सोशल मीडियावरील वैचारिक युद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
सोशल मीडियावर व विशेषत: टि्‌वटरवर सतत वैचारिक युद्ध सुरू असते. प्रत्येक जण आपापल्या स्तराप्रमाणे आणि स्तरावर युद्ध लढत असतो. यात सर्व प्रकारचे आणि सर्व विचारांचे लोक आहेत. हिंदूवादी, हिंदू धर्म आणि सनातन मूल्यांचा किल्ला लढवत असतात, तर सेक्युलरवादी हा किल्ला कसा उद्ध्वस्त होईल, हे बघत असतात. बर्‍याचदा शिवराळ भाषेचा आणि गलिच्छ मानसिकतेचाही वापर होत असतो. आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. त्याला काही अंत नाही. कुणीच कुणाला जुमानत नाही. हे असे असले तरी, बरीच नवी माहिती, विचारांना चालना देणारे साहित्य टि्‌वटरवर येत असते, पण त्याचे प्रमाण अल्प आहे. एक मात्र बघायला मिळाले की, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू मूल्यव्यवस्था यांच्यावर प्राणांतिक हल्ले फार त्वेषाने होत आहेत. कम्युनिस्ट, सेक्युलर, मुसलमान इत्यादी वर्ग अतिशय खालच्या पातळीवरून हल्ले करताना दिसून येतो. हिंदूवादी मंडळी त्याचा आपापल्या परीने प्रतिवाद करतात. पण बरेचदा तो तोकडा पडतो. कारण, या कम्युनिस्ट, सेक्युलर मंडळींचे जाळे अधिक सघन आणि मुरलेले आहे. गेली चार वर्षे, म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हिंदू हिताचा बचाव करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले आहेत. परंतु, आता एवढ्यात या सर्व मंडळींमध्ये नैराश्य आल्याचे दिसून येत आहे. हिंदूंचे जे काही आहे, त्या प्रत्येकावर अगदी ठरवून तसेच सातत्याने आघात करण्याचे प्रकार इतक्या प्रचंड प्रमाणात वाढले आहेत की, त्यामुळे हे हिंदूवादी काहीसे निराश दिसत आहेत. हिंदूविचारांची पाठराखण करतात म्हणून या मंडळींना सेक्युलर लोकांकडून इतक्या शिव्या आणि घाणेरड्या उपाध्या मिळतात की, त्याने कुणीही संतापून उठावे. पण, अशा स्थितीत तुम्हाला काहीही करता येत नाही. कारण हे अप्रत्यक्ष युद्ध आहे आणि टि्‌वटरवर प्रत्येकालाच आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. आक्षेपार्ह मत असेल तर त्याचे अकाऊंट निलंबित करण्याचे अधिकार टि्‌वटर नियंत्रकाला आहे. पण त्यातही पक्षपात होतो. कारण तो नियंत्रकही सेक्युअर असतो. या अशा सर्व परिस्थितीमुळे हिंदूंचा बचाव करणार्‍यांना निराशा येत असेल तर ती स्वाभाविकच म्हटली पाहिजे. पण, या सर्व परिस्थितीचा आपण थोडा मुळातून आणि थोडे मागे जाऊन विचार केला पाहिजे, असे मला वाटते.
 
 
2014 सालच्या मे महिन्यात भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पूर्ण बहुमताने झाले. अनेकांना वाटले की, आता भारत हिंदू राष्ट्र बनणार. भारत विश्वगुरू बनणार. आता संपूर्ण भारत भगव्या रंगाने रंगून गेला आहे. हिंदूंवर अत्याचार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. हिंदूंनीही कुठलाही अपमान वा अत्याचार सहन करण्याची काहीएक गरज नाही. पण ही मंडळी हे विसरली की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असले तरी भारतातील सुमारे 60 टक्के लोक त्यांच्या विरोधात आहेत, हे वास्तव आपण विसरता कामा नये. दुसरे म्हणजे, गेली 90 वर्षे हिंदू संघटनेचे सातत्याने सुरू असलेल्या कार्यामुळे 2014 साली केंद्रात भाजपाचे सरकार सत्तारूढ झाले, याबाबत कुणाचेही दुमत नाही. परंतु, तेवढ्याने कार्य संपले असे म्हणता येणार नाही. अजूनही, म्हणजे 20 राज्यांमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असले, तरीही प्रचंड काम बाकी आहे. काम कुठले? तर हिंदू संघटनेचे. या देशातील हिंदूंना हिंदू हिताच्या किमान मुद्यांवर संघटित करायचे असेल, तर आपली दृष्टी आणि विचार कितीतरी व्यापक असले पाहिजे! ती दृष्टीची व विचारांची व्यापकता आम्ही घालवून बसलो आहोत का? हा प्रश्न आम्ही स्वत:लाच विचारायला हवा. नरेंद्र मोदी किंवा भाजपा सत्तेत आहे म्हणूनच नव्हे, तर सत्तेत कुणीही असो, हिंदूंनी अपमान किंवा अत्याचार सहन करायला नको, ही आपल्या विचारांची दिशा असली पाहिजे. दुसरा मुद्दा हिंदू राष्ट्राचा. त्याबाबत तर इतके गैरसमज आहेत की विचारायलाच नको. आता भारत हिंदू राष्ट्र होणार, म्हणजे आधी नव्हते का? संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी सिंहगर्जना केली होती की, ‘‘होय! मी, केशव बळिरामपंत हेडगेवार म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे.’’ याचा अर्थ हिंदू राष्ट्र काल होते, आज आहे आणि उद्याही राहणार. ते नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे हिंदू राष्ट्राबाबतचा वैचारिक गोंधळ, टि्‌वटरवरील या हिंदूवादी योद्ध्यांनी आधी दूर करायला हवा.
 
