदार्थातील पृथ्वी, आप, तेज, वायू व मन ही द्रव्ये एकमेकांवर परिणाम करत असतात. स्थल, काल ही केवळ नैमित्तिक आहेत. प्रशस्तपाद ऋषी म्हणतात,

| क्षितिजलज्योतिरनिलमनसां क्रियावत्त्वमूर्त्तत्वपरत्वापरत्ववेगवत्वानि |


To Earth, Water, Fire, Air and Mind belong the character of having actions, being corporeal, having distance and proximity, and having speed.

स्थायू, द्रव, वायू, तेज व मन हे हालचाल करत असतात, त्यांना मूर्त स्वरूप असते, ते जवळ येऊ शकतात व लांब जाऊ शकतात आणि ते बलप्रयोग करून गती निर्माण करू शकतात.

“अच्छा म्हणजे ही द्रव्ये बलप्रयोगाने बदल घडवतात. पण विक्रमा हे बदल कुठपर्यंत ?”
“वेताळा हीच ती भौतिक व रासायनिक बदल यांमधील सीमारेषा. पदार्थात होणारा बदल जोपर्यंत त्याचा विशेष कायम ठेवतो म्हणजे पाण्याचा रेणू हा कायम राहतो तोपर्यंत तो भौतिक बदल (physical change). लाकडाच्या ओंडक्याचे तुकडे करत गेलो तर तोही भौतिक बदल. कारण या दोन्ही उदाहरणात पाणी किंवा लाकडाचा विशेषकण हा पाण्याचा रेणू व लाकडातील लहानात लहान रेणूच राहिला. पण मी जर ते लाकुड शेकोटीला वापरले तर तो भौतिक बदल राहिला नाही कारण लाकडाची राख झाली व उष्णता बाहेर पडली. लाकडाचं विशेष अंग बदललं व राख निर्माण झाली. हा झाला रासायनिक बदल (chemical change).”

“अच्छा म्हणजे पदार्थाचे विशेष अंग कायम राखून बाकी द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय संबंध यांमध्ये जर बदल झाला तर तो झाला भौतिक बदल. पण जर पदार्थातला हा बदल विशेषत्वाला बदलून गेला तर त्या पदार्थाचे मूळच बदलले व त्यात रासायनिक बदल झाला असे आपण म्हणू शकतो.”

“एखादे उदाहरण देतोस विक्रमा?”

“म्हणजे पाणी, साखर, चहा यांच्या मिश्रणाला उष्णता दिली तर तो एक भौतिक बदल झाला. पण याच मिश्रणात दूधही ओतलं व ते नेमकं नासलं तर त्या दुधात रासायनिक बदल झाला व तो चहाच वाया गेला.”

“असं असं..पण या द्रव्यांच्या गुणांमध्ये फरक झाल्याने इतरांवर परिणाम होतोय हे खरंय. पण हे सगळं करतंय कोण? कशासाठी?”

“पाश्चात्य भौतिक शास्त्रामध्ये एखाद्या बाह्यबलावर यासर्वाची जबाबदारी ढकलली जाते. पण वैशेषिकात या बाह्यबलासोबतच मन व आत्मा ही द्रव्ये असल्याने हे बदल घडवण्याची जबाबदारी साहजिकच आत्म्यावर येऊन पडते. आत्म्याचे बुद्धि, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष व प्रयत्न हे गुण सांगितले आहेत. शिवाय त्याला हेतु सुद्धा असतो. या हेतूवरही या भौतिक तसेच रासायनिक बदलांची जबाबदारी येऊन पडते. हा आत्मा मनाच्या सहाय्याने हे प्रयत्न करतो. वैशेषिकात मनाचे संख्या (number), परिमाण (unit), पृथकत्व (separateness), संयोग (conjunction), विभाग (disjunction), परत्व (largeness), व अपरत्व (smallness) हे गुण सांगितले आहेत. आत्मा हा या अवयवांमधील पेशींच्या सहाय्याने हे बदल करतो किंवा तसा प्रयत्न तरी करतो.”
“सूत्ररूपात सांगायचं तर कसं बरं सांगशील विक्रमा?”

“तसं वैशेषिकात तर तसं थेट सूत्र नाही, पण संक्षेपात सांगायचं झाल्यास

- पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यात बदल झाला पण विशेष बदललं नाही, तर तो भौतिक बदल

- पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व समवाय यांच्यातील कोणत्याही बदलासह विशेष अंगात बदल झाला तर तो रासायनिक बदल.”



“चांगला प्रयत्न आहे विक्रमा. पदार्थविज्ञानात असलेले हेतूचे स्थान सांगण्याचा. पण आता या ठिकाणी मला थांबता येणार नाही. तसा प्रयत्नही करु नकोस. मला जावंच लागेल. आत्मा तर माझ्यातही आहे. फक्त भूतद्रव्ये नाहीत तुझ्या शरीरात आहेत तशी. असो. पण पदार्थाच्या अवयवांना जाणवणाऱ्या द्रव्य, गुण व कर्म या अंगांमध्ये काही साम्ये आहेत का ? प्रशस्तपादांनी त्याबाबतीत काही म्हटलंय का ? तेच सामन्य, विशेष व समवाया संबंधातही विचारायंय. त्यांच्यातही काही समानता आहे का ? पण आता मी निघतो. पुन्हा भेटू.. हाऽ हाऽऽ हाऽऽऽ”

वेताळही पदार्थविज्ञानाच्या कक्षेत येतो. निदान तो तसं म्हणतो हे पाहून जंगलातील इतर अदृष्य आत्म्यांनीही कान टवकारले. विक्रम वेताळाच्या गोष्टींचा पोरकटपणा म्हणून उपहास करणारे ते आत्मेसुद्धा पुढच्या अवसेची व त्यांच्या भेटीची वाट पाहू लागले..
(क्रमश:)
-  अनिकेत कवठेकर
@@AUTHORINFO_V1@@