आसाराम प्रकरणातील जनतेच्या प्रगल्भतेचा प्रत्यय...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018
Total Views |
अल्पवयीन बालिकांच्या शोषणाचा आरोप असलेला आसाराम बापू एकदा गुन्हेगार ठरला अन्‌ सर्वदूर त्याच्या प्रतिमेचे अवतरण सुरू झाले. कुणी सार्वजनिक चौकांना दिलेले त्याचे नाव बरखास्त केले, तर कुणी प्रतिमा देव्हार्‍याबाहेर काढून त्याचे निर्माल्य करीत, ते पाण्यात शिरवण्याची तयारी आरंभली. कालपर्यंत जे व्यक्तिमत्त्व डोक्यावर घेऊन लोक नाचले, त्या व्यक्तीबाबत भ्रमनिरास झाल्यावर, क्षणाचाही विलंब न लावता त्याला पायदळी तुडविण्यासही लोक कमी करीत नाहीत, हे परवा पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरंतर हीच भारतीय जनमानसाची खरी ओळख आहे आणि तीच त्याची ताकदही. एखादी व्यक्ती मनापासून भावली की, तिला थेट देव्हार्‍यात बसवून तिची पूजा करायला मनाचा मोठेपणा लागतो. मनं तेवढी निर्मळ असावी लागतात त्यासाठी. त्यासाठी बौद्धिक प्रगल्भता लागते ती वगेळीच. इंदिरा गांधी असो की आसाराम बापू, लोकशाही व्यवस्था स्वीकारलेल्या या देशातील लोक त्याच प्रगल्भतेचा प्रत्यय देत आलेत आजवर कित्येकदा. ना इंदिरा गांधींना दुर्गेची उपमा देताना कुणी मनाचा कोतेपणा दाखवला, ना आणिबाणी लादण्याच्या त्यांच्या निर्णयाविरुद्ध रोष व्यक्त करताना कुणी त्यांची पत्रास बाळगली. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांना त्यांच्या काळ्या कृत्याबाबत शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर, पंचकुलात घडून आलेला हिंसाचार हा केवळ अपवाद आहे. एरवी, या देशातले लोक भल्याची भलावण करणारे अन्‌ वाईटाला पायाखाली तुडविणारे आहेत, हेच खरे.
 
हेही तितकेच खरे की, इथली जनता जराशी भाबडी आहे. मनानं खूप साधी आहे. श्रद्धाळू आहे. ती खूप लवकर विश्वास ठेवते कुणावरही. एकदा का विश्वास बसला की, मग निस्सीम भक्ती आणि प्रचंड श्रद्धेनं समोरच्याला सारंकाही समर्पित करून बसतात लोक. आसारामसारखी पिलावळ जन्माला येण्यामागील कारणही तेच आहे. त्यामुळेच की काय, पण खूपदा फसवणूकही वाट्याला येते त्यांच्या. पण, म्हणून श्रद्धेपोटी सर्वस्व परस्वाधीन करण्याची सवय सोडून दिलेली नाही कुणीच. चुकांसाठी शिक्षा सुनावण्यासोबतच त्या चुका माफ करण्याची जिंदादिलीही लोकांनी अवचित कमावली आहे इथे. फाळणीच्या वेदनांची धग विसरून मुस्लिमांचा आणि आणिबाणीचा काळा इतिहास मागे टाकून इंदिरा गांधींचा पुनर्स्वीकार करताना संपूर्ण जगाने अनुभवली ती तमाम भारतीयांची हीच जिंदादिली! काही वर्षांपूर्वीपर्यंत कधी ऐकलीही नव्हती अशी काही नावं मागील कालावधीत नको तेवढी प्रसिद्धी पावली आहेत. यात काही स्वयंघोषित साधू-संतांचाही समावेश आहे. आगापिछा न बघता लोक श्रद्धेनं त्यांच्यापुढे नतमस्तक होताना दिसू लागले. ही मंडळी प्रवचनांद्वारे भलेमोठे लोकसमूह प्रभावीत करीत असल्याचे चित्रही एव्हाना निर्माण झाले होते. कित्येक घरांतील सकाळ दूरचित्रवाणीवरील ज्यांच्या प्रवचनाने सुरू व्हायची, त्या सुधांशु महाराजांपासून तर आसारामपर्यंतच्या तमाम मंडळींच्या तस्विरींना लोकांच्या देव्हार्‍यात केव्हा स्थान मिळाले, कळलेच नाही!
 
