राज्य सरकार 'निकम्मे' : उद्धव ठाकरेंची टीका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

भाजप-शिवसेना सरकारवर उद्धव ठाकरेंची टीका

 कायदा हातात घेण्याची धमकी

 
 
 
अहमदनगर : महाराष्ट्रात बिहार राज्यापेक्षाही वाईट परिस्थिती असून हे सरकार 'निकम्मे' असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर केली. अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. मुख्यमंत्री ​देवेंद्र फडणवीस यांचे सरकार निकम्मे आहे. वेगळ्या गृहमंत्र्यांची आमची पहिल्यापासून मागणी आहे. केडगाव हत्याकांडातील दोषींना पाठीशी घालणार असाल तर कायदा हातात घेऊ, अशी उघड धमकीही उद्धव ठाकरे यांनी सरकारला यावेळी दिली.
 
 
गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या देशाला अच्छे दिन येतील असं वाटत नाही, अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. अहमदनगर- केडगावमधील शिवसैनिकांच्या हत्येचा खटला प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा यासाठी मी स्वत: निकम यांना कॉल केला होता, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, एखाद्या गुंडाला जर शिवसैनिकांनी ठेचून मारला तर मग आमच्यावर गुन्हे दाखल करू नका. ती जबाबदारी या यंत्रणेची असेल. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरावा आणि आरोपींना फासावर चढवावे, अशीही मागणी त्यांनी केली. ठुबे आणि कोतकर यांच्या कुटुंबांची जबाबदारी आम्ही घेतली आहे, या कुटुंबांना संपूर्ण ताकद शिवसेना देईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणी सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांच्याकडे ही केस सोपवली गेली पाहीजे तसेच कृष्णप्रकाश यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना इथे आणले पाहीजे, अशीही मागणी ठाकरे यांनी केली.
 
 
येथील लोकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत जर असेच जर होत असेल तर आम्हाला इथे येऊन ठाण मांडावे लागेल आणि ही गुंडागर्दी मोडून काढावी लागेल, असेही आव्हान देत, शिवसेनेला कायदा हातात घेऊन प्रतिकार करण्याची वेळ आली तर तो करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. गृहखात्याला वेगळा मंत्री द्यायला हवा याचा पुनरूच्चार करत या हत्याकांडाचा तपास हा निष्पक्षपातीपणे व्हायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@