शिवसेना नगरसेवक, पदाधिकार्‍यांची नाराजी विधानपरिषदेत फटका बसण्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |



नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य दौर्‍याच्या तयारीसाठी आयोजित बैठकीस उत्तर महाराष्ट्रप्रमुख खा. संजय राऊत आले असता या बैठकीकडे अनेक नगरसेवक फिरकले नाहीत तसेच प्रमुख पदाधिकार्‍यांनी देखील उपस्थित राहण्याचे कष्ट घेतले नाहीत.

उद्धव ठाकरे ६ मे रोजी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत. खा. राऊत यांनी ठाकरे यांच्या दौर्‍याच्या तयारीचा भाग म्हणून शालिमार येथील शिवसेना कार्यालयात बैठक बोलावली होती. ठाकरे यांचा दौरा होणार असल्याने या बैठकीला पक्षाचे सर्वच पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी हजर राहणे अपेक्षित होते. मात्र नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. नाशिक लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय करंजकर यांनी काही वेळ हजेरी लावून कार्यालय सोडले, तर माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते हेही अनुपस्थित होते.

दरम्यान विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी शिवसेनेने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष ऍड. नरेंद्र दराडे यांची उमेदवारी घोषित केली असली तरी त्यांच्या मार्गात प्रचंड अडचणी असल्याचे चित्र आहे. तोकडे मतदान, भाजप उमेदवार रिंगणात उतरण्याची चिन्हे, स्वकीयांचा अंतस्थ विरोध या पार्श्‍वभूमीवर दराडे यांच्यासमोरील आव्हान अधिक गंभीर झाल्याचे चित्र आहे.

पदाधिकार्‍यांच्या गैरहजेरीमागे लग्नसराईचे कारण देण्यात आले. ज्यावेळी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्यांनीही इन्कार केला. पक्षात कोणत्याही प्रकारचा वाद नसून काही वृत्तपत्रांमध्येच तशा बातम्या छापून येत असल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचा मुद्दा काही पदाधिकार्‍यांना रूचलेला नसल्याचे बोलले जाते.

मागील निवडणुकीतील उमेदवार व आताही प्रबळ दावेदार असलेले ऍड. शिवाजी सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली, त्या दिवशीच नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पक्षाच्या मुखपत्रातील घोषणेने त्यावर खर्‍या अर्थाने शिक्कामोर्तब झाले. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत डेरेदाखल झालेले दराडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पक्षप्रमुखांनी सोमवारी टाकली असली तरी त्यांच्या उमेदवारीने शिवसेनेतील अदृश्य गटांचे मनोमिलन होणार का ? आणि दराडेंच्या गळ्यात विजयाची माळ पडणार का ?, असे प्रश्‍न आता उपस्थित केले जात आहेत.

@@AUTHORINFO_V1@@