नाणार प्रकल्पसमर्थकांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्वाभिमानचा गोंधळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

प्रकल्प बचाव समितीची पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न

 

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील नाणार येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून सध्या सत्ताधारी भाजप विरूद्ध इतर पक्षांमध्ये जोरदार वादावादी सुरू असतानाच या नाणार प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी आयोजित 'नाणार प्रकल्प बचाव समिती'ची पत्रकार परिषद काल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून उधळून लावण्याचा प्रयत्न केला. अखेर, पोलीसांना पाचारण करण्यात आल्यावर स्वाभिमानचे कार्यकर्ते पांगले.
 
दि. २५ एप्रिल रोजी मुंबईतील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ही पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. संबंधित 'नाणार प्रकल्प बचाव समिती'चे समन्वयक अजितसिंह सेंगर हे ही पत्रकार परिषद संबोधित करणार होते. मात्र यावेळी भाजप खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इथे येऊन प्रचंड गोंधळ घालत ही पत्रकार परिषद उधळण्याचा प्रयत्न केला. प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम हेही घटनास्थळी दाखल झाले होते. थोड्याच वेळात येथे पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर स्वाभिमान व इतर विरोधी कार्यकर्ते पांगले. यानंतर पोलीस बंदोबस्तात पुढील पत्रकार परिषद झाली व या समितीने नाणार प्रकल्पाला आपले समर्थन दिले.
अनेक पक्ष, संघटना नाणार प्रकल्पाला विरोध करत असतानाच प्रकल्पाला समर्थन देणाऱ्या संघटनेची पत्रकार परिषद कोण घेत आहे, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. या प्रकल्पाला समर्थन देणारे व प्रकल्प बचाव समितीचे अजितसिंह सेंगर हे कोकणातील नसून ते काही महिन्यांपूर्वी गाजलेल्या 'पद्मावत' चित्रपटाला विरोध करणाऱ्यांपैकी आघाडीचे नेते असल्याचे समजते. मात्र, यापलीकडे नाणार प्रकल्पाशी संबंधित वादविवादात सेंगर यांचे नाव प्रथमच पुढे येत आहे. त्यामुळे हे सेंगर कोण व ही समिती कुठे, कधी निर्माण झाली असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी अजितसिंह सेंगर यांचा भाजपशी काहीही संबंध नसल्याचे दै. 'मुंबई तरूण भारत'शी बोलताना सांगितले. कोकणच्या विकासासाठी प्रकल्प व्हावा, अशीच आमची इच्छा आहे. मात्र, या समितीचे नेते सेंगर यांचा रत्नागिरी भाजपशी काहीही संबंध नसल्याचे माने यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजितसिंह सेंगर यांनी आपण रत्नागिरीचे असून आपला जन्मच रत्नागिरीत झाल्याचा दावा केला आहे.
 
मला माझ्या कार्यकर्त्यांचा माज
  
नाणार प्रकल्प बचाव समितीची पत्रकार परिषद महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावून समर्थन देणाऱ्यांना स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागा दाखवली. परत असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला, तर स्वाभिमान पक्ष आणखी पेटून उठेल. मला माझ्या कार्यकर्त्यांचा माज आहे.
 
 
: नितेश राणे, आमदार (काँग्रेस)
 
 
@@AUTHORINFO_V1@@