एमआर, डॉक्टरांच्या संगनमतातून ग्राहकांची होणार सुटका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Apr-2018
Total Views |

फार्मा मार्केटिंग प्रॅक्टिस विषयक नव्या कायद्याचा मसुदा तयार
डॉक्टरांना रोख रक्कम, गिफ्ट व्हावचर तसेच विदेश सहलींवर बंदी

 

उल्लंघन केल्यास १०० पट दंड केला जाणार
रुपयाचे अवमूल्यन जारी प्रतिडॉलर ६६.४५ रु.दर
औषध कंपन्यांकडून वैद्यकीय प्रतिनिधीं (एमआर) मार्फत डॉक्टरांशी संधान साधून त्यांच्या माध्यमातून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या प्रकाराला लवकरच आळा बसणार आहे. सरकारने या सर्व गोष्टींची नोंद घेत नवीन कायदा लागू करण्याचे ठरविले आहे. हा कायदा औषधांचे मार्केटिंग करण्याच्या प्रथांशी संबंधित असून त्याद्वारे औषधांची किंमत अवाजवी वाढविण्याच्या प्रकारालाही पायबंद बसणार आहे. यासाठी केंद्र सरकारने फार्मा मार्केटिंग प्रॅक्टिसविषयक नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
 
डॉक्टरांना रोख रक्कम, गिफ्ट व्हाऊचर, विदेश सहल यासारख्या पॅकेजवरही बंदी घातली जाणार आहे. औषध कंपन्यांचे प्रतिनिधी व डॉक्टरांच्या संगनमतातून वाढविण्यात येणार्‍या औषधांच्या किंमतींपासून ग्राहकांची सुटका होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने फार्मा मार्केटिंग प्रॅक्टिसविषयक नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. या अंतर्गत डॉक्टरांना हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची भेट (गिफ्ट) देण्यावर बंदी घातली जाणार आहे. तसे झाल्यास परवाना(लायसन्स) रद्द होऊ शकेल व १०० पट दंडही ठोठावला जाऊ शकेल! तसेच सध्याच्या काळात हे एम आर प्रत्येक डॉक्टराच्या दवाखान्यात जाऊन आपापल्या कंपनीच्या औषधांचा प्रचार करीत माहितीही देत असतात. अर्थात हे काही फारसे चुकीचे म्हणता येत नसले तरी बर्‍याच वेळा या संबंधांचा फायदा घेऊन डॉक्टरांना अनेक प्रलोभने उदा. गिफ्ट व्हावचर व फॉरेन टूरचे पॅकेज देऊन आपल्याच कंपनीची औषधे खपविण्याचा हा फंडा राबविला जात असतो. यातून रुग्णांना आवश्यक नसलेल्या औषधीही प्रिस्क्रीप्शन म्हणून लिहिल्या जाणे व रुग्णांना ती घेणे भाग पडणे असेही प्रकार होत असतात. नव्या कायद्यामुळे हे सारे बंद होणार आहे. काहीही झाले तरी गरीब रुग्णांच्या खिशाला परवडेल अशाच किंमतीत औषधे मिळण्याची व्यवस्था यामुळे केली जाणार आहे.
 
 
निवडणुकीच्या काळातही भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरुच राहणार असल्याचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. येत्या वर्षभरात कर्नाटक, मिझोराम, छत्तीसगढ, मध्य प्रदेश व राजस्थान या राज्यांच्या विधानसभा निवडणुका असून त्या आटोपल्यानंतर लगेच २०१९ ची महत्वाची देशाचे भवितव्य ठरविणारी लोकसभा निवडणूक उभी ठाकणार आहे. असे असले तरीही भारतीय अर्थव्यवस्थेचे तेजीकडे मार्गक्रमण सुरुच राहणार असल्याचा अंदाजही आयएमएफने वर्तविला आहे. केवळ निवडणुकांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांचे वेग कमी होणार नसल्याचे मत व्यक्त करीत आयएमएफने २०१८-१९ या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेची वाढ ७.४ टक्के इतकी होणार असल्याचेही म्हटले आहे. नोटबंदी व वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यांच्या परिणामातून भारतीय अर्थव्यवस्था सावरली असून ती आता वाढीच्या दिशेने वाटचाल करु लागलेली आहे.
 
 
धातू व कच्च्या खनिज तेलाचे वाढत चाललेले भाव आणि अपेक्षेपेक्षा कमजोर निकाल यांचा दबाव शेअर बाजारावर येऊ लागलेला आहे. सध्या बाजारात अल्प कालावधीसाठी तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. अशात सतर्क राहून घसरणीच्या वेळी चांगल्या शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याची संधी साधण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांना सध्या रुपयाच्या घसरणीने ‘अच्छे दिन’ आले असून टीसीएस सारख्या लार्जकॅप व निवडक मिडकॅप आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणुकीस वाव असल्याचे तज्ञांचे मत आहे. टीसीएसने १०० अब्ज डॉलर्सची भांडवल मर्यादा पार केली असून तिचा शेअर अजूनही ४०० ते ५०० रुपयांनी वाढण्याची शक्यताही तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 
 
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी या वर्षाअखेर ११ हजार ५०० बिंदूंची पातळी गाठू शकतो. चौथ्या तिमाहीत विमान वाहतूक कंपन्यांचे निकाल खराब राहणार असले तरी प्र्रदीर्घ काळासाठी या कंपन्यांची कामगिरी सुधारणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रही चांगले वाढणार आहे. बँकिंग क्षेत्रात भारतीय स्टेट बँक, आयडीबीआय बँक व कोटक बँक यांना तज्ञांची पसंती राहणार आहे. अशातच गुंतवणुकदारांनी ग्राहक व्यवहार व स्वयंचलित वाहन आणि धातू तसेच बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रा(एनबीएफसी)तील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्लाही तज्ञांनी दिला आहे.
 
ब्रेन्ट क्रूडमध्ये साडेतीन वर्षातील विक्रमी वाढ
आज मंगळवारी ब्रेन्ट क्रूड (कच्चे खनिज तेल)च्या किंमतीत आज सुमारे साडेतीन वर्षातील ७५ डॉलर २७ सेंट्स प्रति पिंप (बॅरल)अशी विक्रमी वाढ झाली. याआधी २७ नोव्हेंबर २०१४ रोजी ब्रेन्टने ७५ डॉलरपेक्षा अधिक किंमत नोंदविली होती. अमेरिकन क्रूडचा भाव ६९ डॉलर १५ सेंट्स झाला होता. ओपेक देशांनी तेल उत्पादनातील कपात जारीच ठेवल्याने व अमेरिकेने इराणशी अण्वस्त्र मुद्यांवर निर्बंध लादण्यावर विचार सुरु केल्याने क्रूडच्या किंमती वाढू लागलेल्या आहेत. दरम्यान भारतीय शेअर बाजारात आज वाढ होऊन संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स १६५ बिंदूंनी वाढून ३४ हजार ६१६ बिंदू तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २९ बिंदूंनी वाढून १० हजार ६१४ बिंदूंवर बंद झाला.
 
@@AUTHORINFO_V1@@