आयजीच्या जीवावर बायजी उदार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018   
Total Views |
 
 
 
 
 
 
शिवसेना पक्षप्रमुखांना नेमक्या कोणत्या गोष्टींचा कोणत्या वेळी विसर पडला, याची यादी करायला बसलं, तर आपलीच दमछाक होईल. गेल्या साडेतीन वर्षांचा इतिहास ढळढळीतपणे आपल्यासमोर आहेच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने भाजप-शिवसेनेचे सरकार निकम्मे असणं यात नवीन काही नाही. फक्त, हेच सरकार आणि सरकार चालवणारे पक्ष त्यांना पुढील दोन महिन्यांत होणार्‍या विधान परिषदेच्या २१ जागांच्या निवडणुकीतही निकम्मे वाटतात का, हे पाहावं लागेल.
 
 
’आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार,’ अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. राज्याचे राजकारण सध्या या म्हणीला ब्रीदवाक्य मानून सुरू आहे की काय, अशीच शंका येते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपलाच पक्ष सत्तेत असलेल्या सरकारला ‘निकम्मे’ म्हणणं, नाणारच्या रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे व भाजप आमदार आशिष देशमुख यांच्यात शाब्दिक चकमकी होणं, नाणार प्रकल्प विदर्भात नेण्याच्या मागण्या, नाणार प्रकल्पाला समर्थन देणारी एक समिती निर्माण होणं आणि या समितीच्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालणं आणि ते करत असताना नितेश राणे यांच्या नावाने घोषणा देणं, हे सगळं पाहता या गोष्टींचा परस्परसंबंध काय, असाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडेल. अर्थात, तसे प्रश्न आपल्याला बरेच पडतात, पण त्यांची उत्तरं कधीच मिळत नाहीत. त्याचप्रमाणे याही प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. त्यामुळे (किमान २०१९ पर्यंत) जे जे होईल ते ते पाहावे, एवढंच जनतेच्या हाती.
 
 
 
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषद घेत ‘‘हे सरकार निकम्मे आहे,’’ अशी घणाघाती टीका केली. संदर्भ होता अहमदनगर येथील राजकीय हत्याकांडाचा. राज्य सरकारवर टीका करताना आपण प्रमुख असलेला पक्षही त्याच सरकारमध्ये सहभागी आहे, याचा उद्धवजींना विसर पडतो, याची आता सर्वांनाच सवय झाली आहे. मात्र, यावेळी उद्धव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करताना गृहखात्याच्या कारभारावर टीका केली. हे खातं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवलं आहे. यावरूनही उद्धव यांनी टीका करत ‘‘स्वतंत्र गृहमंत्री हवाच,’’ अशी आग्रही मागणी केली. अर्थात, मुख्यमंत्र्यांनी गृहखातं स्वतःकडे ठेवणं, ही अनेकांच्या मनात खोलवर असलेली सल आहे आणि त्याची कारणंही निरनिराळी आहेत, हा भाग अलहिदा. मात्र, उद्धव यांनी यावेळी अहमदनगर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ही टीका केली. ती करतानाच, याच गृहखात्याच्या राज्यमंत्रिपदी शिवसेनेचेच दीपक केसरकर आहेत, याचा मात्र त्यांना सोयीस्कररित्या विसर पडला. अर्थात, आता उद्धव ठाकरे यांना नेमक्या कोणत्या गोष्टींचा कोणत्या वेळी विसर पडला याची यादी करायला बसलं, तर आपलीच दमछाक होईल, अशी परिस्थिती आहे. गेल्या साडेतीन वर्षांचा इतिहास ढळढळीतपणे आपल्यासमोर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने भाजप-शिवसेनेचे सरकार ‘निकम्मे’ असणं यात नवीन काही नाही. फक्त, हेच सरकार आणि सरकार चालविणारे पक्ष त्यांना पुढील दोन महिन्यांत होणार्‍या विधान परिषदेच्या २१ जागांच्या निवडणुकीतही ‘निकम्मे’ वाटतात का, हे पाहणं गरजेचं ठरतं.
 
