तरुणाचा स्मशानात ‘हॅपी बर्थ डे’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

 
- मरून जिथे जायचे तिथे मस्त जगण्याचा आल्हाद

विजय निचकवडे
भंडारा,
 
जीवनांत दीडच सत्य आहे... यातले अर्धे सत्य हे भूक असते आणि उरलेले एक पूर्ण सत्य म्हणजे मृत्यू. माणूस त्याच्या भुका भागवित मरणाच्या अंतिम सत्यापर्यंत धावत असतो. जन्म ही त्याची सुरुवात असते. काही असे करा की मरणानंतर लोक तुमचा जन्म साजरा करतील... काहीसा असाच विचार करून भंडार्‍यात एका युवकाने आपला वाढदिवस स्मशानभूमीत साजरा केला. डेस्टिनेशन मॅरेजेसचा ट्रेंड आला आहे, हा डेस्टिनेशन बर्थ डे होता!
‘स्मशान’ शांतता काय असते, हे रात्रीच्या वेळी स्मशानात जाऊन प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळणार नाही! रात्रीच्या अंधारात...किर्र...होत असलेल्या आवाजात स्मशानात जाण्याच्या विचारानेच चांगल्या चांगल्यांना ‘घाम’ फुटल्याशिवाय राहणार नाही! मग ‘तेथे’ जाऊन वाढदिवस साजरा करण्याच्या विचाराने तर डोकेच बधीर होईल; पण, असाच काहीसा विचित्र, मात्र सर्वांना बुचकळ्यात टाकणारा वाढदिवस साजरा झाला तो, भंडार्‍याच्या स्मशानभूमीत...तोही रात्री 12 वाजता, मित्रांच्या उपस्थितीत!
विचार शुद्ध असले तर स्मशानभूमीही आनंदी कार्याची साक्षीदार बनू शकते, हे भासवित सकारात्मक विचार करण्याचा सल्लाच जणूकाही या स्मशान सोहळ्याने दिला!
अमित गिर्‍हेपुंजे या युवकाचा 22 एप्रिल रोजी वाढदिवस होता. एरवी तरुण मंडळींचे वाढदिवस मोठ्या हॉटेलमध्ये किंवा गावाबाहेर कुठेतरी लोकांच्या गर्दीपासून दूर गाण्याच्या धांगडिंधग्यात साजरे होताना आपण पहातो, नव्हे ती जणू रितच झाली आहे! मात्र अमितने आपला वाढदिवस मित्रांसह स्मशानभूमीत साजरा करण्याचा निर्णय घेतला. हे विचार त्याच्या मित्रांच्याही मनी उतरले आणि रात्री 12 वाजता असंख्य मृतात्म्यांच्या साक्षीने मित्रांच्या सोबत वाढदिवसाचा सोहळा साजरा झाला. केक कापण्यात आला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. जवळपास एक ते दीड तास हा स्मशानातील वाढदिवसाचा सोहळा रंगला!
विस्तीर्ण अशा शहराजवळच्या वैनगंगा नदीकाठावर असलेल्या स्मशानभूमीतील नीरव शांतात, मंद प्रकाश तरुणांच्या उत्साहावर प्रभाव टाकू शकले नाहीत. या वाढदिवसाची चर्चा रंगली...काहींना आश्चर्य वाटले, जरा विचित्रपणाही वाटला मात्र बर्‍याच लोकांनी स्मशानातील हॅपीबर्थ डे चे कौतुक केले. हेतू ऐवढाच या निमित्ताने ‘त्या’ ठिकाणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा, बस्स!
...
@@AUTHORINFO_V1@@