लक्षाधीश करणारी वास्तू समाजाच्या झोळीत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |


विजय निचकवडे
भंडारा, 
 
आम्ही एवढे स्वार्थी झालो आहोत की मी आणि माझे कुटुंब या पलीकडचा विचार करण्याची क्षमताच गमावून बसलो आहोत. जिथे सख्खे सख्ख्यांचे नाहीत, तिथे आपले असलेले समाजासाठी स्वाहा करून देण्याचा विचार करणारे दुर्मिळच म्हणावे लागतील. भंडार्‍याच्या खंडाळकर कुटुंबीयांनी असा केवळ विचारच केला नाही, तर प्रत्यक्ष कृती करून ‘इदं न मम, राष्ट्राय स्वाहा’ म्हणत घराची विशाल अशी वास्तूच समाजाच्या झोळीत टाकली. वास्तू मूल्यवान असली तरी ज्या उदात्त हेतूने ती समाजकार्यासाठी समाजाच्या स्वाधीन केली गेली, ती कृतीच मुळात पैसे, धन, संपत्तीमध्ये तोलण्यापलीकडची आहे! आज जेथे इंच इंच जागेसाठी रक्ताच्या नात्याचे पाणी होते, तेथे डोळ्यात आनंदाश्रू आणून नि:स्वार्थ मनाने स्वतःजवळचे देऊन टाकणे धाडसाचेच नव्हे काय?
 
 
आज दातृत्वाचा आव आणणारे अनेक जण देताना काय घेता येईल, याचा ताळेबंद आधीच बांधून ठेवतात. समाजात हीच मानसिकता फोफावत असताना कोणताही स्वार्थ, अपेक्षा न ठेवता, ज्यातून लक्षावधी रुपये मिळविले जाऊ शकतात, अशी वास्तू समाजकार्यासाठी अर्पण करण्याचे धाडस येथील स्व. अण्णाजी खंडाळकरांच्या कुटुंबीयांनी दाखविले आणि समाजापुढे आदर्श उभा केला.
 
अण्णाजी खंडाळकर म्हणजे कर्तव्यकठोर आणि समाजभान राखून जीवन जगलेले व्यक्तिमत्त्व. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून निष्ठेने आयुष्यभर समाजासाठी झटणार्‍या या व्यक्तिमत्त्वाने स्वतःचे कुटुंब सुदृढ करतानाच समाजालाही दिशा देण्याचे काम केले. डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजींचा सहवास लाभलेल्या अण्णाजींचे विचार आणि आचारांचा पगडा कुटुंबातील सदस्यांच्या मनावर होताच. अण्णाजींमधील सेवाभाव पत्नी आणि मुलांमध्ये उतरला. अण्णाजी ज्या वास्तूमध्ये समाजासाठी झटले, ती वास्तू समाजाच्याच कामी यावी या हेतूने कुटुंबीयांनी वास्तू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समाजजागृती प्रतिष्ठानच्या सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला.
 
 
भंडारा शहराच्या हृदयस्थानी असलेली लाखो रुपये मिळवून देणारी वास्तू समर्पित करताना कुटुंबातील एकाही सदस्याच्या मनात काहीतरी गमावल्याची खंत नव्हती, उलट अण्णाजींच्या समाजसेवेचा वारसा या निमित्ताने जिवंत राहील, हा आशावाद आणि घेतलेल्या निर्णयाचा अभिमान त्यांच्या डोळ्यातून झळकत होता.
दोन दिवसांपूर्वी एका छोटेखानी कार्यक्रमात वास्तू समर्पण सोहळा झाला. अत्यंत भावूक अशा वातावरणात झालेला हा सोहळा अनोखा ठरला. रा. स्व. संघाचे प्रांत प्रचारक प्रसाद महानकर, जिल्हा संघचालक राम चाचेरे, नगरसंघचालक अनिल मेहर, डॉ. शरद व्यवहारे, अण्णाजींच्या पत्नी निर्मला आणि कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
चौकट..........
सेवाकार्य घडणार यातच समाधान : स्नेहल खानापूरकर
बाबांच्या सेवाभावी वृत्तीचा वारसा जपण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. रा. स्व. संघाच्या स्वाधीन केलेल्या वास्तूमधून घडणारे सेवाकार्य बाबांच्या आठवणी चिरकाळ टिकवून ठेवेल. त्यामुळे या सेवाकार्यातून खरे समाधान आम्हा कुटुंबीयांना मिळेल, अशी मार्मिक प्रतिक्रिया या निर्णयानंतर अण्णाजींच्या कन्या स्नेहल खानापूरकर यांनी व्यक्त केली.
@@AUTHORINFO_V1@@