 
 
शिवसेनेच्या रडारवर असलेला आणखी एक मुद्दा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात नाणार येथे होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प. हा प्रकल्प व्हावा की न व्हावा, तो उपयुक्त आहे की हानिकारक, पर्यावरणदृष्ट्या योग्य की अयोग्य, हा मुद्दा वेगळा. एव्हाना त्यावर दोन्ही बाजूंनी बरीच चर्चा झाली आहे. मात्र, शिवसेनेने आणि नारायण राणेंनी या प्रकल्पाला विरोध करणं, म्हणजे ’आयजीच्या जीवावर बायजी उदार’चंच आणखी एक उदाहरण. नाणार कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा पणच शिवसेनेने केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे शिवसेना आमदार राजन साळवी यांनी म्हणे यासाठी कंबर कसली आहे. मात्र, असेच पण करत अशाच कंबरा जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प, रत्नागिरीजवळ फिनोलेक्स कंपनीचा औष्णिक वीज प्रकल्प, जयगडचा जिंदाल कंपनीचा औष्णिक वीज प्रकल्प आणि अशा असंख्य प्रकल्पांच्या विरोधात कसल्या गेल्या होत्या. कोकणातील जनतेने गेल्या दहा वर्षांत हे जवळून पाहिलेलं आहे. मात्र, आता त्या कंबरा गेल्या कुठे? हे मात्र कोणीच सांगायला तयार नाही. नाणारसुद्धा असंच विस्मृतीत गेलं असतं, परंतु प्रकल्प विरोधात उभ्या राहिलेल्या समितीत शिवसेनेच्या नेत्यांना काडीचीही किंमत दिली जात नाही आणि याचीच भीती शिवसेनेला वाटते आहे. कारण अर्थातच, आगामी २०१९ मधील निवडणुका. रत्नागिरीतील हा लांजा-राजापुराचा भाग शिवसेनेने गेली अनेक वर्षं घट्ट बांधून ठेवला आहे. नारायण राणे यांच्या बंडानंतर तीन-चार वर्षं वगळता हे चित्र फारसं बदललेलं नाही. अशात, नाणारच्या निमित्ताने शिवसेनेला कोणताही धोका पत्करायचा नाही, म्हणून हा सगळा अट्टाहास. सेनेची हीच अडचण प्रकल्पाच्या विरोधात उतरलेली समिती तसंच नारायण राणे यांनी ओळखली आहे.
 
 
 