 
आणखी एक वास्तविकता ध्यानात घ्यायला हवी. टि्‌वटरवर ज्यांचा आपण विरोध करतो आणि तो करताना जे मुद्दे मांडतो, ते कितीही सत्य असले तरी, त्याने समोरच्याचे वैचारिक परिवर्तन होणे जवळजवळ अशक्य आहे. असल्या वैचारिक लढाईने, आरोप-प्रत्यारोपाने, वादविवादाने मतपरिवर्तन होते, असे जर कुणी समजत असेल तर हा गैरसमज सर्वप्रथम काढून टाकायला हवा. मनपरिवर्तन किंवा मतपरिवर्तन हे समोरच्याशी जिवंत संपर्काने तसेच शुद्ध, सात्त्विक, आत्मीय प्रेममय व्यवहारानेच शक्य आहे.
 
 
संघाच्या एका बैठकीत, स्वयंसेवकांची संख्यावाढीची चर्चा सुरू असताना, एका कार्यकर्त्याने सांगितले की, आमच्या वस्तीत मी अनेकांशी संपर्क केला, पण ते संघात यायला तयार नाही. सगळे फ्युज्ड बल्ब आहेत. त्या कार्यकर्त्याच्या त्राग्यावर बैठकीतील अधिकार्‍यांनी जे उत्तर दिले ते आजही माझ्या स्मरणात आहे. त्यांनी एकच वाक्य उच्चारले. ते म्हणाले, बल्ब फ्युज्ड नसतात; बरेचदा कॉण्टॅक्ट लूज असतो! हिंदू संघटनेच्या संदर्भात हे वाक्य तळशिला समजायला हवे. वर उल्लेख केलेल्या तीन सूत्रांच्या आधाराने गेल्या 90 वर्षांपासून हिंदू संघटनेचे काम सुरू आहे. त्याला बर्‍यापैकी यशही येत आहे. समाजाच्या अनेक क्षेत्रांपैकी एका क्षेत्रात म्हणजे राजकारणात देदीप्यमान यश मिळाले म्हणजे आता हिंदू संघटनेच्या कार्याची इतिश्री झाली असे समजणे चूक होईल. राजकारणाचाच विचार केला, तर सुमारे 60 टक्के भारतीय अजूनही आपल्या संपर्क-परिघाच्या बाहेर आहेत. त्यांच्याशी जिवंत संपर्क साधून तसेच आत्मीय प्रेममय व्यवहाराने त्यांना जोडायचे आहे. हे काम आजही हजारो हजारो कार्यकर्ते करीत आहेत. कुठे वादविवाद नाही, कुठे वैचारिक युद्ध नाही. या कार्याला आपण तन-मन-धनाने सहयोग केला पाहिजे. सोशल मीडियावर एकमेकांची उणीदुणी काढून, समोरच्यांचे केवळ दोष काढून, विरोधकाला सार्वजनिक रीत्या धोपाटून काहीही साध्य होणार नाही. जास्तीत जास्त निराशाच पदरी येईल. भारतात आज जे सकारात्मक परिवर्तन दिसत आहे, ते वैचारिक युद्धामुळे झालेले नाही, याची जाणीव सतत मनात ठेवली, तर टि्‌वटरवर मत किंवा प्रतिक्रिया प्रदर्शित करताना, त्यात संयम तसेच समोरच्याला समजून घेण्याची वैचारिक खोलीही प्रकट होईल. आपण हिंदू हिताची गोष्ट करतो, म्हणजेच आपण सत्याच्या बाजूने आहोत, त्यामुळे निराशा येण्याची पाळी आपल्यावर येणार नाही, हे निश्चित!
@@AUTHORINFO_V1@@