‘बारानाजा’चं पुनरुज्जीवन करणारा शेतकरी कार्यकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2018   
Total Views |
 
 
 
 
 
 
भारतातील गावरान बियाणी जतन करण्यासाठी आणि पारंपरिक भारतीय शेतीचं पुनरूज्जीवन करण्यासाठी भारतात ज्या काही छोट्या-मोठ्या चळवळी सुरू आहेत, त्यामध्ये विजय जरधारींचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.
 
 
हरितक्रांतीपूर्वीची भारतीय शेती वैविध्यपूर्ण होती. शेतीच्या पद्धती स्थलपरत्वे बदलत होत्या. त्या-त्या पद्धती त्या-त्या परिसराशी मिळत्याजुळत्या होत्या. पारंपरिक भारतीय शेतीतलं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बहुपीकपद्धती. एकाच वेळी एकाच जमिनीत वेगवेगळी पिकं घेण्याची पद्धत. ‘बारानाजा’ ही अशीच एक पारंपरिक पीकपद्धत होती, ज्यामध्ये एकाच वेळी एकाच जमिनीत १२ पिकं घेतली जायची. शेतीचं आधुनिकीकरण जसजसं व्हायला लागलं, तसतशी बहुपीकपद्धतीची जागा एकपीकपद्धतीने घेतली. यामुळे ‘बारानाजा’ ही पद्धत काळाच्या ओघात नष्ट होऊ लागली होती. मात्र, उत्तराखंडमधले विजय जरधारी यांनी खूप संघर्ष आणि प्रबोधन करून, या पद्धतीचं पुनरूज्जीवन केलं आहे.
 
 
 
