घरफोडी करणार्‍या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

१४ एप्रिल रोजी श्यामनगरात घडली होती घटना

जळगाव :
श्यामनगरातील घरफोडीप्रकरणी अटक करण्यात आलेले अनिल हुंदराज कुकरेजा (वय ४२, रा. बाबानगर, सिंधी कॉलनी, जळगाव) व फिरोजखान दिलावरखान (वय ३२, रा. मनियार वाडा, नशिराबाद) या दोघांना मंगळवारी मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
 
 
१४ एप्रिल रोजी नीता गणेश ढवळे (रा. श्यामनगर) यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा तोडून आरोपींनी २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ५०० रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरून नेला होता. याप्रकरणी ढवळे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यात अनिल कुकरेजा व फिरोजखान यांना २३ रोजी दुपारी ५ वाजता न्यायालयामार्फत तपास कामी ट्रान्सफर वॉरंटवरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान, आरोपी कुकरेजा याने ही घरफोडी केल्याची कबुली दिली होती. चोरलेले सोन्याचे दागिने आरोपींनी सराफ बाजारातील विनोद सुभाषचंद्र जैन यांना दिले होते. पोलिसांनी जैन यांच्याकडून चौकशीदरम्यान सोन्याचे दागिने वितळवून बनवलेली लगड जप्त केली आहे. दोन्ही आरोपींनी शहरात अजून चोर्‍या व घरफोड्या केल्याची शक्यता असल्याने त्यांना ३ दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
 
कुकरेजा हिस्ट्रीशिटर
दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी अनिल कुकरेजा हा हिस्ट्रीशिटर असून त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ, एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@