मूल्यांचा ‘गंभीर’ विचार...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |


 
खेळाडूकडे लागणारे ‘फाईटिंग स्पिरीट’ गंभीरकडे नाही, असे कदापि म्हणून चालणार नाही. कारण, तसे नसते, तर तो आज आयपीएलमधून काय, क्रिकेटच्या खेळपट्टीवरूनही कायमचा ‘क्लीनबोल्ड’ झाला असता. याचाच अर्थ, जबाबदारपणा आणि नीतिमत्ता याचे पूर्ण भान गौतम गंभीरला आजही आहे.

प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार हेवूड ब्राऊन म्हणतात की, ‘‘कुठलाही खेळ तुमचे चारित्र्य घडवत नाही, तर तो तुमच्या चारित्र्याचे दर्शन घडवितो.’’ गौतम गंभीरच्या बाबतीत ते तत्त्वचिंतन अगदी तंतोतंत लागू पडते. कारण, गंभीरने आयपीएलमधील ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ संघाच्या कर्णधारपदाचा नुकताच राजीनामा दिला. एवढ्यावर गंभीर काही थांबला नाही, तर त्याने संघाने आयपीएलमध्ये त्याच्यावर लावलेली बोलीची जवळजवळ २.८ कोटींची रक्कम आणि इतर मानधनही स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले. यापुढे गंभीर ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’तर्फे उर्वरित आयपीएलचे सामने खेळणार असला तरी ‘कप्तान’ म्हणून तो संघाचे नेतृत्व करणार नाही. ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ची धुरा आता मुंबईच्या श्रेयस अय्यरच्या हाती असेल. काहींनी गंभीरच्या या खेळीला त्याच्या ‘क्रिकेटमधील संन्यासाचा प्रारंभ’ असे संबोधले, तर काहींनी स्वाभिमानी गंभीरची पाठही थोपटली. कारण, ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’च्या एकूण सहा लढतींमध्ये गंभीरला केवळ ८५ धावा काढता आल्या आणि गंभीरचा संघ केवळ एका सामन्यात विजयी ठरला. अर्थात, गंभीरच्या वैयक्तिक कामगिरीवर तर परिणाम झालाच, पण संघाची कामगिरीही निराशाजनक ठरली. त्यावर पर्याय म्हणून, गंभीरने स्वखुशीने आणि कुणाच्याही दबावाखाली न येता कर्णधारपदावर पाणी सोडले. कुणी याला गंभीरचा पळपुटेपणा म्हणेलही कदाचित, पण गंभीरने घेतलेला निर्णय त्याच्यातील खिलाडूवृत्तीबरोबरच त्याच्या मूल्यांचेही दर्शन घडवितो.

स्वाभिमान हे त्यातील पहिले मूल्य. स्वाभिमानाशिवाय तुम्ही कुठलेही कार्य मन:पूर्वक करू शकत नाही. ‘जर कर्णधार म्हणून मी अपयशी ठरतोय, माझे मन अस्वस्थ होतेय, तर निश्चितच कर्णधारपदाची जबाबदारी संघहितासाठी न स्वीकारलेली बरी,’ याच विचारातून कर्णधारपदापासून गंभीर मुक्त झाला. ‘आयपीएलचे हे पर्व संपले की निर्णय घेऊ, आपले नुकसान कशाला?’ असा बाजारू विचार गंभीरने केला नाही. त्यापेक्षा संघाची ढासळलेली कामगिरी, आपण स्वत: कुठे कमी पडतोय, याचे आत्मचिंतन गंभीरने केलेले दिसते. त्याशिवाय एवढ्या मोठ्या निर्णयाप्रती तो सहजासहजी पोहोचूच शकला नसता. त्यामुळे स्वाभिमानाला सर्वोच्च स्थानी ठेवत आणि पराजयाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आयपीएल संघाचे कप्तानपद सोडणारा असा ३६ वर्षीय गौतमगंभीर पहिलाच कर्णधार ठरला.

क्रिकेट आणि त्यातही ‘आयपीएल’ म्हटलं की समीकरण जुळतं ते फटकेबाज खेळाचं, रग्गड पैशाचं आणि चिअरगर्ल्स, बॉलीवूडमुळे लाभलेल्या भपकेबाज पेज-थ्री ग्लॅमरचं! त्यामुळे ‘आयपीएल’ हे जसं क्रिकेटप्रेमींच्या काळजाचा ठोका चुकवून जातं, तसं बहुतांशी क्रिकेटपटूंनाही आयपीएलची प्रतीक्षा असतेच. कारण, त्यामुळे लाभणारी प्रसिद्धी आणि पैसा. गंभीरने त्याच्या आजवरच्या यशस्वी कारकिर्दीत निश्चितच अमाप प्रसिद्धीही कमावली आणि पैसाही. पण, त्याने त्याच्या जोरावर गर्वप्रदर्शन केल्याचे आठवत नाही. करिअरच्या अगदी उंचीवर पोहोचूनही गंभीर कधीही ‘कॉन्ट्रोवर्शियल’ ठरला नाही. स्वभावातील खिलाडू आक्रमकपणा, आत्मविश्वास त्याने कायम जोपासला. ‘कोलकाता नाईट रायडर्स’ संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या गंभीरने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत अनेक विक्रम स्वत:च्या नावे केले. एकदिवसीय सामन्यांमध्येही त्याची कामगिरी उत्कृष्टच राहिली. आपल्या खेळातील सातत्य त्याने कायम ठेवण्याचा आटोकाट प्रयत्नही केला. पण, शेवटी खेळ आणि त्यातही क्रिकेट म्हटले की, चढउतार हे तसे क्रमप्राप्तच! गंभीरची कारकीर्दही त्याला तशी अपवाद नाही. २००७ साली एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्याऐवजी रॉबिन उथप्पाची झालेली निवड गंभीरला फारशी रुचली नाही.