भारतातील गावरान बियाणी जतन करण्यासाठी आणि पारंपरिक भारतीय शेतीचं पुनरूज्जीवन करण्यासाठी भारतात ज्या काही छोट्या-मोठ्या चळवळी सुरू आहेत, त्यामध्ये विजय जरधारींचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातल्या जरधार या गावात जन्मलेल्या विजय जरधारी यांची उत्तराखंड हीच कर्मभूमी. १९७०च्या दशकात झालेल्या ’चिपको आंदोलना’त ते सक्रियरीत्या सहभागी होते. लहानपणापासून स्थानिक शेतकरी मित्रांबरोबर ते शेती करत होते. त्यांनी रासायनिक शेतीही करून पाहिली, मात्र त्याचे नकारात्मक परिणामदिसायला लागल्यावर ते पुन्हा पारंपरिक शेतीकडे वळले. जरधारींनी ‘पारंपरिक भारतीय शेती’ हाच अभ्यासविषय मानला. उत्तराखंड हा भारतातला असा प्रदेश आहे जिथे भारतातली सर्वात जास्त पिकांची विविधता आढळते. मात्र, तिथले शेतकरी जसजसे आधुनिक शेती करू लागले, तसतशा तिथली स्थानिक बियाणी आणि पीकपद्धती नष्ट होऊ लागल्या. मात्र, या पद्धतीचं शाश्वत आहेत हे जरधारींनी पूर्ण ओळखलं होतं. १९८९ साली विजय जरधारींनी ‘बीज बचाव आंदोलन’ सुरू केलं आणि स्थानिक बियाणी संग्रहाची मोहीमसुरू केली. त्यादरम्यान उत्तरखंडमधील बहुतांश शेतकर्‍यांनी संकरित बियाणी वापरून, रासायनिक शेती सुरू केली होती. मात्र, अजूनही स्थानिक गावरान बियाणी ज्यांच्याकडे होती अशा शेतकर्‍यांचा शोध घेऊन, त्यांच्याकडून बियाणी मिळवण्याचा उद्योग सुरू केला. मिळालेल्या बियाण्यांचं पीक घेऊन, त्यापासून नवीन बियाणं मिळवून, ते आजूबाजूच्या स्थानिक शेतकर्‍यांना देऊ लागले. त्याला स्थानिक शेतकर्‍यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला. आज त्यांच्याकडे भारतातली एक मोठी ‘बीज बँक’ स्थापन झाली आहे, ज्यामध्ये सहाशेपेक्षा जास्त प्रकारची स्थानिक बियाणी संग्रहित केली गेली आहेत. तिथले बहुतांश शेतकरी आता बाजारातून बियाणी विकत न घेता, या बीजबँकेतली बियाणी वापरून शेती करतात. ‘बारानाजा’ पीक पद्धतीचं पुनरूज्जीवन हा या आंदोलनाचाच एक भाग होता. या पद्धतीमध्ये धान्य, कडधान्य, भाजीपाला यांची बारा वेगवेगळी पिकं एकाच जमिनीत एकाच वेळी घेतली जातात. यामध्ये बाजरीचं पीक मुख्य असतं आणि त्याच्याबरोबरीने नौरंगी, राजमा अशी इतर पिकं घेतली जातात. या पीकपद्धतीचा फायदा असा की, अती पावसामुळे वा दुष्काळामुळे एखादं पीक वाया गेलं, तर उरलेली पिकं तरी वाचतात आणि शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ येत नाही. २००९ मध्ये उत्तराखंडमध्ये पडलेल्या दुष्काळात याचा चांगलाच प्रत्यय आला. या दुष्काळात काही पिकं पूर्णत: वाया गेली असली तरी माठ, बाजरी आणि गोडा ही पिकं तगून राहिली. त्यामुळे अन्नटंचाई निर्माण झाली नाही. या पद्धतीमध्ये मातीचं आरोग्य चांगल्या प्रकारे राखलं जातं. कडधान्यांमुळे मातीला नायट्रोजन मिळतो, तर बाजरीच्या पिकामुळे मातीला लोह आणि फॉस्फरसचा पुरवठा होतो. पिकांच्या विविधतेमुळे कीटक आपोआप नियंत्रणात राहतात. या बारा पिकांमध्ये एक प्रकारचं सहजीवन असतं. उदा. धान्यपिकांच्या उभ्या दांड्यांचा आधार घेऊन, कडधान्यांच्या वेली वाढतात. धान्यपिकांची मुळं माती घट्ट धरून ठेवतात. माणसांना आणि गुरांना वैविध्यपूर्ण आहार मिळाल्यामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. जरधारी म्हणतात की, ‘‘शेती ही मूलत: खाण्यासाठी आहे, पैशासाठी नव्हे. आधुनिक शेती पद्धती ही मनुष्यकेंद्री आहे; त्यात फक्त जास्तीत जास्त पैसा मिळवून देणारं पीक घेतलं जातं. पण, पारंपरिक भारतीय शेती ही माणसासहित निसर्गातल्या प्रत्येक घटकाची काळजी घेणारी आहे. म्हणूनच ती शाश्वत आहे.’’
 
 
कुठलीही नवीन गोष्ट यशस्वी झाली, असं तेव्हाच म्हणता येतं जेव्हा ती समाजाकडून स्वेच्छेने स्वीकारली जाते. बदल हा सार्वत्रिक होण्यासाठी तो प्रथमकुठल्यातरी एका व्यक्तीने सुरू करावा लागतो. आज उत्तराखंडमधले बहुतांश शेतकरी ‘बारानाजा’ पद्धतीने शेती करतात. प्रत्येक शेतकर्‍याची स्वत:ची बीज बँक आहे. दुष्काळ पडो वा पूर येवो, इथल्या शेतकर्‍यांना अन्नटंचाई आणि उपासमारीला सामोरं जावं लागत नाही. पारंपारिक भारतीय शेती तिथे आता चांगली पुन:प्रस्थापित झाली आहे. मात्र त्याचे ‘पायोनिअर’ होते विजय जरधारी !
 
 
 -हर्षद तुळपुळे
 
@@AUTHORINFO_V1@@