अत्याचाराचा अत्याचार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2018
Total Views |



अत्याचार करणार्‍यांचा कोणताही धर्म किंवा जात नसते, ती एक विकृती असते. एप्रिल महिन्यात देशात दोन वाईट गोष्टी घडल्या त्याहीपेक्षा त्या गोष्टींचे राजकारण करताना संस्कारांवर झालेला अत्याचार हा बलात्काराचा बलात्कार ठरावा, इतके हे भीषण आहे.
जम्मूच्या कठुआ येथील अल्पवयीन मुलीवर कथीत अत्याचार झाला. यातील आरोपी हिंदू समाजातील तर जिच्यावर अत्याचार झाला ती अल्पसंख्यक समाजातील आहे. हा प्रकार समोर आला तेव्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रात्री‘ कॅन्डल मार्च’ काढला. देशात ठिकठिकाणी निदर्शने झाली. ती व्हायलाच पाहिजे. कारण अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणे घृणास्पदच आहे. या पाशवी अत्याचाराच्या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अत्याचार पीडित मुलीचे नाव उघड करुन गाजावाजा केला. असे का केले गेले ? हे समजण्यापलीकडे आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर काही लोकांनी आरोपीला कठोर शासन व्हावे म्हणून पुढाकार घेतला तर काहींनी आरोपीच्या बचावासाठी सोशल मीडियाचा वापर केला.


या घटनेनंतर गाझीपूर येथून एक १० वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. तिची शोधाशोध केली असता २२ एप्रिलला ती गाझियाबाद येथे एका मदरशामध्ये सापडली. तिच्यावरील बलात्काराच्या आरोपाखाली मदरशातील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. परंतु मौलवीवर मात्र काहीही कारवाई झाली नव्हती. अल्पसंख्यक अल्पवयीन मुलीवर कथित अत्यार हा मंदिरात केला गेल्याचा आरोप आहे, तर अल्पवयीन हिंदू मुलीवर अत्याचार करणारे मुस्लीम आहेत. मौलवीला नंतर याबाबत अटक झाली. हिंदू मुलीवर अत्याचार मदरशात झाला मात्र दुर्देवाने तिच्या वरील अत्याचाराबाबत कोणत्याही नेत्याने ‘कॅन्डल मार्च ’ काढला नाही की या घटनेचा निषेध केला नाही. कठुआ प्रकरणात मोदींवर ताशेरे ओढण्यात आले. तो जनक्षोभ असू शकतो, मग असा जनक्षोभ गाझियाबाद प्रकरणात का दिसला नाही ? असा प्रश्‍न सर्वसामान्य लोकांना भेडसावत आहे. दोन्ही अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये समानता असतांना जनमताचा विरोधाभास का ? याचा विचार व्हावा. भारतीय दंड संहितेत शिक्षेची तरतुद आहे. मात्र अत्याचाराची गरीमा ठरवतात मात्र सुसंस्कृत आणि बुध्दिजीवी पण तो ठरवतांना अत्याचाराचा मापदंड मात्र वेगवेगळा असतो. त्यांच्यासाठी अत्याचाराची दाहकता वेगवेगळी असते. एक अत्याचार भीषण ठरतो तर दुसरा अदखलपात्र. अत्याचारावर अत्याचार कसा केला जातो हे भारतीय सभ्य, बुध्दिजीवी आणि सुसंस्कृत लोकांनी कठुआ आणि गाझीयाबाद या दोन्ही प्रकरणात दाखवून दिले आहे.

कठुआ आणि गाझीयाबाद येथील दोन्ही अल्पवयीन मुली पीडित आहेत मग सुशिक्षित आणि बुध्दिजीवी समाज एकाच प्रकरणात पुढे कसा येतो ? भारतात एकता, बंधुभाव, समानता आहे तर मग अत्याचाराच्या विरोधात यात फूट का पडते ? हा अनेकांसाठी अनुत्तरीत प्रश्‍न आहे. देशात दुहीची बीजे पेरण्यासाठी परकीय शक्तींची गरज नसून असे कथित बुध्दिजीवी जोपर्यंत अत्याचारावरुन बुध्दीभेद करुन देशात फूट पाडतील आणि सामान्य जनता त्यांना प्रमाण मानून अनुकरण करतील तोपर्यंत या देशात खर्‍या अर्थाने बंधुभाव, समानता रुजेल का ? याबद्दल शंका आहे.

कोणतीही विकृती ही विकृतीच असते. तिच्याकडे विकृती म्हणूनच पाहिले पाहिजे.त्यास राजकीय, जातीचे आणि धर्माचे रंग देवू नयेत. कारण असे रंग देणे म्हणजे विकृतांच्या रांगेत उभे राहण्यासारखे ठरेल.
- निलेश वाणी  
@@AUTHORINFO_V1@@