 
या कथित संतांनी केवळ लोकांच्या देव्हार्‍यातच स्थान बळकावले नाही, तर एव्हाना त्यांच्या आरत्यादेखील तयार झाल्या, त्या लोकांना मुखोद्गतही झाल्या. त्या त्या संतांच्या भक्तांसाठी अगरबत्त्यांपासून तर पूजेच्या इतर साहित्यापर्यंतची दुकानं थाटली जाऊ लागली. त्यांच्या रसाळ वाणीतील प्रवचनाचे तर केवळ निमित्त होते. बाकी हा, आपल्या खिशातनं पैसे काढण्यासाठी मांडला गेलेला आपल्याच भक्तीचा तो सौदा होता, हे कळेपर्यंत बराच वेळ निघून गेला. मग भक्तांच्या भक्तींचा सरेआम व्यापार होत राहिला. त्यांच्या भाबडेपणाचा गैरफायदा लाटण्याच्या नवनवीन क्लृप्त्या अंमलात येत गेल्या. परीक्षा न घेता कुणालाही देवत्व बहाल करून थेट देव्हार्‍यात स्थान बहाल करून टाकण्याची शिक्षा कुणालातरी तर मिळणारच होती ना! आमच्या बेजबाबदार वर्तणुकीला लगाम घालण्यासाठी तर आसाराम प्रकरण घडले नसावे ना? लोकांना देव्हार्‍यात बसविण्याची घिसाडघाई करणार्‍या भक्तांचे डोळे खाडकन्‌ उघडण्यासाठी तर हा सारा घटनाक्रम जुळून आला नसेल ना?
 
 
पडताळणीशिवायच कुणासमोरही नतमस्तक होण्याची सवय अयोग्यच. पण तसे करणारा हा समाज, सारा घटनाक्रम ध्यानात येताच, उंचावर नेऊन ठेवलेली ती प्रतिमा खाली आणून मातीमोल करायलाही क्षणभराचा विलंब लावत नाही, हे मात्र महत्त्वाचेच. परवा, तिकडे न्यायालयाचा निर्णय जाहीर झाला. आसारामला दोन जन्मठेप सुनावल्या गेल्या अन्‌ मध्यप्रदेशात त्याचे नाव देण्यात आलेल्या रस्त्यावरील नावाचा फलक त्वेरेने काढला गेला. बिनदिक्कतपणे विश्वास ठेवणार्‍या समूहाचे अलौकिकत्व अन्‌ वेगळेपण आहे ते हेच! तो जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा त्याच्याबद्दलचा अपशब्दही सहन करीत नाही, पण जेव्हा आपला निर्णय चुकल्याची बाब लक्षात येते तेव्हा, ती चूक सुधारण्यात त्याला जराही कमीपणा वाटत नाही, ही बाब भारतीय हिंदू समाजाचे असाधारण असे वेगळेपण सिद्ध करणारी, त्याची वैचारिक उंची स्पष्ट करणारी आहे.
 
