सुट्या, लग्नसराई हंगामात जादा बसेस सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2018
Total Views |

उत्पन्नवाढीसाठी जळगाव विभागाचे १५ मेपर्यंत नियोजन

 
 
जळगाव :
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा गेल्या अनेक वर्षांपासून अविरत सुरु आहे. एसटीच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी दरवर्षी उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईचा धुमधडाका पाहून जादा बसेसच्या फेर्‍या सोडण्याचे नियोजन यंदाही जळगाव विभागाने केले आहे. २० एप्रिलपासून बसेस सुरु केल्या असून प्रवाशांची गर्दी पाहून १५ मेपर्यंत नियोजन राहील. त्यादृष्टीने आंतरराज्य, जिल्हाअंतर्गंत, शटल सेवा, शिवशाही, प्रासंगिक करार तसेच परिवर्तन अशा जादा बसेसच्या फेर्‍या सुरु करण्यात आल्याची माहिती एस.टी.महामंडळ जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक आर.डी.साबळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना दिली.
 
 
जादा बस फेर्‍या सुरु
आंतरराज्य मार्गावरील जादा फेर्‍यांमध्ये रावेर ते उधणा, पाचोरा ते बडोदा, चोपडा ते उधणा, जिल्हाअंतर्गंत फेर्‍यांमध्ये चाळीसगाव ते शिर्डी, अमळनेर ते नाशिक, यावल ते शिर्डी, यावल ते पिंपळनेर, शटलमध्ये चाळीसगाव ते जळगाव, चाळीसगाव ते धुळे, अमळनेर ते यावल, अमळनेर ते चोपडा अशा जादा बस फेर्‍या सुरु केल्या आहेत.
११ आगार प्रमुखांना जादा बसेस सोडण्याचे अधिकार
एसटी महामंडळाच्या जळगाव विभागातर्ंगंत येणार्‍या ११ आगार प्रमुखांना गर्दी पाहून जादा बसेस सोडण्याचे अधिकार देण्यात आले आहे. सध्या उन्हाळी सुट्या आणि लग्न सराईचा धुमधडाका सुरु झाल्याने विभागाने सुत्रबद्ध नियोजन केले आहे. जळगाव विभागातील आगारांमध्ये १ हजार ८०० चालक तर १ हजार ६०० वाहक सद्यस्थितीला कार्यरत आहेत.
‘परिवर्तन’ बसला प्रतिसाद
विनावाहक म्हणून ओळखली जाणार्‍या परिवर्तनलाही प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जळगाव ते धुळे या मार्गासाठी ही सेवा सुरु केली आहे. जळगाव येथून प्रवाशाने तिकीट काढल्यावर ती कुठेही न थांबता थेट धुळे येथे थांबेल, असे परिवर्तन बसचे वैशिष्ट्य आहे.
 
 
प्रासंगिक कराराचा फायदा
शाळा, महाविद्यालये आणि लग्नसराईचा धुमधडाका पाहून प्रासंगिक कराराच्या बसेसचा फायदा जळगाव विभागाला मिळत आहे. अनेकांनी प्रासंगिक कराराचा लाभ घेत त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ निश्चित मानली जात आहे.
 
 
स्लीपर कोचचा प्रस्ताव रवाना
खाजगी बसवाल्यांना चपराक बसण्यासाठी आणि पुण्याला जाणार्‍या प्रवाशांची मागणी पाहून मुंबईला ३० बर्थच्या स्लीपर कोचचा प्रस्ताव पाठविला आहे. या बसद्वारे प्रवास करतांना १ टप्प्यासाठी अर्थात ६ किलोमीटरसाठी १२ रु.८८ पैसे असा दर आकारला जाऊन ९१५ रुपये तिकीट आकारण्यात येईल. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ही सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल.
 
 
समस्यांची तक्रार नोंदवा
जळगाव विभागातील ११ आगार मिळून सद्यस्थितीला ८७६ बसेस वायफायच्या सुविधेसह सुस्थितीत सुरु आहेत. बसमधील सर्व प्रकारच्या सुविधा, अडचणी पाहून त्यांना लागलीच वर्कशॉपमध्ये पाठवून तात्काळ दुरुस्ती करण्यात येते. प्रवासा दरम्यान प्रवाशांनी कुठलीही तक्रार, समस्या, अडचणी असल्यास संबंधित वाहक अथवा आगाराचे कंट्रोलर यांच्याकडे नोंदवावी.
‘शिवशाहीला’ पसंती
औरंगाबाद, पुणे, धुळे येथे जाण्यासाठी प्रवाशी गर्दी करतात. जळगाव विभागाला १३ शिवशाही बसेस उपलब्ध आहेत. त्यापैकी जळगावला ८, चाळीसगाव आणि जामनेरला प्रत्येकी २ आणि यावल १ अशा १३ बसेस आहेत. या बसचे वैशिष्ट्य म्हणजे ही बस एसी आणि पुश बॅक सीटची आहे. या बसद्वारे प्रवास करतांना १ टप्प्यासाठी अर्थात ६ किलोमीटरसाठी ८ रु.९५ पैसे असा दर आकारला जातो. नव्याने सुरु केलेल्या शिवशाही बसलाही प्रवाशांनी पसंती दिली आहे.
 
फोकल पॉईंटवर भर
प्रवाशी गर्दीचे ठिकाण पाहून आगाराअंतर्गंत ३० कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. एसटीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी फोकल पॉईंटवर भर देण्यात आला आहे. त्याचाही एसटी महामंडळाला उत्पन्नासाठी फायदा होत आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@