उत्तरप्रदेशातही साजरा होणार महाराष्ट्र दिन - राम नाईक यांनी दिली माहिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |

 
 
मुंबई : उत्तरप्रदेश व महाराष्ट्र शासनाच्या सामंजस्य करारानुसार येत्या १ व २ मे रोजी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील राजभवनात महाराष्ट्र स्थापना दिवस सोहळा होणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी तसेच भाजप मुंबई उपाध्यक्ष अमरजित सिंह मिश्रा यावेळी उपस्थित होते.
 
 
उत्तर प्रदेश सरकार, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र समाज लखनौ, मराठी समाज उत्तर प्रदेश आणि भातखंडे संगीत विश्वविद्यालय यांनी संयुक्तरित्या हा सोहळा आयोजित केला आहे. १ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी राज्यपाल राम नाईक असतील. कार्यक्रमास अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. दिलीप बाबासाहेब भोसले आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आणि सूचना मंत्री डॉ. नीळकंठ तिवारी हे देखील उपस्थित असणार आहेत. ३० डिसेंबर २०१७ रोजी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात सांस्कृतिक देवाण घेवाणीचा सामंजस्य करार झाला त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
दिनांक २ मे रोजी कार्यक्रमाचा समारोप होणार असून त्यावेळी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य तसेच ज्येष्ठ मंत्री डॉ. रिता बहुगुणा जोशी, लक्ष्मीनारायण चौधरी, आशुतोष टंडन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पहिल्या दिवशी ‘भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. यात १६ लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. २ मे रोजी नाट्यसंगीताची वाटचाल हा कार्यक्रम अरविंद पिळगावकर आणि सहकारी सादर करतील. या कार्यक्रमामुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे संबंध अधिक स्नेहाचे होतील, अशी आशाही राज्यपाल श्री. नाईक व्यक्त केली.
 
@@AUTHORINFO_V1@@