निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे : राधाकृष्णन बी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |



नाशिक : ’’जिल्ह्यात विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राजकीय पक्ष, उमेदवार व प्रचारामधील व्यक्तींनी या आचारसंहितेचे पालन करावे,’’असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ यांसह राजकीय पक्षांचे ऍड. प्रभाकर वायचळे, नंदकुमार देसाई, रमेश पवार, उदय पवार, विजय झाडे, उत्तम उगले यासह भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष व अपक्ष उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.

राधाकृष्णन म्हणाले की, ’’भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून प्रचार व प्रसिद्धी करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही, याकडे संबंधित व्यक्तींनी लक्ष द्यावे. प्रचारसभा, रॅली तसेच प्रसिद्धीपत्रकांद्वारे प्रचार करताना नियमांचे पालन केले जावे. जाहिरात फलकांद्वारे प्रसिद्धी करताना संबधित यंत्रणांची परवानगी घेऊनच प्रसिद्धी केली जावी आदी सूचना त्यांनी दिल्या. प्रचारासाठी येणार्‍या राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांसाठी वाहनव्यवस्था, विश्रामगृहांचा वापर व हेलिपॅड उभारणी यासाठी पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका आदी शासकीय यंत्रणांच्या परवानग्या घेऊन त्यासाठी आवश्यक ते शुल्क अदा केले जावे. या निवडणुकीसाठी असणार्‍या मतदान पद्धतीमध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जाणार असून पसंतीक्रमाने मतदान करावे लागणार आहे. या अनुषंगाने मतदारांना जागृत केले जावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यावेळी उपस्थित राजकीय प्रतिनिधींनी विचारलेल्या शंका व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. तसेच खेडकर यांनी आदर्श आचारसंहितेच्या नियमांची माहिती दिली. दराडे यांनी जिल्ह्यात येणार्‍या विविध मार्गावर गस्तीपथकांच्या माध्यमातून विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. वाहनातून रोख रक्कम अथवा मद्याची वाहतूक होणार नाही याविषयी दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष

जिल्ह्यात विधान परिषद नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात यावी. या कक्षात स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीचा समावेश असावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.

@@AUTHORINFO_V1@@