एटीएम कार्डद्वारे पोलिसाला गंडा, दोघे ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

खरगोन पोलिसांकडून धुळे पोलिसांना ‘धडे’

धुळे :
शहर पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेचे कर्मचारी किरण जगताप यांना एटीएम कार्डच्या माध्यमातून गंडा घालणारे दोघे संशयित सध्या खरगोन पोलिसांच्या ताब्यात आहेत. तथापि संशयित आरोपी ताब्यात घेताना आवश्यक कागदपत्रे, तपास अधिकारी यांची हजेरी यासह इतर कायदेशीर पूर्तता करण्यात मात्र शहर पोलिस मागे पडले. त्यामुळेच मध्य प्रदेश पोलिसांकडून त्यांना हुशारीचा धडा देण्यात आला.
 
 
या दोघा संशयितांनी अशा पद्धतीने अनेकांना गंडा घातला आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांची खरगोन वारी सुरू झाली आहे. यापूर्वी दोन वेळा गेलेल्या पोलिस पथकाला मध्य प्रदेश पोलिसांनी तांत्रिक चुका दाखवल्या. शिवाय तपासात ठेवलेले बारकावेही दर्शविले. त्यामुळे आता तिसर्‍या वेळेस शासन खर्चातून शहर पोलिस खरगोन गाठणार आहेत. यातून वेळ, श्रम आणि इंधनाचा होणारा अपव्यय समोर येतो.
 
 
गोपनीय शाखा अर्थात डीबीचे कर्मचारी किरण जगताप (वय ४५) यांचे एटीएम कार्ड मदतीचा बहाणा करून बदलण्यात आले. चक्क शहर पोलिस ठाण्याच्या आवारातील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. यातून जगताप यांना सुमारे ९० हजारांचा गंडा घालण्यात आला. अखेर शहर पोलिसांत हा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात मुख्य संशयितासोबत त्याला मदत करणार्‍या अन्य एकाची ओळख पटली आहे; परंतु दोघेही सध्या खरगोन पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी दोन वेळेस शहर पोलिस खरगोन येथे जाऊन आले. मात्र तपासातील काही तांत्रिक बाजू पुढे करून दोघा संशयितांंचा ताबा देण्यात आला नाही. तपास अधिकारी आणि तांत्रिक चुका काढून रिपोर्ट आणा, असे ठाणकावून सांगितल्यानंतर शहर पोलिसांचे पथक आता पुन्हा तिसर्‍या वेळी शासन खर्चातून खरगोनला जाणार आहे. निदान या वेळी तरी खरगोन पोलिस संशयितांना ताब्यात देतील, अशी अपेक्षा शहर पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणातून शहर पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यात तत्परता दर्शविली असल्याचे दिसते.
@@AUTHORINFO_V1@@