अरब मुसलमान, इराण आणि भाषेचा अभिमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



आपल्या शाळेला इंटरनॅशनल स्कूल करण्याच्या फॅशनला बळी पडून, मुंबईतल्या आणखी एका शिक्षणसंस्थेने आपलं अस्सल हिंदू नाव सोडण्याचा घाट घातलेला आहे. दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर (सचिन तेंडुलकरची शाळा) या शाळेला पुढच्या काळात एस. व्ही. इंटरनॅशनल स्कूल या नावाने ओळखलं जाणार असल्याची बातमी आहे. आम्ही इंग्रजांना हाकललं, पण इंग्रजीच्या अधिकाधिक आहारी चाललो आहोत.

गेल्या २१ मार्चला इराणी लोकांचा ’नवरोज’ नावाचा सण होता. ’नवरोज’ म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागत करणारा सण. त्यापूर्वी सहा दिवस इराण्यांनी ’चहर शानबेह सूरी’ नावाचा सण साजरा केला. रस्त्यावर ठिकठिकाणी छोट्या छोट्या शेकोट्या पेटवायच्या आणि त्यांच्यावरून उड्या मारायच्या, असा हा सण साजरा करतात. असं करणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं, असं ते मानतात.

दिनदर्शिका पाहिलीत तर असं लक्षात येईल की, इराण्यांचे हे दोन्ही सण म्हणजे होळी आणि रंगपंचमी आहेत. सध्याच्या इराण सरकारच्या मते या दोन्ही सणांच्या परंपरा इस्लाम-पूर्व इराणशी जाऊन भिडतात. त्यामुळे सरकारने हे सण साजरे करण्यावर बंदी घातली होती, पण लोकांनी ती खुशाल धुडकावून लावली आणि दोन्ही सण साजरे केले. शहांच्या राजवटीत इराण हा कट्टर इस्लामी देश नव्हता, पण १९७९ साली अयातुल्ला खोमेनीने क्रांती केली. शहा रेझा पेहलवी यांना पदच्युत करून, हद्दपार करण्यात आलं आणि मग इराणात कट्टर इस्लामवादाचे जोरदार वारे वाहू लागले.

आजही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने इराण कट्टरवादीच आहे. हिटलरने ज्यूंची वांशिक कत्तल खरोखरच केली होती का ? इत्यादी कालबाह्य विषयांवर सनसनाटी मतप्रदर्शन करून, इराणच्या पंतप्रधानांनी उगीचच वादाचं मोहोळ उठवलं आहे. आणि अफगाणिस्तान व इराकपाठोपाठ अमेरिका आता इराणवर हल्ला करणार अशीच एकंदरीत लक्षणं आहेत. अनेक अमेरिकन राजकीय निरीक्षकच तसं लिहितात.

पण राजकारणाचे काही असो, सामाजिकदृष्ट्या इराणी - लोक हे सौम्य बनत आहेत आणि इस्लामपूर्व काळातील परंपरा, सण, उत्सव पाळण्याकडे त्यांचा कल वाढत आहे, असं दिसतं.

शेकोटी पेटवून, त्यावरून उड्या मारण्याचा चहर शानबह सूरी हा सण साजरा करायला इराणी लोकांनी पुन्हा एकदा सुरुवात केली तेव्हा अयातुल्ला खोमेनी जोरात होता. त्याच्यासकट सगळ्या अयातुल्ला कंपनीने फतव्यांवर फतवे काढून या सणांवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ ! शेवटी सरकार नमले आणि त्याने प्रत्येक वस्तीत शेकोटी पेटवण्याची एक जागा नक्की करून, तिथे एक बागच बनवून दिली.

या वर्षीदेखील अयातुल्ला कंपनीने, नवरोज साजरा करू नका. हा इस्लामी सण नसून, इस्लामपूर्व काळातला म्हणजे झोरोस्ट्रियन किंवा पारशी धर्माशी संबंधित सण आहे वगैरे आवाहनं केली होती. त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून, अधिकाधिक लोकांनी मोठ्या उत्साहाने नवरोज साजरा केला.

इराणच्या इतिहासाकडे नजर टाकली, तर असे दिसून येईल की, धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर हा सिद्धांत इराणने मोठ्या कल्पकतेने खोटा पाडला आहे.

