मृत्यूने दिले निर्भयसंकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |



 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. ’सी-६०’ व सीआरपीएफचे जवान यांचे अतुलनीय शौर्य आणि देशाला आतून पोखरणार्‍या या क्रूर श्‍वापदांना यमसदनी पाठविणार्‍या जवानांचे कार्य अफलातूनच! कारण, आजपर्यंत नक्षली कारवायांनी होरपळणारा देश आणि त्यानंतरची कार्यवाही काय करणार, यावर प्रसिद्ध होणारी प्रसिद्धीपत्रके यामुळे नक्षलींवर कडक आणि ठोस कारवाई होऊ शकते का ? हा विचार देशवासीयांना भेडसावतच होता.


यातच कित्येक जण पांढरपेशेपणाचा बुरखा पांघरत किंवा पुरोगामी विचारवंतांची झूल पांघरत आडून आडून, पण भक्कमपणे नक्षल्यांच्या क्रौर्याचे समर्थनच करताना दिसत होते. लोक भयाने दिङ्मूढ होतील, हताश होतील, त्यांचा सरकारवरचा, लोकशाहीवरचा, कायदा-सुव्यवस्थेवरचा विश्‍वास उडेल, असा भयंकर रक्तपात करा, उत्पात माजवा हा आणि हाच अजेंडा राबविणार्‍या नक्षलींना हुडकून काढणे, कारवाई करणे सोपे मुळीच नव्हते. पण, आपल्या सीआरपीएफच्या ’सी-६०’च्या मदतीने त्यांनी ते केले आहे. वर्षानुवर्षे जंगलामध्ये, वनवासी क्षेत्रामध्ये आपली क्रूरसत्ता या नक्षलींना राखता येते किंवा आली याचे कारण समाजाची मानसिकता हेही आहे. आपली कातडी, आपला जीव वाचविण्यासाठी नक्षलींच्या इशार्‍यावर नाचणारी गावेच्या गावे, त्यामध्ये त्या गावच्या सर्व प्रशासकीय यंत्रणाही आल्याच. अशा स्थितीत नक्षलींवर कारवाई कोण करणार ? पण, सध्याच्या सरकारने जानेवारी २०१८ पासूनच नक्षल्यांच्या नायनाटाचा उत्तम आणि महत्त्वाचा कार्यक्रम राबवला आहे. नक्षल्यांचा गावावरचा प्रभाव कमी व्हावा म्हणून गावागावात सरकारने योजना आणि त्याद्वारे कायदा-सुव्यवस्था पोहोचवली आहे. नक्षलग्रस्त गावातील युवकांना-युवतींना स्वयंरोजगाराचे कौशल्य, आत्मविश्‍वास आणि समाजदेशाबद्दलची हितैैषी प्रेरणा दिली आहे. पूर्वी नक्षली होते, पण आता ’आ अब लौट चले’ म्हणत परत चांगले नागरिक बनू इच्छितात, अशांना नक्षलग्रस्त भागात नक्षलींच्या विरोधी कारवाईत सहभागी करून घेतले आहे. एकत्र ३७ नक्षल्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा भोगण्यासाठी यमसदनी पाठवणे.. खरेच निर्भयसंकेत!
0000000000000000000000


मरतानाची जाणीव !

महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील इंद्रावती नदीच्या काठावर भामरागड तालुक्यातील कसनसून जंगल परिसरातल्या रोमहर्षक कारवाईमध्ये काही महिला नक्षलीही मारल्या गेल्या. प्रथमदर्शनी असे दिसते की, जवानांनी प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात जखमी झाल्यावर त्या छत्तीसगडच्या दिशेने पळत होत्या. इंद्रावती नदी पार करतानाच त्या ठार झाल्या.

अर्थात, प्रत्यक्ष मृत्यू समोर असताना या नक्षलींच्या डोळ्यासमोर त्यांनी हकनाक मारलेल्या निष्पापांचे चेहरे आले असतील का ? त्यांनी जाळलेल्या बसेस, घरं, त्यामध्ये जळालेले स्त्री-पुरुष यांच्या केविलवाण्या किंकाळ्या ऐकू आल्या असतील का ? सशस्त्र हल्ला करत गावातल्या लोकांना रांगेने उभे करत त्यांचे शीर धडावेगळे करताना लोकांच्या नजरेतले ते मृत्यूचे भय आणि जिवाची याचना या नक्षल्यांच्या मनात उमटली असेल काय ? चुकूनमाकून उरलेली अनाथ बालके आणि त्यांचे उजाड भकास बालपण भविष्य यांचे भूत या नक्षलींना दिसले असेल काय ?

खरंतर असे सगळे झालेही असेल. कारण, आम्ही जे करतो ते लोकांसाठी, समाजासाठी असा कितीही रॉबिन हूडचा आवेश या नक्षलींनी जिवंतपणी आणला असेल तरी प्रत्यक्षात आपण फिल्मी दुनियेतल्या खलनायकापेक्षाही लाखोपटींनी खलनायक आहोत, हे त्यांनाही माहितीच असेल. कारण, वर्गविहीन समाजव्यवस्थेचे रक्तरंजित समर्थन हे नक्षली करत होते, त्याचवेळी त्यांच्यामध्येही ‘कमांडर’ वगैरे आदेश देणारी उच्चव्यवस्था होतीच. यामध्ये स्त्री-पुरुष समानतेचा खोटा प्रचार करत काही महिलांना कच्छपी लावण्याचा प्रकार झाला असेल, हेही कबूल करावे लागेल. या महिला नक्षलींना हे पुरुष नक्षली किती आणि कशी समानतेची वागणूक देत असतील, हाही एक प्रश्‍न आहे. आपल्याला भयाण जंगलात पुरुष नक्षलींनी काय कशी वागणूक दिली, हे मरताना त्या स्त्री नक्षलींच्या मनात आले असेल का ?

देश-समाजाला बरबाद करण्याचे स्वप्न घेऊन निष्पापांना तडपून मारणारे नक्षली स्त्री-पुरुष. त्यांच्या मरणाने अवघ्या देशात समाधानाची लाट पसरली. आपल्या मृत्यूमुळे, आपल्या नसण्यामुळे कित्येकांनी सुटकेचा श्‍वास सोडला, ही मरणापेक्षाही भयाण जाणीव त्या नक्षल्यांना मरताना झाली असेल का ?

- योगिता साळवी


@@AUTHORINFO_V1@@