मनपा निवडणूकीत गाळेप्रश्‍न ठरणार महत्त्वाचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |
 
 
 
 
मनपा निवडणूकीत गाळेप्रश्‍न ठरणार महत्त्वाचा
जळगाव,२९ एप्रिल
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. शहरात आजपर्यंत कुठली विकास कामे झाली यापेक्षा गाळेधारकांचा प्रश्‍न या निवडणुकीत भाव खावून जाणारा आणि अनेकांची‘ नैरूया डुबवणारा ठरणार’ असल्याची चर्चा चौका-चौकात सुरु आहे. तसे घडले तर ‘ हम तो डुबेंगे सनम लेकिन साथमें तुम्हें भी ले डुबेंगे’ म्हणत कोण कुणाला घेऊन डुबतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
जळगावात व्यापारी बहुसंख्येने आहेत. सर्वसाधारण मतदारांसोबतच व्यवसाय आणि उद्योगाशी संबंधित मतदार अधिक आहेत. शहरात विकास कामे किती झाली, कशी अडकली हे सर्वच वर्तमानपत्रांमध्ाून समाजासमोर आले आहे. मध्यंतरी शहरातून जाणार्‍या महामार्गावर अपघातांची श्रृंखला सुरु झाली होती. त्यामुळे समांतर रस्त्यांचा विषयसुध्दा गाजला. महापालिकेला विविध स्वरुपात निधी मिळाला परंतु निधीचे श्रेय आणि त्याचा विनियोग यावरुनसुध्दा राजकारण तापले होते.प्रभाग रचनासुध्दा गाजत आहे. सध्या उन्हामुळे वातावरण उष्ण आहे, परंतु उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गाळेधारकांची याचिका निकाली काढल्याने राजकीय वातावरणही तापले आहे.
व्यापार संकुलाचा प्रश्‍न ऐरणीवर असल्याने गाळेधारकांची भूमिका मनपा निवडणुकीत नक्कीच महत्त्वाची ठरणार आहे. गाळेधारकांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी मनपातील सत्ताधारी आणि विरोधक यांनी प्रयत्न करुन पाहिले, परंतु यशश्री कोणालाही अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गाळेधारकांची समस्या कोणाच्या गळ्यात अडकणार ? याबाबतही मतदार अंदाज बांधत आहेत. शहरात काही विद्यमान नगरसेवकांनी त्यांच्या मतदारसंघात जनमत जाणून घेण्यासाठी सर्व्हे सुरू केला आहे, तर काहींनी मतदारंाची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे. हे काम करणार्‍या व्यक्ती या सोबतच मतदार आणिा लोकांचाही कल जाणून घेत आहेत. असले तरी गाळेधारकांचा प्रश्‍न त्यात लपून राहिलेला दिसत नाही. या ना त्या प्रकारे तो पुढे येतांना आणिा माहिती घेणार्‍यांना निरुत्तर करतांना दिसतो.
मनपाची निवडणूक ही विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीम समजली जात आहे.या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती व्हावी यासाठी काहींचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच दुसरीकडे भाजपाने स्वबळावर निवडणूक लढावी असासुध्दा मतप्रवाह आहे.मनपा निवडणुकीतील भाजपा - सेना युती ही भविष्यातील जिल्हयाच्या राजकारणाची वेगळी समिकरणे बांधणारी असेल असे म्हटले जात असतांना दुसरीकडे ती स्वबळावर लढवली गेली तर नवनेतृत्वास संधी देणारी असेल असाही अंतर्गत कल जाणवतो आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असल्याने राष्ट्वादी कॉंग्रेसनेसुध्दा दंड ठोकले आहेत. कॉंग्रेसमध्ये सर्वच ‘नेते’ असल्याने ‘हम किसी से कम नही ’ अशी त्यांची स्थिती आहे.सपा, बसपा, आप, खाविआ तसेच अन्य काही आघाड्याही राजकीय सारिपाटावर असणार आहेत.
जळगाव शहराच्या राजकारणावर व्यावसायिकच आपला अधिक प्रभाव दाखवतात हे अनेकदा सिध्द झाले आहे. त्यामुळे गाळेधारकांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न प्रलंबित असल्याने तो कुणाला घेऊन डुबतो हे मतपेटीतूनच दिसणार आहे. ज्यांना हे सत्य कळले आहे ते कामाला लागले आहेत आणि अजूनही जे गाफिल आहेत त्यांचे देवच भले करो ! असेच म्हणावे लागेल.
@@AUTHORINFO_V1@@