एकेकाळी भारत आणि इराण हे सख्खे शेजारी होते. दोघांच्या सरहद्दी एकमेकांना लागूनच होत्या. ब्रिटिशांनी प्रथम अफगाणिस्तान आणि नंतर पाकिस्तान हे प्रदेश भारतापासून तोडले, त्यामुळे इराण दूर गेला.
ख्रिस्तपूर्व ५५० या काळात इराणमध्ये सायरस द ग्रेट या अत्यंत पराक्रमी राजाने पहिलं इराणी साम्राज्य उभारलं. उत्तरेकडले तार्तार-तुर्क आणि पश्‍चिमेकडे ग्रीक यांच्याशी इराणच्या सतत लढाया सुरू असत. या सायरसनेच भारताचा गांधार प्रांत म्हणजे आजचा अफगाणिस्तान जिंकून, इराणी साम्राज्याची हद्द सिंधू नदीला भिडवली. सायरसच्या नंतर कम्बायसिस, दरायस या राजांनीही यशाची कमान चढती ठेवली. सायरसचा पणतू झसेस याने तर भूमध्य समुद्र ओलांडून खुद्द ग्रीसवरच हल्ला चढवला. एका आशियाई सत्तेने युरोपच्या मुख्य भूमीवर आक्रमण केल्याचं आधुनिक इतिहासाला माहित असलेलं हे पहिलं उदाहरण. ख्रिस्तपूर्व ३३० या वर्षी अलेक्झांडर द ग्रेटने अत्यंत क्रूरपणे या घटनेचा सूड घेतला. इराणच्या साम्राज्याचा संपूर्ण उच्छेद करून मगच अलेक्झांडर भारताकडे वळला.

या तडाख्यातून सावरून, इराणने स्वत:ला स्थिरस्थावर केलं, पण सायरस, दरायस यांच्या काळातलं अतिप्रबळ इराणी साम्राज्य पुन्हा उभं राहू शकलं नाही.
इ. स. ७४०-४१ यावर्षी इराणवर अरबांच्या आक्रमणाची इस्लामी लाट कोसळली. अलेक्झांडरच्या सर्वनाशी आक्रमणापेक्षाही ही लाट दुःसह होती. ग्रीकांचं आक्रमण फक्त राजकीयच होतं, अरबांचं आक्रमण राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक सगळ्याच अंगांनी होतं. इराणची पारशी ओळख साफ पुसून टाकून, त्याला पूर्णपणे इस्लामी ओळख देणं, हेच या आक्रमकाचं धोरण होतं. इराणी लोक आपला पारशीं धर्म टिकविण्यासाठी ’गबलतं भरभरून हिंदुस्थानाकडे पळाले. गुजरातच्या किनारपट्टीवर उतरले. तिथल्या राजाने त्यांना अभय दिलं, कारण तो हिंदू होता.

पण सगळ्याच इराणी लोकांना असं स्थलांतर करणं जमलं नाही. त्यांना धर्मांतर करावंच लागलं. इराण इस्लाममय झाला. इराणच्या सरहद्दीपासून जवळच, पण अरब प्रदेशात असलेल्या बगदाद या प्रख्यात, प्राचीन राजधानीतून अब्बासी घराण्याचे खलिफा इराणवर हुकूमत गाजवू लागले. इराणमध्ये अरब आणि अरबी भाषा याचं महत्त्व अर्थातच अतोनात वाढले. इराण्यांना आपल्या फारसी भाषेसाठी अरबांची उलटी लिपी स्वीकारावी लागली. फारसी भाषेत अरबी शब्दांचं प्रमाण वाढू लागलं.

इराणच्या अगोदर अरबांनी इजिप्त जिंकून, तिथला मूळ इजिप्शियन वंश, मूळ भाषा, मूळ संस्कृती यांचा साफ निकाल लावला होता. आजही इजिप्शियन लोक हे अरबी वंशाचेच आहेत नि इजिप्त हा अरब राष्ट्र म्हणूनच ओळखला जातो. इराणची तीच गत होणार होती. पण इराणी लोकांची जिजीविषा उसळून उठली. केवळ युद्धात पराभव झाल्यामुळे आमचं साम्राज्य विलयाला गेलं आहे. आम्हाला इस्लाम स्वीकारावा लागला आहे, पण आमची भाषा, आमची संस्कृती, आमची परंपरा या वाळवंटात भटकणार्‍याा अरबांपेक्षा श्रेष्ठ आहे. आम्ही आमची संस्कृती टिकवूच, अशी विलक्षण जिद्द इराणी समाजात निर्माण झाली आणि मग त्याची नजर त्यांच्या इतिहासाकडे वळली.

इराणचा शेवटचा पारशी राजा यज्दगिर्द यांच्या काळात : दानिशर्वर दिहकान नावाच्या लेखकाने इराणमधल्या असंख्य ऐतिहासिक कथा संकलित करून, खुदाईनामा नावाचा ग्रंथ लिहिला होता.

आता फिर्दोसी या माणसाने हे काम हाती घेतलं. त्याने अपार कष्ट केले. असंख्य जुनी हस्तलिखिते, गोळा केली. जुनी काव्यं, लोकगीतं, आख्यायिका, कहाण्या जमवल्या. वृद्ध लोकांना भेटून, त्यांच्या आठवणी टिपून घेतल्या. ही सगळी साधनं जमवेपर्यंत त्याच्या वयाची पन्नाशी आली. मग तो हे सारं लिहून काढू लागला. तब्बल तीस वर्षे फिर्दोसी आपला हा ग्रंथ लिहित होता. इ.स. 980 ते इ. स. 1010. तत्कालीन पद्धतीनुसार फिर्दोसीने आपला ग्रंथ गद्यात न लिहिता पद्यात लिहिला आहे. त्या अभिजात ग्रंथाचं नाव आहे शाहनामा!

