रा.कॉं.च्या २ कार्याध्यक्षांवर लोकसभा मतदार संघाची जबाबदारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2018
Total Views |

आगामी निवडणुकांवर सर्व पक्षांचा डोळा

 
 
जळगाव :
जिल्ह्यात आगामी होणार्‍या महानगर पालिका, लोकसभा, विधानसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आतापासून पक्षीय संघटन आणि मोर्चेबांधणीच्या कामाला लागले आहेत. रा.कॉं.तर्फे गेल्या रविवारी झालेल्या बैठकीत नव्याने दोन कार्याध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आगामी काळातील निवडणुकांच्या कामांचा आढावा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार असल्याची पक्षातील सुत्रांनी दिली. दरम्यान, आगामी निवडणुकांवर सर्व राजकीय पक्षाचा डोळा असल्याची चिन्हे सद्यस्थितीच्या राजकीय हालचालींवरुन दिसत आहे.
 
 
जळगाव महानगर पालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आतापासून प्रभागनिहाय उमेदवारांची चाचपणी करीत आहे. त्यादृष्टीने भाजप, शिवसेना, कॉंगे्रस, खान्देश विकास आघाडी, मनसे यांच्यासह रा.कॉं.ने आपल्या पक्षातील अंतर्गंत हालचाली सुरु केल्या आहेत. त्या अनुषंगाने रा.कॉं.ने प्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय २९ रोजी होणार्‍या प्रदेशाध्यक्ष निवडीमुळे लांबणीवर गेला आहे. त्यानंतर त्याचा मुहूर्त साधला जाईल. या निर्णयाचा चेंडू त्यांच्या कोर्टात गेला आहे.
 
 
पक्षीय संघटनेवर भर
पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी बैठकीचे आमंत्रण न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बैठकीतच शाब्दीक तु-तु, मै-मै झाली होती. त्यानुसार पक्ष निरीक्षक रंगनाथ काळे यांनी सर्वांची समजूत घालून सर्वांनी पक्षीय संघटनेवर भर आवाहनही केले होते.
 
जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
रा.कॉं.च्या जिल्हाध्यक्षपदासाठी आ.डॉ.सतीष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, ऍड.रवींद्र पाटील यांचीच नावे चर्चेत होती. बैठकीनुसार मात्र इच्छुकांची संख्या ९ वर जाऊन पोहोचली. तसेच महानगराध्यक्षपदासाठी निलेश पाटील यांचे एकमेव चर्चेत असतांना येथेही आता इच्छुकांची ६ नावे पक्ष श्रेष्ठींकडे पाठवली आहे. त्यामुळे आता दोन्ही निवडीत रस्सीखेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठी यासंदर्भात काय निर्णय घेतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षात अंतर्गंत कलह निर्माण होणार नाही, यासाठी वरिष्ठ पातळीवरुन पाऊले उचलले जाण्याची चिन्हे आहेत.
 
कार्याध्यक्षांवर राहील मदार
रा.कॉं.च्या कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष आणि इतर पदांसोबत आता नव्याने २ कार्याध्यक्ष देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यांच्या आगामी होणार्‍या निवडणुकांची मदार राहिल. जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे दोन लोकसभेचे मतदार संघ आहेत. त्यादृष्टीने या दोन्ही मतदार संघाचा अहवाल हा जिल्हाध्यक्षांकडे सादर करतील. त्यात जातीय समीकरण पाळण्याचा प्रयत्न करुन सर्व जातीय समाजाला न्याय देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांच्यावर असणार आहे.
 
महानगराध्यक्ष करतील प्रभागनिहाय कामे
महानगरपालिका असलेल्या ठिकाणी जिल्हाध्यक्षाप्रमाणे महानगराध्यक्ष पदाचा बहुमान रा.कॉं.ने दिला आहे. त्यादृष्टीने महानगराध्यक्षाला महानगरातील सर्व प्रभागांची जबाबदारी पेलावी लागणार आहे. त्यात ७५ प्रभागातील इच्छुकांच्या उमेदवारांची चाचपणी, मुलाखती, प्रचार यंत्रणा, उमेदवारांची नावे असा सर्व आढावा द्यावा लागणार आहे. या पदावर आता कुणाची वर्णी लागते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
 
जिल्हाध्यक्षांची माळ कुणाच्या गळ्यात?
विद्यमान आ.डॉ.सतीष पाटील यांच्या निवडीचा समर्थकांनी आग्रह धरला आहे. मात्र, त्यांनी आपल्या मतदार संघावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविल्याने ते या पदासाठी इच्छुक नसल्याचे सद्यस्थितीला तरी चिन्हे आहेत. दुसरीकडे बोदवड तालुक्यातील समर्थकांनी ऍड.रवींद्र पाटील तर धरणगाव तालुक्यातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या निवडीसाठी आग्रह धरला आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर पक्षश्रेष्ठी त्यावर काय निर्णय घेतात, त्याचीच उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@