भारतीय समाज कुणावरही सहज विश्वास ठेवून मोकळा होतो. कुणी येरागबाळाही त्याची फसवणूक करू शकतो. तो सहसा संतापत नाही. प्रमाणाबाहेर सहनशील आहे. तो कुणालाही डोक्यावर घेऊन बेधुंद नाचू शकतो. तो कुणाच्याही चुका पोटात घालू शकतो... अशी कित्येक वैशिष्ट्यं जपणारी माणसं एकदा का संतापली की मग मात्र रुद्रावतार धारण करतात! मग कॉंग्रेस काय नि आसाराम काय, कोण पायदळी तुडवलं जातंय्‌, याची चिंता तो वाहात बसत नाही. डागाळलेल्या प्रतिमांचे धनी ठरलेल्यांच्या पखाली वाहण्यात तो फुकाचा स्वाभिमानही बाळगत नाही की त्यात वेळही दवडत नाही. कालपर्यंत मोठ्या आस्थेनं मनात बाळगलेल्या प्रचंड विश्वासाला कुणी तडा दिला की स्वत:च्या पातळीवरही तो त्याची शिक्षा समोरच्याला ठोठावून मोकळा होतो. काल मोठ्या श्रद्धेने घरातल्या देवघरात ठेवलेली प्रतिमा आज रागाने बाहेर काढणे, ही त्याच्या लेखी त्याने दिलेली सर्वोच्च शिक्षा असते. सार्वजनिक स्तरावर त्याचे मोल कुणाच्या ध्यानातही येणारे नसले, तरी न्यायालयाने जाहीर केलेल्या शिक्षेपेक्षाही मोठी किंमत एका सामान्य भक्ताच्या त्या भूमिकेतून स्पष्ट होत असते. शिवाय, आपण ज्याला मानाचे स्थान दिले, त्याने त्या सन्मानाची किंमत राखली नाही. उलट विश्वासाला तडा दिलाय्‌ म्हटल्यावर, कालची भूमिका बदलून आज त्याला शिक्षा देण्यासाठी, स्वत:ची कालची चूक सुधारून आज नवी भूमिका स्वीकारण्यासाठी लागणारा, त्याने दाखवलेला समजूतदारपणा तर कल्पनातीत ठरावा असाच आहे.
 
ज्ञानेश्वरांपासून तर तुकोबारायांपर्यंत अन्‌ नामदेवांपासून तर कबीरापर्यंत, संतांची भलीमोठी देण लाभलेल्या समूहाला ताळ्यावर आणण्याची, अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढत त्याला श्रद्धेच्या विस्तीर्ण चौकटीत बंदिस्त करण्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी संतपरंपरा कुठे; ‘आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा विटेवरी’ म्हणताना, निर्गुण, निराकार, अव्यक्त आत्म्याची अनुभूती विठ्लाच्या सगुण, साकार, व्यक्त रूपातून शोधण्यासाठी अविरत धडपणारी ही मांदियाळी कुठे अन्‌ चार-दोन प्रवचनं देताच स्वत:च स्वत:ला ब्रह्मज्ञानी संबोधू लागलेली आसारामसारख्या बोलघेवड्यांची गर्दी कुठे, यातील भेद लक्षात येईपर्यंतच... त्यानंतर मात्र, एका क्षणात आसारामला त्याची जागा दाखवून देण्याचे धारिष्ट्य सिद्ध करावे ते हिंदू समाजातील भक्तगणांनीच. रावण असो की मग कंस, त्यांची नकारात्मक भूमिका उदार मनानं मान्य करण्याचा आणि तेवढ्याच मोठ्या मनानं ती झिडकारण्याचा इतिहास निर्माण केलाय्‌ या समूहानं आजवर. आसारामच्या बाबतीत त्याची पुनरावृत्ती करताना हा समाज जराही चलबिचल होत नाही. चुकीच्या असल्याचे ठाऊक असतानाही, केवळ धर्माच्या कट्‌टर शिकवणीचा पाठलाग करत त्या रूढी-परंपरांचे समर्थन करीत राहण्याच्या एका प्रवृत्तीचाही हा देश साक्षीदार ठरला असताना, चूक असेल ते निडरतेने झिडकारण्याची ही तर्‍हा अनुकरणीय ठरावी अशीच आहे...


सुनील कुहीकर
9881717833
 
@@AUTHORINFO_V1@@