शाहनामा हे इराणचं महाभारत आहे. इराणच्या अतिप्राचीन काळापासून इ. स. 750 मध्ये इराणी साम्राज्य पूर्णपणे नष्ट होईपर्यंतच्या काळाचा हा इतिहास आहे. या महाकाव्यात रुस्तम, सुहराब, जमशीद, नौशेरवान, खुस्रो, फरीदून इत्यादी असंख्य महावीरांच्या कथा आहेत.

या शाहनाम्यामुळे इराणी समाजाला आपल्या प्राचीन वैभवाची जाणीव करून देणारा ग्रंथराज मिळाला. इराणी समाजाची अस्मिता जागी झाली. इतकंच नव्हे, तर विजेत्या अरबांवरदेखील फारसी भाषेची मोहिनी पडली.

याचा अर्थ इराण लगेच राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला, असे नव्हे. अरबांपाठोपाठ तुर्कांनी इराणला जिंकून टाचेखाली ठेवलं. 12 व्या १३ व्या शतकात मंगोल आक्रमक चंगेजखान याने इराणला रगडून काढलं. चंगेजचा मुलगा हलाकू याच्या प्रचंड साम्राज्याचा इराण हा एक सुभा होता, पण राजकीयदृष्ट्या परतंत्र असतानाही इराणी अस्मिता विझली नाही. काही शतकांत विजेत्या तुर्कांनीच उलट फारसी भाषेचा स्वीकार केला. तुर्कांनी पुढे मध्य आशिया, अफगाणिस्तान आणि हिंदुस्थान जिंकला. त्यांच्याबरोबर फारसी भाषा त्या त्या देशांमध्ये पसरली. उदाहरणार्थ औरंगजेब हा तुर्क होता. आपल्या तुर्कपणाचा त्याला अतिशय अभिमानही होता, पण मुघल दरबारची अधिकृत भाषा मात्र फारसी होती, तुर्की नव्हे!

म्हणजे नाईलाजाने धर्मांतर करायला लागलं, तरी इराणने आपलं राष्ट्रांतर होऊ दिलं नाही. उलट आपली श्रेष्ठ संस्कृती, भाषा आक्रमकांनाच स्वीकारायला लावली. आज मुसलमानांना शाहनामा हा आपलाच वाटतो. फिर्दोसी, रुस्तम, सुहराब, नौशेरवान, खुस्रो, ही नावं मुसलमानांना आपलीच वाटतात. हे सगळे लोक, इस्लामपूर्व इराणचे म्हणजेच पारशी लोकांचे महानायक होते, हे त्यांच्या गावीही नसतं.

मराठी भाषेतून फारसी, अरबी शब्दांची हकालपट्टी करून, मराठी भाषेतच व्यवहार व्हावेत, यासाठी राज्यव्यवहार कोश, निर्माण करण्याची कामगिरी शिवछत्रपतींनी केली. आमचा हा महान राजा सर्वच क्षेत्रांत महान क्रांतिकारक होता, पण पेशवे काळात ही अस्मिता मंदावली. पत्रव्यवहारात पुन्हा फारसीचं प्राबल्य दिसू लागलं, मग इंग्रजी राजवट आली. इंग्रजीचा वरचष्मा झाला, पण आज इंग्रजी राजवट मेल्यालाही 59 वर्ष झाली आहेत. तरी मराठीसकट सगळ्या देशी भाषा माघारत आहेत आणि इंग्रजी बोकाळत चालली आहे. नुसती इंग्रजी भाषाच नव्हे, तर इंग्रजी विचार, इंग्रजी संस्कृती, इंग्रजी कपडे, इंग्रजी परंपरा या सगळ्यांना प्रचंड बरकत आली आहे. आम्ही फक्त नावापुरतेच हिंदू, नावापुरते मराठी राहिलो आहोत.

आणि वर आम्ही याचं समर्थन करत आहोत की जगाच्या स्पर्धेत, संगणक युगात टिकून राहायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे. मराठी किंवा अन्य देशी भाषा पैसा देणार नाहीत.


होय! इंग्रजी आलीच पाहिजे. पण मातृभाषेचा बळी देऊन नव्हे! आमच्या शेजारी इराणने आक्रमकांना आपली श्रेष्ठ संस्कृती, श्रेष्ठ भाषा स्वीकारायला लावली. आज चिनी आणि जपानी यांनी अमेरिकेच्या तोंडाला फेस आणलेला आहे. त्यांना इंग्रजी उत्तम येतंच. पण त्या बहाद्दरांनी अत्यंत अवघड अशी आपली चिनी-जपानी भाषा संगणकावरही आणून दाखविली आहे. मिस्टर इंडिया! जागे व्हा!


- मल्हार कृष्ण गोखले
@@AUTHORINFO_V1@@