‘बाप’चे स्वागतच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |



 

आयआयटीमधून शिक्षण घेऊन आपल्या नोकर्‍या सोडून ५० दलित तरुणांनीबहुजन आझाद पार्टीम्हणजेबापनावाचा पक्ष स्थापन केला आहे. सध्याच्या संधीसाधू दलित नेत्यांच्या गर्दीत हा पक्ष सुशिक्षित दलित तरुणांना आशेचा किरण ठरू शकतो.

दोन दिवसांपासून दिल्लीतल्या एका महत्त्वाच्या बातमीने खळबळ माजविली आहे. आता हे पेल्यातील वादळ की नव्या बदलांची नांदी ते येणारा काळच ठरवेल. परंतु, जे सुरू झाले आहे ते नक्कीच दखलपात्र आहे. नवीन कुमार या २०१५ साली आयआयटीतून पास झालेल्या दलित युवकाने त्याच्यासारख्याच ५० आयआयटी शिक्षित तरुणांना सोबत घेऊन पक्ष स्थापन करण्याची कवायत सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडे सध्या या पक्षाची मान्यता देण्याबाबतचा अर्ज दाखल केला आहे. आपल्यासोबत ५० आयआयटीयन्सनी आपल्या कामाचा नोकरीचा त्याग केला असून पुढील काळात पूर्ण वेळ राजकारण करणार असल्याची माहिती नवीन कुमार यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा पहिल्या दिवशीच जाहीर केला आहे. शिक्षण रोजगाराच्या नाकारलेल्या संधींसाठी संघर्ष, खाजगी क्षेत्र, न्यायालये नोकरीतील बढतीसाठी आरक्षण, महिलांना सर्वच क्षेत्रांत श्रेणीसह आरक्षण, शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, पर्यावरण, सामाजिक न्यायव्यवस्थांमध्ये सुधार अशा या पक्षाच्या मागण्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि ज्ञानार्जनाच्या भावनेचा विकास करण्याची जबाबदारी आपल्या पक्षाची असल्याचे नवीन कुमार सांगतात. खाजगी क्षेत्रातील नोकरीतील बढती न्यायालयांमध्येदेखील आरक्षण हा मुद्दा सोडला, तरबापच्या कुठल्याही मुद्द्यावर असहमत होण्यासारखी स्थिती नाही. रोजगाराची गरज हा मुख्य मुद्दा मानला तर तो राष्ट्रीय मुद्दाच आहे. देशातील तरुणांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, यात काही शंका नाही. मात्र, त्या केवळ दलितांनाच नाकारल्या जात असल्याचा कांगावा योग्य नाही.

नवीन कुमार यांच्या पक्षाकडेअजेंडाचांगला आहे. संघटन कौशल्य आणि सकारात्मक कार्यक्रम असेल तर हा पक्ष वाढेल, यात शंका नाही. कारण, दलित युवकांना आज मोठ्या प्रमाणावर नेतृत्वाची गरज भासत आहे. सुशिक्षित दलित तरुणांना त्यासाठी कोणतेही व्यासपीठ विश्वसनीय वाटत नाही. त्याचे मुख्य कारण स्वत:ला दलित मतांचे ठेकेदार म्हणविणारे दलित नेतेच आहेत. सुरुवातीच्या काळात थोडाफार संघर्ष केल्यानंतर ही मंडळी जी काही सत्तेच्या कच्छपी लागली ती कायम आहे. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,’ हा बाबासाहेबांच्या जीवनाचा मूलमंत्र मात्रसत्तेसाठी स्वत:ला विका, समाजाला संघटित होऊ देऊ नका आणि संघर्ष करण्यापेक्षा सत्तेत कसे सहभागी होता होईल याकडेच पाहा,’ असा तथाकथित दलित नेतृत्वाचा शिरस्ता झाला आहे. दलित समाजात दोन प्रकारचे प्रवाह आज प्रवाहित आहेत. एक आहे, जो आजही बर्‍याचशा संधींपासून वंचित आहे आणि दुसरा आहे, ज्याला शिक्षणाच्या संधी मिळाल्या आहेत. शिक्षणातून आलेली समज या दुसर्‍या वर्गाला आज जे काही चालले आहे ते पाहिल्यावर अस्वस्थ करते. या दोन्ही काठांमधून दलित समाजाचा प्रवाह वाहत आहे. दलित समाजातील सुशिक्षितांकडे उर्वरित समाज मोठ्या आशेने पाहातो, मात्र अशा वर्गाकडून राजकीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया आजतागायत घडवून आलेली नाही. नवीन कुमारच्या पक्षाकडून ती घडून आली तर या राजकारणाला एक निराळीच कलाटणी मिळू शकते. बाबासाहेबांचे नाव घेऊन आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी राजकारण केले, त्या सगळ्यांनी आपले अस्तित्व निर्माण झाल्यावर समाजाच्या प्रश्नावर संघर्ष करणे सोडून दिले.

