रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या मराठवाडा उपकेंद्रासाठी ३९७ कोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

१२१ शिक्षकांची पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

 
 
 
मुंबई : मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना जिल्ह्यात मराठवाडा उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या ३९६ कोटी ६९ लाख रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच शिक्षकांची १२१ व १५८ शिक्षकेतर पदे निर्माण करण्यासदेखील यावेळी मान्यता देण्यात आली.
रसायन तंत्रज्ञान संस्थेने मागील ८१ वर्षांत संशोधन व नाविण्यपूर्ण कार्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. या संस्थेला महाराष्ट्र सरकारने आयआयटी, आयआयएससी आणि आयआयएसईआर यांच्याप्रमाणे विशेष दर्जा आणि उत्कृष्ट केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. मराठवाडा क्षेत्रातील नागरी जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करु शकणाऱ्या सुमारे ३० ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करून संबंधित क्षेत्रात उच्च दर्जाचे संशोधन करण्याचा संस्थेचा मानस असल्याने सुरुवातीस प्रत्येकी ३० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे सहा पदवी अभ्यासक्रम, १६ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, विविध क्षेत्रातील ९ पीएचडी अभ्यासक्रमासह केमिकल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट या क्षेत्रातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.
 
शासकीय जमीन भाडेतत्त्वावर
रसायन तंत्रज्ञान संस्थेला मराठवाडा उपकेंद्र उभारण्यासाठी जालना जिल्ह्यातील शिरसवाडी येथील २०० एकर शासकीय जमीन भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला होता. त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली असून या ठिकाणी मराठवाडा उपकेंद्राच्या बांधकाम व यंत्रसामग्रीसाठी लागणाऱ्या निधीमधील १०० कोटी रुपये राज्य शासनातर्फे टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र, उर्वरित निधी रसायन तंत्रज्ञान संस्थेला उभारावा लागणार आहे. तसेच या उपकेंद्रासाठी प्रस्तावित केलेले अभ्यासक्रम राबविण्यासाठी आवश्यक असलेयली शिक्षक आणि शिक्षकेतर पदे निर्माण करण्यास लागणाऱ्या ४० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून हा निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निधीची उपलब्धता आणि कामाच्या प्रगतीनुसार २०१८-१९ पासून टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@