असंतांचे संत - भाग दुसरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018   
Total Views |


 
 
सामाजिक, कौटुंबिक अथवा वैयक्तिक असुरक्षिततेची भावना जेव्हा सामन्यांच्या मनात जन्म घेते, तेव्हा राजसत्ता किंवा धर्मसत्ता यांचा आधार घेण्यासाठी सामन्यजन धावत असतात. प्रत्येक युगात याची प्रचीती भारतीयच नव्हे तर जगाच्या इतिहासात येत असते. तेव्हा जन सामन्यांच्या असुरक्षिततेचे भांडवल करून आपली दुकानदारी चालविण्याचा प्रयत्न प्रत्येक धर्मात असलेल्या काही धूर्त कावळ्यांद्वारे केला जातो. हिंदू धर्मात तो आसाराम असतो, इस्लाममध्ये तो जाकीर नाईक असतो, तर ख्रिस्ती धर्मात ती मदर तेरेसा असते. या सर्वांनी जनसामन्यांच्या दु:खाला कुरवाळण्यात इतके धन्य मानले की, पुढे यांना देवाची उपाधी यांच्याच भोंदूपणाला वाहून गेलेल्या भक्तांनी दिली. त्या भोंदूपणाच्या आड चालणारे सर्व पाप मग आपोआपच क्षम्य मानले गेले. आणि म्हणूनच आसारामचा भोंदूपणा जाणण्यास इतकी वर्षे उलटावी लागली, जाकीर नाईकच्या आतंकवादी कारवाया देखील अनेक वर्षांनंतर सिद्ध झाल्या. तर मदर तेरेसा आणि तिच्या अनेक सहकाऱ्यांचा पडदा अजूनही फाटायचा बाकी आहे.
 
 
या सर्वात सामान्यजनांना यातून सावरण्याचे महत्वाचे काम राजसत्ता देखील बजावू शकत नाही. कारण लोकशाहीत राजसत्तेला जनभावनांना दुखावून चालत नाही. त्यामुळेच भोंदूपणा जरी वाटत असला तरी देखील निवडणुका आल्यानंतर मंदिरांच्या फेऱ्या, बाबांचे आशीर्वाद, आर्चबिशपचे फतवे किंवा शांतीदुतांची गळाभेट राजकीयदृष्ट्या फायद्याच्या मानल्या जातात. कारण मोठ्याप्रमाणात मतदार त्याला भूललेले असतात. या सर्वांना जागरूक समाज योग्य उत्तर देऊ शकतो, अशा समाजाची निर्मिती करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांना त्या-त्या वेळेला पुढे यावे लागते. तेव्हा एकदा सोडलेला तीर मागे घेता येत नाही. आपल्या शब्दाला कायम राहणारे, आणि त्याचप्रमाणे स्वत:सहित समाजाला आचरण करायला लावणारेच युगपुरुष ठरत असतात.
 