नारायण राणे यांनाही आपलं उपद्रवमूल्य सतत ताजं ठेवावं लागत असल्याने तेही नाणारमध्ये उतरले आहेत. हे तेच राणे आहेत, ज्यांनी जैतापूर प्रकल्प व्हावा म्हणून बरेच कष्ट घेतले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना रत्नागिरीत बोलावून मोठमोठ्या सभाही याच राणेंनी घेतल्या होत्या. राजापूरच्या याच आमदार राजन साळवींशी भर व्यासपीठावर राणेंची शाब्दिक चकमक उडाली होती. आता हेच राणे नाणार प्रकल्पाला विरोध करत आहेत आणि साळवीही विरोध करत आहेत. कारण अर्थातच स्पष्ट आहे. या सगळ्यात अचानक नाणार प्रकल्पाला समर्थन देणारी एक समिती उगवली. तिने मोठ्या थाटात मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली खरी, पण भाजप खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी हुल्लडबाजी करत त्यातील हवाच काढून घेतली. या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालताना घोषणा दिल्या त्या कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांच्या नावाच्या. कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनीही मग ’‘मला माझ्या कार्यकर्त्यांचा माज आहे,’’ वगैरे प्रतिक्रिया दिली. या सगळ्यांचाही परस्पराशी काडीमात्र संबंध नसल्याने त्याचा विचारही न केलेला बरा. पण, प्रकल्पाला समर्थन देणारी एक समिती येते काय आणि अजितसिंह सेंगर नावाचा करणी सेनेशी संबंधित असलेला, ’पद्मावत’ सिनेमाला विरोध करण्यात आघाडीवर असलेला माणूस नाणार प्रकल्प व्हावा यासाठी पत्रकार परिषद घेतो काय आणि प्रकल्पविरोधी समितीचे अशोक वालम, स्वाभिमानचे कार्यकर्ते तिथे प्रकटून हुल्लडबाजी करतात काय... हे सगळं वरकरणी दिसतं तितकं सरळ निश्चितच नाही. एकीकडे ही सेंगर नामक व्यक्ती कोण? तिचा रत्नागिरीशी वा कोकणाशी संबंध काय? भाजपशी संबंध काय? याचा विचार करत खुद्द भाजपचे नेतेही संभ्रमात पडलेले असताना या ’अजितसिंह सेंगर’ यांनी आपण रत्नागिरीचे असल्याचं आणि आपला जन्मही रत्नागिरीतच झाल्याचं जाहीरही करून टाकलं! विख्यात व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर यांनी एकदा म्हटलं होतं - ’’कोकणातील रस्ते आणि कोकणातील माणसे यांच्यापैकी कोणी कोणाला बनवले हा संशोधनाचा विषय आहे.’’ नाणारचा रस्ताही या सगळ्या अतर्क्य घडामोडींमुळे काहीसा तसाच भासू लागला आहे.
 
 
 
कोकणात या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे दूरवर विदर्भातील भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी यामध्ये उडी घेणं आणि त्यानंतर हे देशमुख व शिवसेना नेतृत्वाकडून झालेली वक्तव्यं, हे तर अधिकच हास्यास्पद! काय तर म्हणे, ‘‘नाणार विदर्भात न्या.’’ एप्रिल-मेमध्ये रत्नागिरीत येऊन आंब्याची पेटी नेण्याइतपत ही गोष्ट या मंडळींना सोपी वाटत असावी. म्हणून एप्रिल-मेच्या रणरणत्या मोसमात जनतेचं डोकं गरमकरण्याचं त्यांनी ठरवलं आहे. याही पुढे जात आशिष देशमुख यांनी नाणार प्रकल्प विदर्भात नेऊन दाखवल्यास पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यास आम्ही पुढाकार घेऊ, असंही सेना नेतृत्वाने जाहीर करून टाकलं. नाणार प्रकल्प उभारणार कोण? तो इतरत्र न्यायचा की नाही हे ठरवणार कोण? पावसाळी अधिवेशन कुठे घ्यायचं हे ठरवणार कोण? तर केंद्र व राज्य सरकार. मात्र, पुढाकार वगैरे घेणार कोण? तर शिवसेना आणि आशिष देशमुख. वास्तविक आशिष देशमुख हे तसे सुविद्य गृहस्थ. त्यांचे वडील रणजीत देशमुख हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते. मात्र, आता २०१९ जवळ येऊ लागल्यानंतर आपलं काहीतरी स्वतंत्र अस्तित्व दाखवायला हवं, या अपरिहार्यतेपोटी आशिष देशमुख गेले वर्ष-दीड वर्षं असले उद्योग करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांना अशा मंडळींचं काय करायचं ते अधिक चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नाणारची अधिसूचना रद्द करण्याच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली. नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत उभारायचाच, असा चंगच भाजपने बांधला आहे आणि त्या दिशेने वाटचालही सुरू आहे. आता या वाटेत किती ‘आयजी’ आणि किती ‘बायजी’ येतात आणि मोदी-फडणवीस त्यांचा कसा निकाल लावतात ते २०१९ पूर्वी स्पष्ट होईलच, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.  
 
 
 
-निमेश वहाळकर 
 
 
@@AUTHORINFO_V1@@