 
महाराष्ट्रातपँथरचा काळ जोरात होता. त्याला शह म्हणून शरद पवारांनी रामदास आठवलेंना थेट मंत्रिपद देऊन आपलेसे केले. मायावती स्वर्गीय काशीरामांचे बोट धरून राजकारणात आल्या. मात्र, एकदोनदा सत्तेचे पाणी लागल्यानंतर स्वत:चे पुतळे उभारणे, भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करणे याशिवाय त्यांना कुठलेही भरीव काम करता आले नाही. आता मायावती मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाच्या नादी लागल्या आहेत. समाजाचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यातच रस आहे. सरकारी नोकरीमध्ये राहून स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न उदितराज यांसारख्या सनदी अधिकार्‍यानेही केला. मात्र, २०१४ ला भाजपच्या तिकिटावर उदितराज निवडून आले आणि लोकसभेत पोहोचले. त्यानंतर कोणतीही भरीव कामगिरी त्यांच्या नावावर नाही. या सगळ्याच्या पलीकडे प्रकाश आंबेडकर यांचे जे काही सुरू आहे, ते भयंकरच आहे. बाबासाहेबांनी मार्क्सच्या विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला आपल्या अनुयायांना दिला होता. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे नवे साथी नेमके त्याच्या उलट करण्याचाच सल्ला देत आहेत. भीमा-कोरेगावला जे घडले त्याआधी पुणे येथे झालेली एल्गार परिषद माओवाद्यांचा यातला सहभाग हळूहळू उघडकीला येत आहे. संभाजीराव भिडेंना अटक करण्यासाठी त्यांनी जी काही आदळआपट केली ती शेवटी मुख्यमंत्र्यांनाच हाताळावी लागली. एक विरुद्ध दुसरा समाज उभा करून आपले राजकीय ईप्सित साध्य करण्याचा काळ आता संपला आहे. ज्या महाराष्ट्रात दलित-सवर्ण दंगली झाल्या आहेत, त्याच महाराष्ट्रात भीमा-कोरेगाव नंतर घातलेल्या गोंधळाला अन्य कुठलाही समाज तशाच प्रकारचा प्रतिसाद किंवा प्रतिकार करीत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, आता जातीय दंगली, सामाजिक विद्वेष कुणालाच नको आहे. प्रकाश आंबेडकरांना यातले काहीच समजून घेण्यात रस नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांना स्वत:च्या नेतृत्वाशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. या सगळ्याला कंटाळलेला दलित युवक कुठल्यातरी नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. ‘डिक्कीच्या माध्यमातून दलित उद्योजकांना उभे करण्याचा वसा घेतलेले मिलिंद कांबळे या तरुणांना आदर्श वाटतात.
 
शिक्षण, रोजगार आणि सन्मान या आजच्या दलित तरुणांच्या गरजा नवीन कुमारांचाबापपक्ष समजून घेऊ शकला आणि किमान त्याला योग्य अभिव्यक्ती देऊ शकला तरीसुद्धा या देशातील मोठी शक्ती त्यामागे उभी राहू शकते. आपल्याला लगेचच निवडणुका लढवायच्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतूनच आपल्या पक्षाची सुरुवात केली असल्यानेआपच्या अरविंद केजरीवालांचा पक्ष त्यांनी घेतलेल्या जाहीर भूमिकांमुळे निर्माण सुरू झालेले माफीनाम्यांचे सत्र त्यांच्यासमोर उदाहरण म्हणून असावे. एकंदरीतच दलित राजकारणातली नेतृत्वाची पोकळी जर हा पक्ष भरू शकला तरी तो दलितांसाठी आशेचा किरण ठरेल.
@@AUTHORINFO_V1@@