 
२०११च्या एकदिवसीय विश्वचषक सामन्याचे विजेतेपद भारताच्या पदरात जरी पडले असले तरी धोनीच्या अंतिमक्षणी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे गंभीरची खेळी काहीशी झाकोळली गेली. तसेच, काही वर्षांपूर्वी आयपीएलमध्येच विराट कोहलीबरोबरही त्याचा वाद झाला, पण दोघांनी सामंजस्याची भूमिका घेत त्याला तिथेच पूर्णविराम दिला. अशा या सौरव गांगुलीनंतर भारताच्या शैलीदार डावखुर्‍या फलंदाजाच्या कारकीर्दीला अर्धविराम लागणे, क्रिकेटप्रेमींसाठी सुखावह नक्कीच नाही. त्यामुळे गंभीरच्या नाराजीच्या वावड्या अनेकदा उठल्या आणि तो राजीनामा देणार, क्रिकेटला रामराम ठोकणार म्हणून बरेच चर्वितचर्वण झाले. पण, अंतत: तसे काहीही झाले नाही. त्यानंतर उलट गंभीरने आपला खेळ अधिकच सुधारला आणि २००९ साली त्याला ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यामुळे खेळाडूकडे लागणारे ‘फाईटिंग स्पिरीट’ गंभीरकडे नाही, असे कदापि म्हणून चालणार नाही. कारण, तसे नसते, तर तो आज आयपीएलमधून काय, क्रिकेटच्या खेळपट्टीवरूनही कायमचा ‘क्लीनबोल्ड’ झाला असता. याचाच अर्थ, जबाबदारपणा आणि नीतिमत्ता याचे पूर्ण भान गौतम गंभीरला आजही आहे.

पैसा हे सर्वस्व नाही. पैशासाठी आपण नाही तर आपल्यासाठी पैसा आहे, हे मूल्य गंभीरने आदर्शवत मानले आणि कोट्यवधींचे मानधन स्पष्टपणे नाकारण्याचा उदारपणा दाखविला. हा गुण तसा फारच कमी खेळाडूंमध्ये दिसून येतो. म्हणजे बघा, सचिन तेंडुलकरनेही २० कोटी रुपयांची दारूची जाहिरात साफ नाकारली होती. सुशीलकुमार या कुस्तीपटूनेही ५० लाख रुपयांची दारूची जाहिरात करण्यास साफ नकार दिला. त्यामुळे पैशाच्या बाजारात नीतिमूल्ये हरवत चालली आहेत, ही बाब किमान गंभीरच्या बाबतीत तशी गैरलागूच ठरते, असे म्हटले तर वावगे ठरु नये. गौतम गंभीर हा तसा मध्यमवर्गीय घरातून क्रिकेटमध्ये आपल्या मेहनतीच्या आणि खेळाच्या जोरावर दाखल झालेला. रीतसर प्रशिक्षण, खेळ सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न आणि मानवी नातेसंबंधांची उत्तम जाण असणारा. त्याचे उदाहरण म्हणजे गंभीरने विजेतेपदाची दान केलेली रक्कम. २०१७ साली नक्षलवाद्यांच्या सुकमा हल्ल्यातील शहीद सीआरपीएफच्या २५ जवानांच्या कुटुंबीयांना ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून मिळालेली सर्व रक्कम गंभीरने दान केली. शिवाय, त्या शहीद जवानांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाचीही सर्व जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली. यावरून गंभीरचे औदार्य आणि माणुसकीच्या मूल्यांचाही परिचय होतोच.

तेव्हा, आयपीएल असेल, क्रिकेट असेल किंवा इतर कुठलाही खेळ, प्रत्येक खेळाडूने आपल्या खेळाबरोबरच सकारात्मक जीवनमूल्यांचीही जोपासना केली की त्याचे प्रतिबिंब आपसूकच त्याच्या एकूणच कामगिरीत दिसून येतेच. असा हा ‘गौतम’ त्यापैकीच एक आदर्श म्हणावा लागेल.

@@AUTHORINFO_V1@@