जागा हस्तांतरण प्रक्रियेस रेल्वे प्रशासनाकडून वेग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

 
भुसावळ, २६ एप्रिल :
भुसावळ शहरात अत्यंत वर्दळीच्या रेल्वेस्थानक मार्गावरील वाहतूकीची समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी हालचाली गतीमान होवून आ. संजय सावकारे यांच्या प्रयत्नांमुळे नगर परिषद आणि रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक होवून जागेच्या हस्तांतरणाबाबत चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांनी मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या व्यवस्थापकांना पत्र दिले होते. त्यानुसार २६ रोजी दिल्ली येथून रेल्वे लॅन्ड डेव्हलपमेंट ऍथोरिटीचे अधिकारी श्रीवास्तव यांनी येथे रेल्वेच्या तीन जागांची पाहणी केली.
 
 
श्रीवास्तव सकाळी शहरात दाखल झाले आणि त्यांनी शांतीनगर येथील रेल्वेची जागा, लोहमार्ग पोलीस निवासाची जागा आणि रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेकडील जागांची पाहणी केली. याप्रसंगी रेल्वेचे प्रमुख अधिकारी त्यांच्यासोबत होते. त्यंानी पाहणी केलेल्या जागांपैकी शांतीनगर येथील जागा नागरी वस्तीमधील आहे तर लोहमार्ग पोलिसांच्या कॉलनीची जागा आणि रेल्वे स्थानकासमोरील जागा वाणिज्य प्रकारातील असल्याचे निदर्शनास आले. श्रीवास्तव यांनी या तिन्ही जागांबाबतीत मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता रेल्वे प्रशासनाने केली. तसेच शहरात जागांची अदलाबदल करून होणार असलेल्या प्रस्तावित विकास कामांची माहिती जाणून घेतली. श्रीवास्तव सायंकाळी कर्नाटक एक्सप्रेसने दिल्लीला रवाना झाले. या जागांबद्दल पुढील कारवाई दिल्ली येथे होणार आहे. त्यात प्लान, कागदपत्रे आदी कामे होतील. त्यानंतरच अंमलबजावणी होणार आहे.
 
 
नगरपालिका रेल्वेच्या जागेत स्थलांतरित होणार
शहरातील रेल्वेस्थानक मार्गावर वाहतुकीची समस्या सर्वाधिक आहे. ती निकाली काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासन यांच्यात जागेची अदलाबदली झाल्यास समांतर रस्ते निर्माण केले जाणार आहेत. यात हंबर्डीकर चैाक ते लोखंडी पुलापर्यंत मार्गाचे विस्तारीकरण, लोखंडी पुलाखाली तीन बोगदे कार्यरत असून चौथा नवीन बोगदा, बाजारपेठ पोलीस ठाणे ते रेल्वे स्थानकापर्यंत रस्ता विस्तारीकरण-यात रेल्वे त्यांची जागा देणार आहे. नगर परिषदेच्या जुन्या इमारतीची ३२ हजार चौरस फूट जागा रेल्वेला दिली जाण्याचे प्रस्तावित आहेे. तेथे रेल्वे गार्ड लाईनमधून नवीन वरणगाव रोड तसेच एकेरी वाहतूक, रजा टॉवरपर्यत नवीन एकेरी रस्ता असे मार्ग प्रस्तावित आहेत. त्यामुळे यावल रोडवरील सेंट ऍलायसेस हायस्कूलच्या बाजूची लोहमार्ग पोलीस वसाहतीची सव्वातीन एकर जागा पालिकेला देवू शकते. बसस्थानक त्याच्या विद्यमान जागेवरून स्थानकाच्या समोरील रेल्वे पार्किंगच्या प्रस्तावित जागेत स्थलांतरित होवू शकते. त्यामुळे शहरातील वाहतुकीची खूप मोठी समस्या निकाली निघणार आहे.
 
रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण निघण्याचा मार्ग मोकळा
शहरातील आगवाली चाळ आणि हद्दीवाली चाळ परिसरात रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण आहे. रेल्वे प्रशासनाने येथील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईच्या विरोधात ४-५ जण उच्च न्यायालयात गेले होते. परंतु तेथे त्यांची याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे अतिक्रमण काढण्याचा रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@