 
आसारामच्या खटल्याचा निकाल जोधपुर न्यायालयाने दिला. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याच्या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. तसेच त्याच्याबरोबर असलेल्या २ अन्य सहकाऱ्यांना देखील २०-२० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. हि घटना वाचल्यानंतर अश्या असंतांचा तिटकारा आल्याशिवाय राहत नाही. मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथे आसाराम गुरुकुलमध्ये १२ वीत शिकणारी मुलगी जेव्हा आजारी पडते, त्यावेळी वसतिगृहाची अधीक्षक तिला भूतप्रेत पछाडलेला असल्याचा दावा करते. तिच्या दाव्याला बळी पडलेले आई वडील देखील केवळ बापूच याचा इलाज करू शकतील असे मान्य करतात, आणि असल्या भोंदू लोकांचे फावते. २१ व्या शतकात देखील वैद्यकीय चाचणी ऐवजी भूतप्रेत काढणे महत्वाचे मानणाऱ्या मानसिकतेचे काय करावे? याची कल्पनाच मुळात तिटकारा आणणारी! हे कुटुंबीय पुढे बापूला भेटण्यासाठी जोधपुर नजीक मणही नावाच्या गावात जातात. तेथे आसारामच्या आश्रमात मुक्काम केल्यानंतर त्याची भेट घेऊन आपली असुरक्षितता प्रकट करतात. त्यानंतर आसाराम आई-वडिलांची काऊन्सलिंग करतो, जणू ती एक प्रकारची अप्रत्यक्ष परवानगीच असते! बाबाच्या भूलथापांना बळी पडलेले आई-वडील आपल्या मुलीच्या अंगात असलेले भूत-प्रेत उतरविण्यासाठी तिला बाबाच्या बंद खोलीत पाठवतात. त्यांच्या दृष्टीने हा इलाजाचा एक भाग असतो, मात्र आसाराम सारख्या नाराधामासाठी ही संधी बनते. न्यायालयाच्या निकालात जे लिहिले आहे त्या प्रमाणे आसारामने १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री त्या बंद खोलीत अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केले. तिच्याशी अतिप्रसंग केला आणि तिला देखील शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती. हा प्रकार अवघा एक ते दीड तास चालला. बाहेर असलेल्या रक्षकाने देखील यात बापूच्या पापकर्माची रक्षा करण्यातच धन्यता मानली. घडलेला प्रकार बाहेर कुणाला सांगितल्यास आई-वडिलांसहित तुझा देखील खून करीन अशी धमकी देखील या असंताने दिली.
 
 
घाबरलेली अल्पवयीन पीडिता आश्रमात काहीही बोलली नाही, मात्र पुन्हा घरी आल्यावर तिने आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार यथेच्छ सांगितला. पीडितेच्या मातापित्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आणि आसारामचा बुरखा जगासमोर टराटरा फाटला. या घटनेने अनेकांचे डोळे पुन्हा एकदा उघडले. त्यानंतर मुलीला व तिच्या आई-वडिलांना अनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या. मात्र संपूर्ण प्रकरणात ही मंडळी खंबीरपणे उभी राहिली, आपली साक्ष मागे घेतली नाही आणि त्यामुळेच न्यायालयात देखील तो गुन्हा सिद्ध होऊ शकला आणि आसारामच्या पापाचा घडा भरला.
 
 
जागरूक समाजाने तयार केलेल्या व्यवस्था तेव्हाच प्रभावीपणे चालू शकतात जेव्हा त्यामागे खंबीरपणे उभे राहिले जाईल. आज आसारामच्या पापकर्माला सामान्य समाजाने धुत्कारले आहे, आणि त्या पीडीतेच्या मागे खंबीरपणे उभे राहणे पसंत केले आहे. यात राजसत्ता आणि धर्मसत्ता देखील तिच्याच पाठीमागे आहेत. राजसत्ता आणि धर्मसत्ता हे समाजव्यवस्था चालविण्यासाठीचे साधन आहे, अर्थातच त्याचे वर्चस्व समाजावर असते, मात्र ते साध्य नाही. जागरूक समाज जेव्हा अशा घटनांत खंबीरपणे न्याय मागण्यासाठी उभा असतो तेव्हा राजसत्तेला आणि धर्मसत्तेला देखील त्याच्या मागे जावेच लागते. वेळोवेळी भारतीय समाजात अशा अनिष्टबाबी बंद करण्यासाठी आवाज उठवला गेला आहे. त्यावेळची राजसत्ता देखील यास अनुकूल होती, आजही ती आहेच! त्यामुळे प्रश्न राजसत्ता अथवा धर्मसत्तेचा नसून जागरूक समाजाचा आहे. तो घडविताना असंतांशी संगती करून चालणार नाही, त्यांचे उदात्तीकरण न करता अशा धुर्तांना वेळीच ओळखून त्यांपासून लांब राहिले पाहिजे.
 
परि त्वा करावे प्रबोधन | भ्रम शंकांचे ते निरसन |
असंतांचे करण्या निर्दालन | द्यावा विवेक प्रसाद ||
 
अशी मागणी समाजपुरुषाला करण्याची आज आवश्यकता आहे.
 
 
- हर्षल कंसारा
 
@@AUTHORINFO_V1@@