कोरियातील ऐतिहासिक घडामोडींचे अमेरिकेकडून स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |


वॉशिंग्टन : उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये आज झालेल्या ऐतिहासिक चर्चेचे अमेरिकेकडून स्वागत करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचर्चे कौतुक केले असून हा अत्यंत सकारात्मक बदल असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे यासाठी फार मोठे योगदान असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच ही चर्चा झाली आहे, असे देखील ट्रम्प यांनी म्हटले आहे.


उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जई इन यांच्यात आज सकाळी चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मिडीयावर याविषयी आपले मत व्यक्त केले. 'अनेक वर्षांच्या अणु चाचण्या, क्षेपणास्त्र चाचण्यांनंतर आज उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये ऐतिहासिक अशी चर्चा झाली आहे. यामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या कोरियन युद्धाची देखील समाप्ती झाल्याचे या दोन्ही देशांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कोरियामध्ये सध्या जे काही घडत आहे, ते अत्यंत चांगले आणि सकारात्मक आहे.' असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे.




तसेच या चर्चेचे सर्व श्रेय त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिले आहे. 'माझे मित्र शी जिनपिंग यांच्या मदतीशिवाय ही गोष्ट होणे अशक्य होते. त्यामुळे यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विसरले जाऊ शकत नाही. शी यांनी पुढाकार घेऊन उत्तर कोरियाशी चर्चा केली आणि त्यानंतरच या दोन्ही देशांमध्ये ही चर्चा झाली आहे.' असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच शी यांचे यासाठी कौतुक देखील त्यांनी केले आहे.

कोरियाच्या ७० वर्षांच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदाच उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी परस्परांच्या भूमीत जाऊन एकमेकांशी चर्चा केली आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने दोन्ही देशांच्या सीमेवर असलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून दक्षिण कोरियाच्या भूमीत प्रवेश केला. तसेच गेल्या ६४ वर्षांपासून सुरु असलेल्या कोरियन युद्धाच्या समाप्तीची घोषणा केली. त्यामुळे आजचा हा क्षण दोन्ही देशांसाठी किंबहुना संपूर्ण जगासाठीच ऐतिहासिक ठरला.

@@AUTHORINFO_V1@@